अग्रलेख : आसामचे झाले कश्मीरचे कधी करणार?


आसामातील ४० लाख परकीय नागरिकांनी त्या राज्याचा भूगोल, इतिहास व संस्कृती मारून टाकली आहे. तसेच कश्मीरच्या बाबतीतही घडत आहे. आसामातून विदेशी नागरिकांना बाहेर काढत असताना दीड लाख कश्मिरी हिंदू पंडितांची कश्मीरात घरवापसी करण्याची हिंमत सरकार दाखवेल काय? आसाममधील परकीय नागरिकांचा प्रश्न धसास लावल्याबद्दल आम्ही मोदी सरकारचे त्रिवार अभिनंदन करीत आहोत. पण साहेब, तेवढ्या कश्मीरातील घुसखोरांचे, तिरंगा जाळणार्‍यांचे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविणार्‍यांचेदेखील पहाच! 

हिंदुस्थानात सध्या जे सुरू आहे ते म्हणजे भविष्याचा चुथडाच म्हणावे लागेल. भले भले ‘नटवर्य’ मागे पडतील अशा भूमिका राजकीय रंगमंचावर वठवल्या जात आहेत. पण या सगळ्यांत देशहिताची म्हणून एकही ठाम भूमिका घेऊन कोणी उभे राहिले आहे काय? आसाममधील ४० लाख घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी भाजप सरकारने कंबर कसली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषेत सांगायचे तर ‘काँग्रेस सरकारांना जे जमले नाही ते हिमतीचे काम आम्ही करीत आहोत.’ परकीय नागरिकांना वेचून बाहेर काढण्याचे काम देशभक्तीचेच आहे व अशी हिंमत दाखवल्याबद्दल आम्ही केंद्रीय सरकारचे अभिनंदन करीत आहोत. परकीय नागरिक मग ते बांगलादेशी असोत नाहीतर श्रीलंकेचे, पाकिस्तानी असोत किंवा म्यानमारचे रोहिंग्ये मुसलमान असोत, त्यांना देशाबाहेर काढलेच पाहिजे. बांगलादेशी मुसलमानांना हाकलून देण्याची घोषणा या देशात सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केली होती. राष्ट्रीय सुरक्षेस धोका निर्माण करणार्‍यांना वेचून बाहेर काढले पाहिजे व कश्मीरात घुसणार्‍यांना ठेचून मारले पाहिजे. पण आसामात जे घडते आहे ते जम्मू-कश्मीरातदेखील घडले असते तर देशातील घराघरांवर हिंदुत्वाचे भगवे ध्वज फडकवायला जनता मोकळी झाली असती.

राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न

फक्त आसामातील ४० लाख घुसखोरांपुरता मर्यादित नाही. कश्मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे व पाकिस्तानात इम्रान खानचा मुखवटा लावून लष्करी राजवट येत असल्याने धोका अधिक वाढला आहे. आसामातील ४० लाख परकीय नागरिकांनी त्या राज्याचा भूगोल, इतिहास व संस्कृती मारून टाकली आहे. तसेच कश्मीरच्या बाबतीतही घडत आहे. आसामातून विदेशी नागरिकांना बाहेर काढत असताना दीड लाख कश्मिरी हिंदू पंडितांची कश्मीरात घरवापसी करण्याची हिंमत सरकार दाखवेल काय? हा प्रश्न फक्त प्रखर हिंदुत्वाचा नाही, तर आसामातील घुसखोरांइतकाच राष्ट्रीय सुरक्षा व हिंदू संस्कृतीशी जोडलेला आहे. ४० लाख परकीय नागरिकांना क्षणात बाहेर काढणारे केंद्र सरकार हिंदू रक्ताच्या दीड लाख स्वदेशी नागरिकांना कश्मीरात पाठवू शकत नसेल तर या हिमतीची डी.एन.ए. चाचणी करावी लागेल. कश्मीरातून हिंदूंचे संपूर्ण उच्चाटन दहशतीच्या बळावर झाले आहे. ही दहशत मोडून मोदी सरकारने कश्मिरी पंडितांसाठी पायघड्याच घालायला हव्या होत्या. पण पायघड्या राहिल्या बाजूला, त्यांच्या पायाखालची सतरंजीदेखील ओढली आहे. त्यात आता कश्मीर खोर्‍यातून सरकारला धमक्या देण्याचे प्रकार वाढले आहेत. कश्मीरचे एक आमदार जावेद राणा यांनी मोदी सरकारला धमकी दिली आहे की, ‘३७० कलम हटवलेत तर याद राखा. कश्मीर खोर्‍यात तिरंग्याचे नामोनिशाण उरणार नाही.’ ही धमकी म्हणजे

हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवादाला

सरळ सरळ आव्हान आहे. ३७० कलमानुसार कश्मीरबाहेरच्या व्यक्तीस तेथे जाऊन जमीनजुमला खरेदी करता येत नाही. कायमस्वरूपी वास्तव्य करता येत नाही. त्यामुळे कश्मीर म्हणजे हिंदुस्थानच्या नकाशावरील एक ‘परराष्ट्र’च झाले आहे. सत्तेवर येताच ३७० कलम रद्द करू, कश्मीरला जोखडातून मुक्त करू ही भाषा इंदिरा गांधी, राजीव गांधी किंवा मनमोहन सिंग यांनी केली नव्हती. ते सर्व लोक कमकुवत मनाचे होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी आपण सत्तेवर येताच ३७० कलम रद्द करून कश्मीरवर फक्त एकच तिरंगा फडकवू, असे वचन हिंदुस्थानी जनतेला दिले होते. एन. आर. सी. म्हणजेच राष्ट्रीय नागरिक रजिस्टरची अंमलबजावणी हे जसे हिमतीचे राष्ट्रीय कार्य आहे तसे ३७० कलम रद्द करून राष्ट्रीय बाणा दाखवणे हेसुद्धा तितकेच हिमतीचे राष्ट्रीय कार्य आहे. ३७० कलम रद्द करून दाखवा, अशी आव्हानाची भाषा करणार्‍यांना श्रीनगरच्या लाल चौकात फासावर चढवायला हवे. पीडीपीचे दुसरे एक खासदार मुझफ्फर बेग यांनी तर दुसर्‍या फाळणीची भाषा केली. हे सर्व पाहिले की कश्मीर आणि आसामच्या परिस्थितीची आम्हास चिंता वाटते. आसाममधील ४० लाख परकीय नागरिकांचा प्रश्न धसास लावल्याबद्दल आम्ही मोदी सरकारचे अभिनंदन, त्रिवार अभिनंदन करीत आहोत. पण साहेब, तेवढ्या कश्मीरातील घुसखोरांचे, तिरंगा जाळणार्‍यांचे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविणार्‍यांचेदेखील पहाच!3 प्रतिक्रिया