आजचा अग्रलेख : फिरदौस अहमद!

4

. बंगालात एकापेक्षा एक दिग्गज कलाकार असताना तृणमूलवाल्यांनी बांगलादेशातून फिरदौस अहमदला बोलावले. ही धोक्याची शेवटची घंटा आहे. भाजप आणि शिवसेनेने परकीय नेत्यांना निवडणूक प्रचारासाठी बोलावले असते तर विरोधकांनी थैमान घातले असते. काही संकेत राष्ट्रहितासाठी म्हणून पाळावेच लागतात. जे हे संकेत पायदळी तुडवतात तेच दुसऱ्याकडे बोटे दाखवतात. फिरदौस अहमद प्रकरणात तृणमूलने तेच केले आहे.

निवडणुका जिंकण्यासाठी आपल्या देशातील राजकीय पक्ष आणि पुढारी कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. प. बंगालात तृणमूल काँग्रेसने बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद याला आणले. हे धक्कादायक तितकेच चिंताजनक आहे. बांगलादेश हा स्वतंत्र देश आहे व फिरदौस अहमद हा बांगलादेशचा नागरिक आहे. परकीय नागरिकाने हिंदुस्थानच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा व एका विशिष्ट राजकीय पक्षाला विजयी करण्याचे आवाहन करावे हे बरे नाही. मुळात हा जो कोणी अभिनेता आहे तो बिझनेस व्हिसावर येथे आला व तृणमूलच्या प्रचार यात्रा, प्रचार सभांत भाग घेऊ लागला. केंद्रीय गृहमंत्रालयाने अहमदचा व्हिसा आता रद्द केला. पण या प्रकरणाने सुजाण नागरिकांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बांगलादेशची निर्मिती इंदिरा गांधींनी केली. पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश निर्माण केला, पण हे राष्ट्रही शेवटी पाकिस्तानच्या वाटेनेच गेले. मुजीबूर रेहमान व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या पाकडय़ा ‘आयएसआय’ने घडवून बांगलादेशवर ताबा मिळवला. मुजीबूर कन्या शेख हसिना यांनी हिंदुस्थानशी एक नाते जपले आहे. आज त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. पण बाकी सगळय़ांनी हिंदुस्थानशी उभा दावाच मांडला. ढाक्यातील मंदिरे, हिंदू वसाहतींवर हल्ले झाले व होतच आहेत. हिंदू मुलींची बळजबरीने धर्मांतरे घडवून त्यांच्याशी निकाह लावण्यात बांगलादेशी आघाडीवर आहेत. बांगलादेशी मुस्लिमांची घुसखोरी हा देशाच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय आहे. पण तृणमूलसारखे पक्ष या घुसखोरांकडे व्होट बँका म्हणून पाहतात. या व्होट बँकेला खूश करण्यासाठीच फिरदौस अहमदसारख्या कलाकारांना तृणमूलने

पायघडय़ा

घातल्या. देशातील मोदीविरोधक हे अनेक विषयांवर मोदी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर जहरी टीका करतात. मोदी यांच्या बाबतीत हल्ला करण्याची एकही संधी सोडली जात नाही. पण प. बंगालात एक परकीय नागरिक तृणमूल काँग्रेसचा प्रचार करीत आहे यावर ना राहुल गांधी बोलले, ना शरद पवार. फिरदौस अहमदला प्रचारासाठी बोलावून ममता बॅनर्जी यांनी चूक केली असे ज्यांना वाटत नाही त्या राजकीय पुढाऱ्यांची अक्कल पाकिस्तानात गहाण पडली आहे. प. बंगालात आता हिंदू आणि मुसलमान अशी सरळ फाळणी झाली. त्यास तृणमूलची हीच धोरणे कारणीभूत आहेत. शिवसेना जेव्हा बांगलादेशी घुसखोरांना मुंबईतून हाकलून देण्याची भाषा करते तेव्हा तृणमूल व काँग्रेससारखे पक्ष बंगाली जनतेच्या मनात भ्रम निर्माण करतात. आम्ही घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात आहोत. राष्ट्रभक्त बंगाली जनतेच्या विरोधात नाही. आज बंगाली जनता हिंदुत्ववादी भाजपच्या बाजूने आणि बांगलादेशी तृणमूलच्या वळचणीला असे चित्र प. बंगालमध्ये दिसत आहे. तृणमूल काँग्रेस सरकार हिंदू आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यात भेदभाव करीत असल्याने मोदी यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत आहे. बांगलादेशी घुसखोरांनी देश पोखरला आहे. ‘हुजी’ ही दहशतवादी संघटना बांगलादेशच्या भूमीवरून हिंदुस्थानातील अतिरेकी कारवायांना बळ देत आहे व त्यांना पाकडय़ा आयएसआयचा उघड पाठिंबा आहे, हे काय ममता बॅनर्जी यांना माहीत नाही? बांगलादेशात हिंदू मंदिरे पाडली, हिंदू जनतेचे खून झाले, अत्याचार झाले. त्याची वेदना ना काँग्रेसला झाली ना तृणमूलवाल्यांना. देशात

चार कोटी बांगलादेशी घुसखोर

पसरले आहेत व जसा एक पाकिस्तान हिंदुस्थानच्या पोटात वाढतो आहे  तसा दुसरा बांगलादेशही हिंदुस्थानच्या गर्भात हालचाल करीत आहे. हा धोका वाढतच जाईल व देशांतर्गत नव्या धार्मिक अराजकाला तोंड देण्याची वेळ आपल्यावर येईल. पश्चिम बंगालच्या सीमेवरील सात जिल्हे आधीच बांगलादेशीमय झाले आहेत. आसामची अवस्था वेगळी नाही. जम्मू-कश्मीरची स्थिती बिघडत आहे. आज कश्मीरातील पाकप्रेमी मुसलमान फुटून निघण्याची भाषा करीत आहेत, ती तेथील मुसलमानी लोकसंख्येच्या बळावर. हीच वेळ उद्या प. बंगालवर येऊ शकते. नव्हे ती वेळ आलेलीच आहे. प. बंगालात एकापेक्षा एक दिग्गज कलाकार असताना तृणमूलवाल्यांनी बांगलादेशातून फिरदौस अहमदला बोलावले. ही धोक्याची शेवटची घंटा आहे. भाजप आणि शिवसेनेने परकीय नेत्यांना निवडणूक प्रचारासाठी बोलावले असते तर विरोधकांनी थैमान घातले असते. इम्रान खान याने मोदी पुन्हा जिंकून यावेत अशी धोरणी इच्छा व्यक्त करताच विरोधकांनी नथीतून तीर मारण्यास सुरुवात केली. पण प. बंगालात बांगलादेशी कलाकार सरळसरळ तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात घुसले. उद्या मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रे. ट्रम्प, रशियाचे पुतीन व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना भाजपच्या प्रचारात उतरवले तर चालेल काय? सौदी अरेबियाचे शहेनशहा तर मोदी प्रचारासाठी पळत येतील, पण काही संकेत राष्ट्रहितासाठी म्हणून पाळावेच लागतात. जे हे संकेत पायदळी तुडवतात तेच दुसऱ्याकडे बोटे दाखवतात. फिरदौस अहमद प्रकरणात तृणमूलने तेच केले आहे.