आजचा अग्रलेख : प्रतिभेने ‘उंबरठा’ सोडला!

86

गिरीश कर्नाड म्हणजे नाटय़ आणि चित्रपटसृष्टीला पडलेले प्रतिभासंपन्न स्वप्नच होते. ते स्वप्न आता भंगले आहे. मर्त्य दुनियेचा उंबरठाओलांडून ते दुसऱ्या दुनियेत गेले असले, तरी तिथेही दंभस्फोट करणारे एखादे नवे महानाटय़ रचल्याशिवाय ते राहणार नाहीत. मग इथेही त्यांच्या अजरामर नाटय़कृतींचा रंगमंचावरील पडदा सतत हलता ठेवणे, हीच गिरीश कर्नाड यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल!

प्रतिभाशाली नाटककार गिरीश कर्नाड गेले. नाटकाच्याच भाषेत सांगायचे तर एका थोर आणि विद्वान व्यक्तिरेखेवर काळाने अलगदपणे पडदा टाकला. तथापि, या जागतिक रंगमंचावर तळपणाऱ्या असामान्य व्यक्तिरेखेवर कायमचा पडदा टाकणे साक्षात काळाला तरी शक्य आहे काय? आज काळाने झाकला तो केवळ कर्नाड यांचा अचेतन देह. मात्र कर्नाड यांनी नाटय़सृष्टीसाठी जे अलौकिक कार्य करून ठेवले आहे, तो अद्भुत ठेवा आणि त्यांनी नाटय़क्षेत्रावर केलेला संस्कार सदैव सचेतन राहील. गेले काही दिवस आजारपणाशी झुंज देणाऱ्या गिरीश कर्नाड यांचा देह जरी काळाने हिरावून नेला असला, तरी त्यांनी निर्मिलेल्या कलाकृती इतक्या ताकदीच्या आहेत की, त्या अजरामर राहतील. गिरीश कर्नाड हे रसायनच अजब होते. केवळ ‘नाटककार’ असा उल्लेख केला तर तो कर्नाडांवर अन्यायच ठरेल. बहुआयामी, बहुढंगी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या गिरीश कर्नाड यांच्याकडे गुणवैशिष्टय़ांचा इतका जबरदस्त साठा होता की, या प्रत्येक गुणवैशिष्टय़ातून एक अद्वितीय व्यक्ती जन्माला आली असती. गिरीश कर्नाड काय नव्हते? ते एक उत्कृष्ट नाटय़लेखक होते, उत्तम नट होते, नाटय़विश्वाला नवी दृष्टी देणारे नाटय़दिग्दर्शक होते. त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मराठी, हिंदी चित्रपटांतून आपल्या कसदार अभिनयाची छापही त्यांनी पाडली. पटकथाही लिहिल्या. नाटक आणि सिनेमा म्हणजे उठवळ क्षेत्र, हा समजही कर्नाड यांनी खोडून काढला. खास करून

सिनेसृष्टीतील उथळपणाला

तसेच थिल्लर चाळ्यांना त्यांनी आपल्या जवळपासही कधी फिरकू दिले नाही. एक परिपूर्ण रंगकर्मी, परिपक्व अभिनेता, व्यासंगी लेखक आणि काळाच्या मागे आणि पुढेही जाऊन पाहणारा दिग्गज दिग्दर्शक म्हणून चित्रपट, नाटय़ आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये गेली काही दशके गिरीश कर्नाड यांचा दबदबा होता. एक ज्ञानसंपन्न विचारवंत अशी त्यांची आणखी एक ओळख जगाला झाली. बावन्नकशी सोनं म्हणावं असे ते अस्सल साहित्यिक-कलावंत होते. त्यामुळेच आपल्यातील लेखक, कलावंताची त्यांनी कधीही व्यवस्थेच्या मागे फरफट होऊ दिली नाही. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा आणि व्यवस्थेशी कायमस्वरूपी संघर्ष करणारा लढवय्या, ही त्यांची प्रतिमा त्यांच्या नाटय़लेखनातून उमटली हे खरेच. मात्र, विविध समारंभ-सोहळ्यांतून केलेल्या भाषणांतूनही ते व्यवस्थेशी सदैव दोन हात करत राहिले. ठामपणे भूमिका मांडणारा, आपल्या भूमिकांवर ठाम राहणारा आणि मोडेन पण वाकणार नाही असाच सगळा पिंड असल्यामुळे गिरीश कर्नाड यांनी अनेकदा वादही ओढवून घेतले. किंबहुना वाद आणि गिरीश कर्नाड यांचे अंमळ अधिकच सख्य होते. डाव्या आणि पुरोगामी चळवळीतील मंडळींसाठी आधारस्तंभ असलेले गिरीश कर्नाड उजव्या विचारसरणीला कायम शिंगावर घ्यायचे. असहिष्णुतेचा डांगोरा पिटत मध्यंतरी पुरस्कार वापसीची लाट आली, तेव्हा कर्नाड सरकारविरुद्ध उभे ठाकले. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर

सरकारवर तुटून

पडले. शहरी नक्षलवाद्यांविरुद्ध केंद्र सरकारने कारवाई केल्यानंतर ‘मी पण शहरी नक्षली’ अशी पाटी गळ्यात घालून ते एका कार्यक्रमात सहभागी झाले. कर्नाड यांची वैचारिक बैठक कोणतीही असो, त्याविषयी मतभेद असू शकतील, पण एक नाटय़कर्मी आणि विचारवंत साहित्यिक म्हणून ते श्रेष्ठच होते. महाराष्ट्रातील माथेरानमध्ये जन्म, पुढे कर्नाटकात गेल्यानंतर कानडी आणि इंग्रजी भाषेत केलेले विपूल नाटय़लेखन, त्याआधी ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र्ा आणि राज्यशास्त्र्ााचे घेतलेले शिक्षण, ययाती, तुघलक, हयवदन यांसारख्या एकाहून एक सरस नाटय़कृतींचे जन्मदाते, ‘उंबरठा’ आणि ‘उत्सव’ यासह अनेक मराठी-हिंदी-कानडी चित्रपटांतील दर्जेदार अभिनय हा त्यांचा साराच प्रवास स्तिमित करणारा आहे. शिवाय पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, कालिदास सन्मान, फिल्मफेअर असे असंख्य सर्वोच्च सन्मान म्हणजे साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची भरभक्कम पोचपावतीच म्हणावी लागेल. गिरीश कर्नाड म्हणजे नाटय़ आणि चित्रपटसृष्टीला पडलेले प्रतिभासंपन्न स्वप्नच होते. ते स्वप्न आता भंगले आहे. मर्त्य दुनियेचा ‘उंबरठा’ ओलांडून ते दुसऱ्या दुनियेत गेले असले, तरी तिथेही दंभस्फोट करणारे एखादे नवे महानाटय़ रचल्याशिवाय ते राहणार नाहीत. इथेही त्यांच्या अजरामर नाटय़कृतींचा रंगमंचावरील पडदा सतत हलता ठेवणे, हीच गिरीश कर्नाड यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल!

आपली प्रतिक्रिया द्या