रशियन विमान कोसळून ३२ जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रशियाचे एक प्रवासी विमान सीरियामध्ये कोसळले आहे. या अपघातामध्ये विमानातील सर्व ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास सीरियाच्या सीमेवरील लताकिया शहराजवळ अपघातग्रस्त झाले आहे. खमेमिम एअरबेसवर उतरताना या विमानाचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की विमानातील सर्व २६ प्रवासी आणि पायलटसह ६ कर्मचाऱ्यांचा यात मृत्यू झाला.

सुरुवातीच्या तपासानंतर हा अपघात तांत्रिक कारणांमुळे झाल्याचे समोर आले आहे. दहशतवादी किंवा शत्रू राष्ट्राकडून विमानाला निशाणा बनवण्यात आल्याच्या शक्यतांना रशियाने फेटाळून लावले आहे. एअरबेसवर उतरताना विमान रन वेपर्यंत पोहोचण्याधीच ५०० मिटर अंतरावर असताना विमान जमिनीवर आदळले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताचा तपास करण्याचे आदेश दिले असून यासाठी पथक नियुक्त करण्यात येणार आहे.