शॉर्टसर्किटमुळे महागडी मर्सिडिज बेन्झ खाक

39

सामना ऑनलाईन, संगमनेर

शॉर्टसर्किटमुळे महागडी मर्सिडिज बेन्झ (एस क्लास) कार जळून खाक झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे शिवारात रविवारी पहाटे घडली. दरम्यान, दैव बलवत्तर म्हणून कारमधील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव वारीस खान यांच्यासह इतर दोघे थोडक्यात वाचले आहेत.

वारीस सलीम खान (वय ३७, रा. स्वामी विवेकानंदनगर, नाशिक) हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव आहेत. रविवारी पहाटे तीन वाजता ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी नाशिकहून पुण्याला निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत रश्मीन गांधी आणि रूपेश सोनवणे हेही होते. संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने जात असताना पहाटे चार वाजता ते डोळासणे शिवारात लघुशंकेसाठी महामार्गाच्या कडेला थांबले होते. रश्मीन व रूपेश गाडीतून खाली उतरले. मात्र, वारीस खान गाडीमध्येच बसलेले होते. गाडीमध्ये वायर जळाल्याचा वास आल्याने तेही खाली उतरले असता, गाडीच्या इंजिनने पेट घेतला. क्षणार्धात संपूर्ण कारला आगीचा विळखा पडला. घटनेची माहिती समजताच घारगावचे हेड कॉन्स्टेबल संजय विखे, पोलीस नाईक संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन बंब येईपर्यंत कार जळून खाक झाली होती.

याप्रकरणी वारीस खान यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात जळिताची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले तपास तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या