प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब

प्रशांत गौतम

परिवर्तनवादी, पुरोगामी विचारवंत, लेखक आणि नाटककार अशी ओळख असणारे डॉ. रुस्तुम अचलखांब हे अस्सल लोककलावंत होते. एवढेच नव्हे तर दलित रंगभूमीला तिचे स्वतंत्र अस्तित्व मिळवून देणारे उत्तम कलावंत होते. त्यांच्या निधनाने साहित्य, कला, संस्कृती आणि नाटय़क्षेत्राची हानी झाली आहे. लोकरंगभूमीचे नवे मानदंड निर्माण करणाऱया या कलावंतास चढय़ा आणि पल्लेदार आवाजाची उपजत देणगी लाभली होती. या आवाजातील त्यांचे सादर होणारे शाहिरी पोवाडे, गण-गवळण बतावणी हे प्रत्यक्षात ऐकणे हाच एक मोठा आनंद होता तोच आता हिरावला आहे. भाऊ फक्कड (मालोजी भंडारे) या परिवर्तनवादी चळवळीतील शाहीरांनी आंबेडकरी जलसा परंपरेतील शाहीरांची मोट बांधली. या परंपरेतील अचलखांब हे शेवटचे शाहीर होते. तमाशात श्रीगणेशाला वंदन आणि नंतर गण-गवळण सुरू व्हायचे तर जलसातून भीमरावांना वंदन करणारे गीत सादर व्हायचे. गवळणीतील कृष्णाऐवजी मावशी हे पात्र सोंगाडय़ाच्या साथीने तथाकथित वर्णव्यवस्थेवर मार्मिक भाष्य करीत असे. अचलखांब हे जालना जिह्यातील मानेगाव या ग्रामीण भागातील. १९७३ च्या सुमारास तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकरराव सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली नाटय़शास्त्र्ा विभाग सुरू झाला. डॉ. अचलखांब या बॅचचे विद्यार्थी. तेथे त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. नाटय़शास्त्र्ा विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. परिश्रम आणि लोककलेच्या अभ्यासातून नित्य-नूतन संशोधनातून, महाराष्ट्राच्या लोककलेचे वैभव त्यांनी सातासमुद्रापार नेऊन पोहचवले. माय मराठीची पताका फडकावली हे कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. अचलखांब हे आधुनिक मराठी रंगभूमी आणि लोकरंग भूमीवरील प्रतिभावंत गायक तर होतेच, पण कसलेले अभिनेतेही होते. त्यांचे एकूणच व्यक्तित्व भन्नाट. स्वभावाने जेवढे तापट तेवढेच प्रेमळ. एखाद्या विद्यार्थ्याचे कला सादरीकरण मनासारखे जमले नाही तर ते त्याच्यावर ओरडतील आणि पुढच्या काही क्षणात सादरीकरण जमले तर त्याच्या पाठीवर प्रेमाची थाप मारून कौतुकही करतील. विद्यापीठातील विद्यार्थी परिवार, साहित्य आणि नाटय़क्षेत्रात त्यांचा मित्रपरिवार, चाहतावर्ग खूप मोठा होता. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, कुशल प्रशासक, लेखक, कलावंत, नाटय़शास्त्र्ा विभागात ३५ वर्षे सेवा करीत असताना त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. ‘एकच प्याला’, ‘संगीत सौभद्र’ अशी दर्जेदार नाटके त्यांनी नव्याने दिग्दर्शित केली होती. महात्मा फुले यांचे ‘तृतीय रत्न’चे त्यांनी सर्वप्रथम सादरीकरण केले होते. त्यानंतर ‘अकलेची गोष्ट’, ‘संगीत मनमोहन’, ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’, ‘शाहिरीचे रंग’ याचे प्रयोग त्यांनी मराठवाडाभर केले. ‘गाढवाचे लग्न’ या अजरामर लोकनाटय़ाने इतिहास निर्माण केला. या नाटकात अचलखांब यांनी सावळा कुंभार आपल्या प्रतिभेतून नव्याने उभा केला. विश्वास साळुंके आणि अचलखांब अशा जोडगोळीने रसिकजनांचे मनोरंजन केले. आपल्या दमदार, बहारदार सादरीकरणातून कलेचा निखळ आनंद मिळवून दिला. प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या ‘पिकलं पान, हिरवं रान’ या नाटकात लग्नाळलेला इरसाल म्हातारा अचलखांब यांनी लाजबाब रंगवला होता. ‘अंधेरनगरी’मधील चणेवाला, ‘अंधारयुग’मधील गुंगा सैनिक अशी त्यांच्या किती तरी भूमिका आजही नाटय़रसिकांच्या स्मरणात आहेत. हिंदुस्थानी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रंगभूमी, रंगबाजी, अभिनयशास्त्र्ा, आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार, आंबेडकरी शाहिरीचे नवरंग, डॉ. आंबेडकरांचे ग्रंथलेखन, गांधी, आंबेडकर आणि मी व पाच बुद्ध एकांकिका, तमाशा लोकरंगभूमी अशी साहित्य संपदा आजही अभ्यासक जाणकारांसाठी महत्त्वाची समजली जाते. अचलखांब यांचा हा बहुआयामी प्रवास त्यांनी आपल्या ‘गावकी’ या आत्मकथनामध्ये विस्ताराने मांडला आहे. मराठी साहित्यातील या आत्मकथनाने एक काळ गाजवला. मराठी साहित्यासोबतच दलित साहित्यातही या वेगळय़ा नि वैशिष्टय़पूर्ण आत्मकथन लेखनाची जाणकारांनी नोंद घेतली. ‘लोकनायक श्रीकृष्ण’ ही साहित्यकृती प्रकाशनाच्या मार्गावर आहे. अभिनयातील सहज वावर, अचूक संवादफेक, स्पष्ट आवाज, हजरजबाबीपणा यावर अचलखांब यांची पकड होती. हीच त्यांची खरी ओळख होती जी त्यांनी शेवटपर्यंत जपली. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला हा हरहुन्नरी कलावंत होता.