आजचा अग्रलेख : अलिगडचे पाप; समाज बधिर झालाय!

160

अलिगडच्या घटनेने समाज सुन्न झाला आहे. ही एक प्रकारची बधिरता ठरते. कारण अशा अनेक कोवळ्या कळ्यांवर अत्याचार सुरूच असतात. ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात! अलिगडमधील घटनेने मानवतेस कलंक लागला व समाजाची मान पुन्हा शरमेने खाली गेली. त्या अभागी मुलीची तडफड आणि किंकाळी आमचे मन अस्वस्थ करीत आहे!

विजयाचा आनंदोत्सव संपला असेल तर अलिगडमध्ये घडलेल्या भयंकर प्रकाराकडे पाहायला हवे. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये फक्त दहा हजार रुपयांसाठी अडीच वर्षाच्या बालिकेची निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण देशात यावर संतापाचा वणवा पेटला आहे तर काहींनी परंपरेप्रमाणे निषेधाच्या मेणबत्त्या पेटवल्या आहेत. अक्षय कुमार, अनुपम खेर, अभिषेक बच्चन, सानिया मिर्झा अशा ‘उत्सव’ मंडळींनी या घटनेवर चीड, संताप व्यक्त करून दुःख व्यक्त केले आहे. ‘‘मी भयभीत आहे, अस्वस्थ आणि निराश आहे. हे ते जग नाही, जे आम्ही आमच्या मुलांसाठी निर्माण करू पाहत होतो,’’ अशी भावना अक्षय कुमारने व्यक्त केली आहे. हीच संपूर्ण देशाची भावना आहे. घटना काय आहे? त्या अभागी मुलीच्या पित्याने शेजाऱ्यास दहा हजार रुपये उधार दिले. हे पैसे परत मागितल्याची शिक्षा त्या माथेफिरूने अडीच वर्षांच्या निरागस मुलीस दिली. तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. हात मुळापासून उखडला. डोळ्यांवर हल्ला केला, पाय तोडले. त्या निरागस फुलास अक्षरशः चिरडून टाकले. अमानुष आणि निर्घृण हे शब्द कमी पडतील अशा पद्धतीने अडीच वर्षांच्या मुलीचे जीवन संपवले. प्रियंका गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव यांनीही त्या मुलीच्या बाबतीत संवेदना व्यक्त केल्या आहेत. पण जे

सत्ताधारी म्हणून निवडून आले

आहेत त्या लोकप्रतिनिधींनी मर्यादा पाळणे गरजेचे आहे. मोदी व शहा अशा लोकांना वारंवार समज देत असतात तरीही ही मंडळी भरकटलेली का असतात? बलात्काराच्या एका आरोपीस भाजप खासदार साक्षी महाराज खास जेलमध्ये जाऊन भेटले. त्यावर उत्तर प्रदेशात आता हंगामा सुरू आहे. पोलीस महासंचालकांच्या घराच्या बाहेरून अपहरण होते व पोलीस अडीच वर्षांच्या मुलीचा मृतदेह घेऊन येतो. हे असे उत्तर प्रदेशातील ‘जंगलराज’ असल्याचे अखिलेश यादव म्हणतात, पण या जंगलराजचे खरे जन्मदाता आणि पोशिंदे आपणच आहात. जंगलराजविरोधात योगी सरकारने मोहीम उघडली आहे व अनेक माफियांना गोळ्या घालून मारले, पण अडीच वर्षांच्या मुलीच्या बाबतीत जे घडले ती विकृती आहे. अतिरेकी व गुन्हेगारांना सरळ गोळ्या घालता येतात, पण विकृत माथेफिरू आपल्याच अवतीभोवती लपलेले असतात व ते संधी साधून गुन्हे करतात. हे देशभरात, जगभरात सुरू असले तरी कायद्याचा धाक राहिलेला नाही हे सत्य नाकारता येणार नाही. काँगेस राजवटीत ‘निर्भया कांड’ घडले तेव्हा ज्यांनी संसद चालू दिली नाही व महिला अत्याचाराविरोधात सरकारला कठोर कायदे करायला भाग पाडले ते सर्व लोक आज सत्तास्थानी आहेत. त्यामुळे आजच्या सत्ताधाऱ्यांवर जबाबदारी मोठी आहे. लोकांच्या मनात

अशा प्रकाराने अस्वस्थता

निर्माण होते. अलिगड प्रकरणातही लोक रस्त्यावर उतरले आहेत. अलिगड बार कौन्सिलने आरोपीचे वकीलपत्र स्वीकारण्यास विरोध केला हे बरे झाले. अलिगडमध्ये एका लहान मुलीची हत्या होते. ती देशाची मुलगी आहे ही भावना महत्त्वाची. देशातल्या प्रमुख लोकांनी या घटनेचा धिक्कार केला. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांवर दबाव वाढला. अडीच वर्षांची ही मुलगी गायब झाली तेव्हा पोलिसांनी त्याबाबतचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली व तपासही उशिरा सुरू केला. त्या मुलीच्या माता-पित्यांनी आत्महत्येची धमकी दिली तेव्हा पोलीस धावाधाव करू लागले व दोन संशयितांना पकडले. पोलिसांमधील बेफिकिरी व शिथिलतासुद्धा असे गुन्हे करणाऱ्यांना बळ देत असते. अलिगडच्या घटनेने समाज सुन्न झाला आहे. ही एक प्रकारची बधिरता ठरते. कारण अशा अनेक कोवळ्या कळ्यांवर अत्याचार सुरूच असतात. ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात! अलिगडमधील घटनेने मानवतेस कलंक लागला व समाजाची मान पुन्हा शरमेने खाली गेली. त्या अभागी मुलीची तडफड आणि किंकाळी आमचे मन अस्वस्थ करीत आहे!

आपली प्रतिक्रिया द्या