एसटी बस कलंडल्याने ११ प्रवासी किरकोळ जखमी

1

सामना प्रतिनिधी । नागपूर

गडचिरोलीच्या भामररागड तालुक्यातील कोठी येथून अहेरीच्या दिशेने निघालेली बस कारमपल्ली वळणावरील रस्त्याच्या कडेला कलंडल्याने ११ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

शनिवारी अहेरी आगाराची एमएच०६एस-८८२५ क्रमांकाची बस कोठी येथे गेली होती. तेथे मुक्काम केल्यानंतर ही बस रविवारी सकाळी प्रवासी घेऊन निघाली. मात्र, वाटेत कारमपल्ली वळणावर ती रस्त्याच्या कडेला कलंडली. यामुळे ११ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जेथे बस कलंडली त्या ठिकाणचा रस्ता अतिवृष्टीमुळे दुभंगला होता. त्याची डागडुजी करण्यासाठी माती टाकण्यात आली होती परंतु ती दाबण्यात आली नाही. त्यामुळे बसची चाके मातीत फसली आणि ती एका कडेला कलंडली. बसच्या चालकाची प्रकृती बरी नव्हती, असेही सांगण्यात येत आहे. अपघात होताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जखमींना नजीकच्या दवाखान्यात हलविण्यात आले.