आजचा अग्रलेख- ‘दाता’ बदलला; ‘कटोरा’ कायम!

1

पाकिस्तानसारखा भ्रष्टाचार, लष्कराची मुजोरी आणि आर्थिक-राजकीय बजबजपुरीच्या गर्तेत गटांगळय़ा खाणारा देश ‘ड्रगन’च्या विळख्यात आपसूकच अडकणार होता. तेच घडले आणि घडत आहे.  कालपर्यंत सौदी-अरेबिया, अमेरिका हे पाकिस्तानचे ‘दाते’ होते, आता ही जागा चीनने घेतली आहे. पाकिस्तानच्या हातातील ‘कटोरा’ मात्र कायम राहिला आहे. या दुरवस्थेसाठी पाकिस्तान स्वतःच जबाबदार आहे. तेच त्या देशाचे वर्तमान आहे आणि भविष्यदेखील!

आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या पाकिस्तानच्या झोळीत चीन सहा अब्ज डॉलर्सची ‘मदत’ टाकणार आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अलीकडच्या चीन दौऱयात चीनने म्हणे तसे आश्वासन दिले आहे. या दौऱयात नेहमीप्रमाणे दोन्ही देशांदरम्यान अनेक करारमदार झाले, पण इम्रान यांची सगळी ‘मदार’ होती ती चीनकडून मिळणाऱया ‘आर्थिक पॅकेज’वर. कारण सध्या पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. तो देश एवढा कंगाल झाला आहे की पंतप्रधान निवासस्थानातील म्हशी विकून 23 लाख रुपये जमवावे लागले. त्याशिवाय  61 सरकारी गाडय़ांचा लिलाव करून 20 कोटी रुपये जमवण्यात आले. एवढी भयंकर आर्थिक दुरवस्था झाल्याने जगासमोर हात पसरविण्याशिवाय त्या देशाला पर्याय राहिलेला नाही. पूर्वी निदान अमेरिका हा त्यांचा सर्वात मोठा ‘आधार’ होता. दरवर्षी अमेरिका अब्जावधी डॉलर्स पाकिस्तानच्या झोळीत ‘अर्थसहाय्य’ म्हणून ओतत असे. मात्र हा सगळाच पैसा भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अवैध शस्त्र्ाास्त्र्ा व्यापार आणि दहशतवाद यासाठी वापरला गेला. त्यामुळे सात दशके उलटली तरी पाकिस्तान हे दरिद्री, मागासलेले राष्ट्रच राहिले. व्यापारउदीम, उद्योग-कारखान्यांची अवस्था बिकट, पण बेकायदा शस्त्र्ाास्त्र्ाांची निर्मिती जोरात अशी आज

पाकिस्तानची स्थिती

आहे. पुन्हा ‘दहशतवाद्यांचा कारखाना’ अशी या देशाची जगभरात ओळख झाली आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने आणि कोणत्या देशाच्या दारात आर्थिक मदतीसाठी उभे राहायचे, हा त्या देशाच्या सत्ताधाऱयांसमोर प्रश्नच होता. त्यात गेल्या काही वर्षांत अमेरिकेचेही पाकप्रेम आटत चालले होते. वर्षानुवर्षे अब्जावधी डॉलर्सचे ‘दूध’ पाजूनही हा ‘हिरवा साप’ अमेरिकेवर ‘9/11’च्या रूपाने उलटला. त्यामुळे हादरलेल्या आणि भानावर आलेल्या अमेरिकेने पाकडय़ांच्या आर्थिक नाडय़ा आवळण्यास सुरुवात केली. विद्यमान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर त्या देशाची आर्थिक नाकाबंदीच केली आहे. खरे म्हणजे त्यामुळे पाकिस्तान वठणीवर येऊन खऱया अर्थाने विकासाच्या मार्गावर यायला हवा होता, पण पाकडेच ते. अमेरिका देत नाही म्हटल्यावर त्यांनी चीनकडे तोंड फिरवले. चीनलाही पाकिस्तानसारखे प्यादे हवेच होते. शिवाय ‘अर्थसहाय्य’ आणि ‘विकासकामां’च्या ‘बोझ्या’खाली दाबून हिंदुस्थानचे शेजारी देश आणि पूर्वेकडील छोटय़ा देशांना अंकित करण्याचेही चीनचे धोरण आहे. अशावेळी पाकिस्तानसारखा भ्रष्टाचार, लष्कराची मुजोरी आणि आर्थिक-राजकीय

बजबजपुरीच्या गर्तेत

गटांगळय़ा खाणारा देश ‘ड्रगन’च्या विळख्यात आपसूकच अडकणार होता. तेच घडले आणि घडत आहे. ‘सीपीईसी’सारखे आपल्या महत्त्वाकांक्षेचे मोठे भूत चीनने आधीच पाकिस्तानच्या मानगुटीवर बसवले आहे. इतरही प्रकल्पांच्या माध्यमातून चीनने त्या देशाला अब्जावधी डॉलर्सचे अर्थसहाय्य दिले आहे. चीनची ही मेहेरबानी एक दिवस पाकिस्तानला त्या देशाचा बटीक बनवणार हे स्पष्ट आहे. मात्र दिवाळखोर बनलेल्या पाकिस्तानला त्याशिवाय पर्यायही उरलेला नाही. याआधी ‘बेल आऊट पॅकेज’ची विनंती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला केली होती. पण त्यासाठी चीनसोबत झालेल्या सर्व आर्थिक आणि इतर करारांचा तपशील व शर्ती सादर करण्याची अट नाणेनिधीने घातली होती. हा प्रकार पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करशहा यांच्यासाठी राजकीय अडचणीचा आणि त्यांची पोलखोल करणारा ठरला असता. तेव्हा पुन्हा चीनच्याच दारात कटोरा नेण्याची पळवाट आणि ‘झाकली मूठ सहा अब्ज डॉलर्स’ची त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. कालपर्यंत सौदी-अरेबिया, अमेरिका हे पाकिस्तानचे ‘दाते’ होते, आता ही जागा चीनने घेतली आहे. पाकिस्तानच्या हातातील ‘कटोरा’ मात्र कायम राहिला आहे. या दुरवस्थेसाठी पाकिस्तान स्वतःच जबाबदार आहे. तेच त्या देशाचे वर्तमान आहे आणि भविष्यदेखील!