लेख : कश्मीरमध्ये एनएसजीची गरज आणि उपयुक्तता

>>डॉ. शैलेंद्र देवळाणकर<<

कश्मीरमध्ये वाढत गेलेला हिंसाचार आणि पाकिस्तानचे आगामी काळातील मनसुबे विचारात घेऊन केंद्र सरकारने तिथे एनएसजी कमांडोंना तैनात केले आहे. एनएसजी हा केंद्राचा हुकमी एक्का आहे, शेवटचा पर्याय म्हणून वापरले जाणारे आयुध आहे. कश्मीरात शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी  केंद्र सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. सध्या कश्मीरमध्ये रोज दोनतीन दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त येते. अमरनाथ यात्रा सुखरूप पार पडते आहे.

कश्मीर हा जगामधील हाय मिलिटराईज्ड झोन म्हणजे लष्कराच्या प्रभावाखाली असलेला प्रदेश अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षा दल आणि ब्लॅक कॅट कमांडोज यांना कश्मीरमध्ये तैनात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. ही दोन्ही संरक्षण दले कश्मीरमध्ये काऊंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन करत आहेत. पाकिस्तानी दहशतवादी घुसू न देण्याचे काम लष्कराचे आहे, पण जे दहशतवादी आत शिरून दगडफेक करणाऱ्यांच्या मागे लपून लष्करावर छुपे हल्ले करतात त्यांना जागेवर किंवा घरात घुसून मारणे याला इन्सर्जन्सी ऑपरेशन म्हणतात. त्यामुळे दहशतवादविरोधी म्हणजे ऑण्टिटेररिस्ट आणि काऊंटर टेररिझम या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या आहेत. दहशतवादविरोधी कारवाया या लष्कराकडून होतात, तर प्रतिहल्ला हा एनएसजीकडून होतो. एनएसजी म्हणजे लष्कर नाही. एनएसजी हे फेडरल एलिट कोअर आहे. कश्मीरमधील नागरी प्रशासनाला कश्मीरात घुसलेल्या दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. तो रोखण्यासाठी एनएसजी कमांडोंना पाठवण्यात आले. यापूर्वीही एनएसजी कमांडो कश्मीरमध्ये जात होते. काही विशेष कामगिरीसाठी त्यांना पाठवले जात असे. पठाणकोट हल्ल्याच्या वेळी एनएसजी कमांडोंना पाठवण्यात आले होते. मुंबईवरील
‘२६-११’च्या हल्ल्याच्या वेळीही एनएसजी कमांडोजना पाचारण करण्यात आले होते.

आता कश्मीरमध्ये त्यांची गरज का भासली हे समजून घ्यावे लागेल. कश्मीरमध्ये ‘न भूतो न भविष्यति’ असा दहशतवादी हिंसाचार वाढला आहे. त्याची टक्केवारी पाहायची झाल्यास २०१४ ते २०१८ या काळात दहशतवादी हिंसाचारात ६४ टक्के वाढ झाली. २०१३ ते २०१७ या चार वर्षांच्या काळात १२६४ दहशतवादी हिंसाचाराच्या घटना घडल्या असून त्यामध्ये १०६४ व्यक्ती मारल्या गेल्या. २०१८ मध्ये सात दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत; तर लष्कराकडून दहशतवादी मारले जाण्याच्या घटना २४७ घडल्या आहेत. दहशतवाद्यांचा वाढत चाललेला धोका लक्षात घेऊनच एनएसजी कमांडोंना तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांना भिडण्याचे हे काम सीआरपीएफकडून केले जायचे.  आता त्यांच्या बरोबरीने मदतीला ब्लॅक कॅट कमांडो पाठवण्यात आले आहेत.

एनएसजी म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड अशा स्वरूपाची ही संकल्पना होती. १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि खलिस्तानवादी दहशतवाद उच्च पातळीवर पोहोचला. त्यावेळी लष्कराला दहशतवादाचा बीमोड करण्यास काही मर्यादा आहेत असे लक्षात आले. त्यातूनच मग केवळ दहशतवादाचा सामना करू शकेल अशा स्वरूपाचा विशेष गट किंवा तुकडी तयार करावी असा विचार पुढे आला. कारण कश्मीर आणि पंजाब इथला दहशतवाद देशात इतरत्र पसरायला सुरुवात झाली होती. १९७१च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानचे तुकडे पाडण्यासाठी छुपे युद्ध सुरू केले.  त्या अंतर्गत दहशतवाद्यांना हिंदुस्थानात पाठवायला सुरुवात केली. याचा सामना कसा करायचा या विचारातून १९८६ मध्ये हिंदुस्थानच्या संसदेत एक विधेयक आणण्यात आले. त्यातून केंद्राचे नियंत्रण असेल अशी ताकद निर्माण करण्याचे ठरवले. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर एनएसजीच्या निर्मितीचा कायदा तयार करण्यात आला. त्यामुळे एनएसजी ही एक स्वतंत्र फोर्स कायद्याने निर्माण करण्यात आली आहे. या फोर्सचे मुख्यालय दिल्लीला आहे आणि त्याचा प्रमुख डीजीपी दर्जाचा आयपीएस अधिकारी असतो.

