संघटनशास्त्रातले डॉक्टर

148

>>एस. पी. कुळकर्णी

जळगाव जिह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील वढोदा या एका छोटय़ा गावातील एका छोटय़ा कार्यकर्त्याने भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत आज भरारी घेतली आहे. वढोदा ते दिल्लीतील भाजप मुख्यालय असा त्याचा प्रवास त्याच्यातील अंगभूत गुणांचा परिचय देणारा आहे. डॉ. राजेंद्र फडके असे या कार्यकर्त्याचे नाव. वडील अशोक फडके यांच्या तालमीत राजेंद्र तयार झाले. त्यांना संघटनशास्त्राचे डॉक्टर म्हणावे असे त्यांचे संघटन कौशल्य आहे.

मुक्ताई नगर (पूर्वीचे नाव एदलाबाद) हा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. शिक्षणमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षपद भूषविलेल्या ताईंचा हा इलाका. भाजपाने तो हळूहळू उद्ध्वस्त केला. त्याचा प्रारंभ कै. अशोक फडके यांनी केला होता.नंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि डॉ. राजेंद्र फडके यांनी तिथे भाजपला अच्छे दिन आणले. सतत कार्यमग्नता, सतत भ्रमंती, सतत उत्साही व हसतमुख चेहरा हे डॉ. राजेंद्र फडके यांचे वैशिष्टय़. वढोदा येथे सरपंच, भाजयुमो तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ते संघटनमंत्री अशी त्यांची वाटचाल राहिली आहे. जळगावातील वसंत स्मृतीसारखे आलिशान, सुसज्ज आधुनिक कार्यालय बांधले गेले ते याच नेतृत्वाखाली. जळगावच्या काँग्रेस भवनाएवढे नसले तरी त्या तोडीचे हे कार्यालय आहे. मुख्य म्हणजे ते कार्यकर्त्यांनी गजबजलेले असते. पक्षाचे व जनतेचे कार्य येथून चालते.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा पंतप्रधान मोदींचा आवडता प्रकल्प. भाजप मित्रपक्षांच्या सरकारच्या मदतीने व विरोधकांच्या राज्यात पक्षसंघटनेच्या मदतीने ही मोहीम राबवली जाते. पंतप्रधानांनी डॉ. राजेंद्र फडके यांची या मोहिमेचे राष्ट्रीय संयोजक म्हणून नेमणूक केली. सर्व प्रांतांत प्रांत कार्यकारिणी नेमून जनजागृतीचे काम सुरू आहे. भ्रूणहत्येचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले असून 100 मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढले आहे. या कार्यासाठी प्रत्येक राज्यात दोन ते तीन वेळा डॉ. फडकेंचा प्रवास झाला आहे. 1992 पासून ते भाजपचे पूर्ण वेळ कार्यकर्ते असून जिल्हा मंत्री, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री व प्रांत सहसंघटनमंत्री असा आलेख आहे. त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आसाम, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांत भाजपची निवडणूक यंत्रणा कौशल्याने हाताळली. त्यांचा फोन सतत सुरू असतो. स्वीच ऑफ नसतोच. ‘साहब बथरूम में है’ हे ऐकावे लागत नाही. कुणाचाही फोन केव्हाही आला तरी ते घेतातच. फोनप्रमाणेच त्यांचा प्रवासही सतत सुरू असतो. रेल्वेचा डबा हेच माझे घर असे रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणत असत. त्यांचेच डॉ. अनुयायी. पक्षसंघटनेत सर्व लहान-मोठ्या कार्यकर्त्यांचा मान राखत त्यांना कार्यप्रवण करणे, प्रत्येकाच्या कौशल्याचा वापर करून पक्षवाढ करण्यात त्यांचा हातखंडा आहे. म्हणूनच त्यांना संघटनशास्त्रतज्ञ, निवडणूकतज्ञ असे शब्द मी वापरतो.

राष्ट्रीय पातळीवर काम करीत असले तरी जळगाव जिह्यातील सण, जत्रा, संत आणि नेत्यांचे पुण्यस्मरण, जयंती, वाढदिवस यावर त्यांची रंगीत पोस्ट असतेच. भाजपचे विस्मृतीत जाणारे नेते, प्रसंग त्यांच्यामुळेच कळतात. वढोदा येथील त्यांच्या श्रीराममंदिर संस्थानाची व्यवस्था फडके कुटुंबीय पाहते. जगात कुठेही असले तरी श्रीरामनवमी उत्सवाच्या वेळी ते वढोद्याला मुक्कामाला येतातच. सेंद्रिय शेतीचा प्रयोगदेखील त्यांनी यशस्वी केला आहे. अर्थात असे असले तरी ते प्रसिद्धीच्या झोतात नसतात. पडद्यामागे राहून संपूर्ण रचना लावणे, यंत्रणा उभारण्यात ते तज्ञ आहेत. निवडणूक कशी लढवावी, आचारसंहिता, निवडणूक खर्च हिशेब, उमेदवारी अर्जातील सावधानता इ.चे मौलिक मार्गदर्शन ते करतात. त्यांच्या संघटन कौशल्याचा सर्वांनाच फायदा होत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या