अग्रलेख : उशिरा सुचलेले शहाणपण!

दहशतवादविरोधी लढाईतील मित्र म्हणून अमेरिकेने मागच्या पंधरा वर्षांत पाकिस्तानच्या झोळीत तब्बल सवादोन लाख कोटींची आर्थिक मदत घातली. मात्र एवढी अफाट खंडणी वसूल करूनही पाकिस्तान अमेरिकेला सदैव मूर्खच बनवत राहिला. भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर एवढ्या उशिरा का होईना, पाकिस्तानची आर्थिक रसद रोखण्याचे शहाणपण महासत्तेला सुचले त्याचे स्वागतच करायला हवे!

पाकिस्तान हा  एक देश नसून एक प्रकारे ती खंडणी उकळणारी टोळीच आहे याची जाणीव उशिरा का होईना अमेरिकेला झाली हे बरेच झाले म्हणायचे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून अगदी कालपर्यंत वेगवेगळ्य़ा गोंडस नावाखाली अमेरिका पाकिस्तान्यांची घरे भरत होती. मात्र अव्याहत सुरू असलेली ही रसद थांबवून पाकिस्तानचे नाक दाबण्याचे धोरण आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने स्वीकारलेले दिसते. ‘पाकिस्तान अजूनही अतिरेक्यांना संरक्षण देत आह़े त्यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणारी 30 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत रद्द करण्यात आली आहे’ अशी ताजी घोषणा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने  केली आहे. त्यामुळे तब्बल 2130 कोटी रुपयांचे हे घबाड पाकिस्तानच्या हातून निसटले आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये देखील अमेरिकेने 50 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत रद्द केली होती. आठ महिन्यांत तब्बल 5680 कोटी रुपयांची रक्कम हातून निसटल्यामुळे भुकेकंगाल झालेल्या पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो येत्या काही दिवसांत पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या तोंडावरच अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखण्याचा निर्णय जाहीर करून पाकिस्तानला मोठाच झटका दिला आहे. तिकडे पाकिस्तानात अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांच्या स्वागताची तयारी होत असतानाच अमेरिकेने ही घोषणा केल्यामुळे जगभरात

पाकिस्तानची नाचक्की

झाली आहे. लष्कराच्या पाठिंब्यावर नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान झालेले इम्रान खान या निर्णयामुळे गोंधळून गेले आहेत. सलामीला फलंदाजीला यावे आणि पहिलाच चेंडू नाकावर आदळावा अशी काहीशी परिस्थिती अमेरिकेच्या या बाऊन्सरमुळे इम्रान यांची झाली आहे. ‘आम्ही अमेरिकेच्या मागण्या एकतर्फी मान्य करणार नाही. पाकिस्तानच्या हिताला बाधा आणणारे सर्व करार रद्द करू’ असा इशारा इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेऊन एक दिवस आधीच दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अमेरिकेने आर्थिक मदतीचा निर्णय रद्द करून इम्रान खान यांच्या डरकाळीतली हवाच काढून घेतली. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानात आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांविरुद्ध जी लढाई सुरू केली आहे त्यासाठी पाकिस्तानने मदत करायची आणि त्या बदल्यात अमेरिकेने दरवर्षी 30 कोटी डॉलर्सचा नजराणा पाकिस्तानला पेश करायचा असे खंडणीसत्र गेली काही वर्षे सुरू होते. ठरावीक महिन्यांनंतर वेगवेगळय़ा नावाखाली पाकिस्तानला अमेरिकेकडून अशी आर्थिक रसद वर्षानुवर्षे पुरवली जात आहे. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यापासून त्यांनी पाकिस्तानची पुरती नाकेबंदी केली आहे. मुळातच ट्रम्प हे आक्रमक, तापट आणि सणकी म्हणून जगाला परिचित आहेत. ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ अशी सरळसोट भूमिका ट्रम्प यांनी घेतली. इस्लामी दहशतवाद संपविण्यास मदत करणार नसाल तर

‘भीक’ घालणार नाही

असा पवित्रा ट्रम्प यांनी पहिल्या दिवसापासूनच स्वीकारला. अमेरिकेकडून मिळणारी आर्थिक मदत ही दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आहे. मात्र दहशतवादविरोधी लढाईस सहकार्य करण्याऐवजी पाकिस्तान त्यांच्या सोयीनुसार दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप अमेरिका सातत्याने करीत आहे. पाकिस्तानची तालिबानी अतिरेक्यांना असलेली फूस, अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असताना तिथे अस्थैर्य माजवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न, अमेरिकेच्या पैशावर चीनच्या मदतीने अण्वस्त्र्ाक्षमता वाढवण्याचे पाकिस्तानचे मनसुबे या सगळ्य़ांचा एकत्रित परिणाम म्हणून अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक रसद जवळपास थांबवली आहे. अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या लादेनला तर पाकने पोसलेच, पण आजही पाकिस्तानात जिहादी संघटनांचे कारखाने धुमधडाक्यात सुरूच आहेत. अमेरिकेने एवढी तिजोरी रिती करूनही  पाकिस्तानने अमेरिकेच्या पाठीत खंजीरच खुपसला. दहशतवादविरोधी लढाईतील मित्र म्हणून अमेरिकेने मागच्या पंधरा वर्षांत पाकिस्तानच्या झोळीत तब्बल सवादोन लाख कोटींची आर्थिक मदत घातली. मात्र एवढी अफाट खंडणी वसूल करूनही पाकिस्तान अमेरिकेला सदैव मूर्खच बनवत राहिला. भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर एवढ्या उशिरा का होईना, पाकिस्तानची आर्थिक रसद रोखण्याचे शहाणपण महासत्तेला सुचले त्याचे स्वागतच करायला हवे!