या दलात थेट नेमणूक होत नाही. यामध्ये दोन प्रकारचे अधिकारी नेमण्यात आले आहेत. लष्करातील प्रावीण्य मिळवलेले शूरवीर अधिकारी आणि निमलष्करी दले आणि पोलीस यांच्यामधील शूर अधिकारी या गटासाठी निवडले जातात. एनएसजीमध्ये दोन गट असतात. एकामध्ये लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असतो, तर दुसऱ्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा. लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या समूहाला स्पेशल ऍक्शन ग्रुप म्हटले जाते; तर पोलीस अधिकारी असणाऱ्या दुसऱ्या समूहाला स्पेशल रेंज ग्रुप म्हटले जाते. थोडक्यात, थेट एनएसजीमध्ये नेमणूक होत नाही, तर अनुभवी, कर्तृत्ववान अधिकाऱ्यांना निवडले जाते. त्यांचे प्रशिक्षण हरयाणातील मानेसरमध्ये होते. दिल्लीपासून ५० किलोमीटरवर हा परिसर आहे. तिथे ९० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत कठीण प्रशिक्षणानंतर युनिट ५१ आणि युनिट ५२ या २ प्रकारच्या फोर्सेस तयार केल्या जातात.

एनएसजीमधील युनिट ५१ हा काऊंटर इन्सर्जन्सीमध्ये तरबेज आहे. लपलेल्या दहशतवाद्यांना घरात घुसून मारणे, नागरिकांचे नुकसान कमी करणे यासाठी हा समूह काम करतो. युनिट ५२ हे दहशतवाद्यांनी ज्यांना ओलीस ठेवलेलं आहे, त्यांना सोडवण्याचे काम करते. याखेरीज तिसरा समूह म्हणजे ‘हिट’ अर्थात एचआयटी यामध्ये पाच जणांचा समावेश असतो. ऑपरेशनसंदर्भातील अंतिम निर्णय ही समिती घेते. अलीकडच्या काळात महिला कमांडोंचा समावेशही या गटामध्ये करण्यात आला आहे.

या गटाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रs देण्यात आली आहेत.  त्यांच्याकडे काऊंटर इन्सर्जन्सीमधे महत्त्वाच्या असणाऱ्या स्नायपर रायफल्स आहेत. तसेच रात्रीच्या वेळी हल्ला करण्याचे प्रशिक्षण या जवानांना दिले जाते. त्याचप्रमाणे १९८७ मध्ये एनएसजीमध्ये नॅशनल बॉम्ब डेटा हे एक महत्त्वाचे युनिट निर्माण झाले. दहशतवादी जेव्हा आरडीएक्सने स्फोट घडवून आणतात तेव्हा त्याची पूर्ण चौकशी करणे आणि ते बॉम्ब कसे निकामी करता येऊ शकतात याविषयीचे संशोधन करणे हे काम या युनिटमार्फत करण्यात येते. आतापर्यंत देशात जितके बॉम्ब ब्लास्ट झाले त्या प्रत्येकाचा नमुना या नॅशनल बॉम्ब डेटाकडे आहे.  विशेष प्रशिक्षण घेतलेल्या तज्ञांचा हा गट आहे.  यामध्ये  सीटीसीसी हा एक कोर्स केला जातो, ज्यामधून अत्यंत सखोल प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारचा गट जर्मनी आणि ब्रिटनमध्ये तयार करण्यात आला होता. इंग्लंडमधील एफएएसवरून एनएसजीची संकल्पना पुढे आली.

अलीकडच्या काळात केंद्राने कश्मीरमध्ये रमजानच्या महिन्यात शस्त्रसंधीचे आवाहन केले होते. त्या काळात ६५ हिंसाचाराच्या घटना घडल्या आणि त्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. गुप्तचर खात्याच्या माहितीनुसार, कश्मीरमध्ये १२० दहशतवादी घुसलेले आहेत. त्याचप्रमाणे ४००हून अधिक स्थानिक कश्मिरी लोक दहशतवादी गटांमध्ये सामील झाले आहेत. म्हणजे कश्मीर खोऱ्यात तब्बल ५०० दहशतवाद्यांचा सामना करायचा आहे. हे दहशतवादी दगडफेक्यांच्या मागे लपताहेत आणि हल्ले करताहेत. या सर्वांना टिपणे महत्त्वाचे आहे. कारण त्याशिवाय जम्मू-कश्मीरात शांतता प्रस्थापित होणार नाही. त्यामुळेच एनएसजी किंवा ब्लॅक कॅट कमांडोंना तैनात आणण्यात आले आहे. हा समूह केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. जोपर्यंत कश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे निपटला जात नाही तोपर्यंत चर्चेसाठी योग्य वातावरण निर्मिती होऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानात या महिन्यातच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील शासन प्रशासनांतर्गत गोष्टींमध्ये व्यस्त आहे. अशा वेळी लष्कर आणि आयएसआय याचा गैरफायदा घेत कश्मीरमध्ये मोठय़ा प्रमाणात दहशतवादी हल्ले करू शकतात. ही वेळ लक्षात घेऊन एनएसजी कमांडो आणण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो योग्यच आहे.  एनएसजी हा केंद्राचा हुकमी एक्का आहे. शेवटचा पर्याय म्हणून वापरले जाणारे आयुध आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात बोलताना कृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्राची उपमा एनएसजीला दिली आहे. हे सुदर्शन चक्र वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)