आजचा अग्रलेख : अण्णांचे प्राण वाचवा!

14
anna-hazare-new
फाईल फोटो


गंगाशुद्धीसाठी प्रा. जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ज्ञानस्वरूप हे 111 दिवस उपोषणास बसले. त्यांच्या उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही व स्वामीजींनी प्राणत्याग केला. अण्णा हजारे यांनीही प्राणत्याग करावा व राजकारण्यांना मुक्त करावे अशा अहंकारात कुणी असेल तर ते निर्घृण व अमानुष आहे. अण्णा हजारे यांच्या जिवाशी खेळू नये हे आमचे सरकारला सांगणे आहे व अण्णांनीही उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साद घालत नव्या लढ्याचे रणशिंग फुंकावे ही आमची विनंती आहे. सध्या अण्णांचे प्राण वाचवा, पुढचे पुढे पाहू!

अण्णा हजारे यांच्या उपोषणाची दखल घ्यायला सरकार तयार नाही. राळेगणात अण्णांच्या उपोषणाचा  पाचवा दिवस असून याच उपोषणात अण्णांचे बारावे-तेरावे झाले तर बरे अशा निर्घृण मानसिकतेत सरकार असेल तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे रूपांतर विकृतीत होत असल्याचे हे लक्षण आहे. अण्णा हजारे कोण हे काही पंतप्रधान मोदी किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगण्याची गरज नाही. काँग्रेस राजवटीत हेच अण्णा हजारे दिल्लीच्या जंतर मंतर व रामलीला मैदानावर सरकारविरोधी आंदोलन करीत होते तेव्हा त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करणार्‍यांचे राज्य आज आहे, पण त्यांना अण्णांचे आमरण उपोषण व भ्रष्टाचारविरोधी आंदोलन नकोसे झाले आहे. अण्णा हे हट्टी आहेत, थोडे हेकट आहेत असा आक्षेप आहे, पण निःस्वार्थी भावनेने आंदोलन करणार्‍यांचा तो स्वभावगुण आहे. हेच गुण श्री. मोदी यांच्याही अंगात आहेत व ते गुण नसून अलंकार आहेत असा ‘जोश’ दाखवला जातो. अण्णांच्या मागण्या नवीन नाहीत. लोकपाल, लोकायुक्त, शेतकर्‍यांचे प्रश्न यासाठी त्यांचे उपोषण आहे व पंतप्रधानांनी दोन ओळींचे पत्र पाठवून आंदोलनास म्हणजे ‘आमरण उपोषणास’ शुभेच्छा दिल्या यास काय म्हणावे?

हा प्रकार

बरा नाही. अण्णांना समर्थन देण्यास आता राजकीय पक्ष कचरत  आहेत. एकेकाळी देश अण्णांच्या मागे उभा राहिल्याचे चित्र होते व त्यात भारतीय जनता पक्षाचा पुढाकार होता. आज अनेकांना अण्णांची अडगळ झाली आहे. त्यांचे आंदोलन आज राळेगणसिद्धीपुरते मर्यादित झाले आहे. या आंदोलनाच्या मोठ्या बातम्या येऊ नयेत व त्यास फार प्रसिद्धी मिळू नये याचा चोख बंदोबस्त झाल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी हे प. बंगालात गेले व तिथे जाऊन त्यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. त्याची रसभरीत वर्णने महाराष्ट्रातील पेपरवाले छापतात, पण अण्णांचे आंदोलन व त्यांची भूमिका या मंडळींना नकोशी झाली आहे. हे लोण भडकले तर गोंधळ होईल असे सरकारला वाटत असावे व सरकारी भूमिकेशी वृत्तपत्र किंवा मीडिया सहमत असावेत. अण्णांचे करायचे काय? हा तरीही प्रश्न आहेच. त्यांना लालू यादवांप्रमाणे तुरुंगात बंद करता येणार नाही व मायावती, अखिलेश यादव यांच्याप्रमाणे ‘ईडी’च्या धाडी टाकून भय दाखवता येणार नाही. कारण राळेगणात यादवबाबाच्या मंदिरात धाडी टाकून काय मिळणार? भुजबळांच्या बाजूला जी

रिकामी कोठडी

आहे त्यातही अण्णांना ढकलणे सोपे नाही. त्यामुळे अण्णांच्या आमरण उपोषणाकडे नजरझाक करून अण्णांची प्रकृती ढासळत ठेवायची हा कुविचार सरकारी पातळीवर झालेला दिसतो. अण्णा हजारे यांनी सर्वच राजकारण्यांचा रोष अलीकडच्या काळात ओढवून घेतला आहे. श्री. शरद पवार यांच्यावर एका माथेफिरूने दिल्लीत हल्ला केला, त्यावर अण्णा हजारे यांनी केलेली टिपणी कुणालाच आवडली नव्हती. हे सर्व खरे असले तरी आमरण उपोषणास बसलेल्या अण्णांशी बोलायचेच नाही हा अहंकार बरा नाही. गंगाशुद्धीसाठी प्रा. जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ज्ञानस्वरूप हे 111 दिवस उपोषणास बसले. त्यांच्या उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही व स्वामीजींनी प्राणत्याग केला. अण्णा हजारे यांनीही प्राणत्याग करावा व राजकारण्यांना मुक्त करावे अशा अहंकारात कुणी असेल तर ते निर्घृण व अमानुष आहे. अण्णा हजारे यांच्या जिवाशी खेळू नये हे आमचे सरकारला सांगणे आहे व अण्णांनीही उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साद घालत नव्या लढ्याचे रणशिंग फुंकावे ही आमची विनंती आहे. सध्या अण्णांचे प्राण वाचवा, पुढचे पुढे पाहू!

आपली प्रतिक्रिया द्या