वैश्विक : चांद्रविजयाची पन्नाशी

>>दिलीप जोशी<<

[email protected]

गेले अनेक आठवडे आपण जगातल्या नामवंत महिला अंतराळयात्रींचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत. या आठवडय़ात त्यात खंड पडणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. चांद्रविजयाची पन्नाशी सुरू होतेय. २० जुलै १९६९चा तो दिवस (आणि काही ठिकाणी रात्र) आजही अनेकांना आठवत असेल. अमेरिका चंद्रावर माणूस पाठवणार या कल्पनेनंच आम्ही त्यावेळचे नवतरुण थरारून गेलो होतो. विज्ञानाने भन्नाट वेग धारण करण्याच्या सुरुवातीचाच तो काळ असल्याने ‘गागारिन अंतराळात जाऊन आला’ किंवा ‘अमेरिकन यान थेट चंद्रावर उतरणार’ अशा बातम्या एकदम चकित करणाऱ्या असत. आजच्यासारखा सेल फोन सोडाच, पण तेव्हा मुंबईत टीव्हीसुद्धा नव्हता.

अमेरिकेच्या अंतराळवीरांच्या कर्तृत्वाची गाथा रेडिओवरून क्रिकेटच्या कॉमेंटरीसारखी सांगितली जात होती. बेताचं इंग्लिश कळण्याच्या त्या काळात मोठय़ा माणसांकडून हे नवनवल समजून घ्यावं लागत होतं आणि बातमी जगजाहीर झाली. चंद्र पादाक्रांत झाला. नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन या दोन चांद्रवीरांची पावलं चंद्रभूमीवर पडली. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर कुणाही सजिवाच्या इतिहासातलं पहिलं पाऊल ठेवताना म्हटलं की, हे छोटंसं पाऊल म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या दृष्टीने मोठीच झेप आहे.

त्याचं म्हणणं खरंच होतं. नंतर योगायोगाने या चांद्रविजयी अंतराळवीरांना मुंबईत पाहण्याची संधीही मिळाली. हल्ली कशाचीच एक्साइटमेंट राहिलेली नाही अशा काळात त्यावेळच्या चांद्रविजयाचं अप्रूप फार मोठं होतं. आताची पिढी टेक्नोसॅव्ही झालेली आहे. त्यामुळे उद्या माणूस मंगळावर उतरला तरी ‘ठीक आहे’ म्हणणारे बरेच असतील आणि यापुढे पृथ्वीबाहेरच्या एखाद्या भूभागावर जाणं यात नवीन काही असलंच तर ते केवळ  गंतव्य स्थान किंवा डेस्टिनेशन इतकंच असणार आहे.

१९६९च्या चांद्रविजयाचं तसं नव्हतं. पृथ्वी सोडून अन्य कोणत्या तरी भूपृष्ठावर माणूस कधी गेलाच नव्हता. पृथ्वीवरच्याच दक्षिण ध्रुवावर आणि उत्तर ध्रुवावर जाताना त्याची उत्सुकता शिगेला पोचली होती आणि चंद्र म्हणजे तर अंतराळातली, उगवणारी, मावळणारी वस्तू! त्यावर जायचं? काही जणांना तर ही कल्पना ‘फेक’ वाटली. काहींनी आपण चंद्रावर पोहोचूच शकणार नाही अशीही भाकिते त्यावेळी केलेली आठवतात. नंतरही चांद्रविजय ही अमेरिकेची धूळफेक होती वगैरे गोष्टी प्रसृत होत राहिल्या, पण अपोलो-११ रॉकेटवर बसवलेल्या ‘ईगल’ यानाची चित्रं नंतर तिथे गेलेल्या अनेकांनी घेतली तेव्हा चांद्रविजयाची महती पटली.

आज इंटरनेटने जग जवळ आणलंय तसंच अंतराळविजयाने आपली सूर्यमालाही एक कुटुंब ठरतेय की काय असं वाटू लागलं. चंद्रानंतर मंगळावर जाण्याचे मनसुबे लगेच रचले जाऊ लागले. अर्थात चंद्र पृथ्वीच्या अगदीच जवळचा साथीदार आहे. पृथ्वीचा तो नैसर्गिक उपग्रह आहे, समुद्राच्या भरती-ओहोटीला तोही कारणीभूत ठरतो असं त्याचं पृथ्वीशी नातं आहे. अशा या चंद्राची वर्णनं १९६९ पूर्वी फक्त कथाकाव्यांतून, त्यातही प्रेमकाव्यांतून होत होती. शीतल चंद्रमा प्रत्यक्षात चंदेरी नाही हे तिथे गेल्यावर कळलं. तो खड्डे आणि दऱ्या – टेकडय़ांनी भरलेला आहे हेसुद्धा समजलं. एका विज्ञान संस्थेत चंद्रावरची काळीकुट्ट माती पाहिली तेव्हा चांद्ररूपाची सत्यता लक्षात आली. तरीही सूर्याच्या परावर्तित किरणांनी चंदेरी दिसणारा चंद्र मन मोहवतच राहिला. प्रेमिकांच्या मनातला, कवींच्या काव्यातला आणि विज्ञानातला चंद्र वेगळाच. काव्यात तो साक्षीला असतो तर विज्ञानात तो सदैव पृथ्वीच्या साथीला असतो! गेल्या अर्धशतकात ही जवळीक माणसाने वाढवली आहे आणि ‘स्पेस पर्यटक’ चंद्रावर जायला सज्ज झाले आहेत.