आजचा अग्रलेख : पंजाब सांभाळा!

सरकार फक्त निवडणुका जिंकण्यामागे लागले आहे. राज्यकर्ते निवडणूकग्रस्त झाले की प्रशासन, पोलीसही ढिले पडतात व त्यामुळे अतिरेक्यांचे फावते. कश्मीरात अशांतता आहेच, पण शांत झालेले पंजाब पुन्हा पेटू नये. निवडणुका येतील आणि जातील, पंजाबवरचा घाव हा देशावरचा घाव हे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षांत काहीच केले नाही हे मोदींचे म्हणणे मान्य, पण पंजाबातील रक्तपाताकडे गांभीर्याने पहा इतकेच आम्हाला गंभीरतापूर्वक सांगायचे आहे.

पंतप्रधान मोदी हे तीन राज्यांच्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. काँग्रेस व गांधी घराण्यास ते जाहीर सभांतून झोडत आहेत. त्याच वेळी पंजाबात भयंकर दहशतवादी हल्ला झाला असून त्यात काहींचा मृत्यू झाला आहे आणि असंख्य जखमी झाले आहेत. कश्मीरमधील हिंसाचाराशी मुकाबला सुरू असतानाच आता पंजाबमध्येही पुन्हा दहशतवादी कारवाया सुरू झाल्या तर देशात अस्थिरता माजायला वेळ लागणार नाही. अमृतसरपासून जवळच असलेल्या अडिलवाल येथील निरंकारी भवनात प्रार्थना सभेसाठी भक्त जमले असतानाच त्या मंचवर बॉम्बहल्ला करण्यात आला. प्रार्थना सभेचे रूपांतर शोकसभेत झाले व तिथे एकच हलकल्लोळ झाला. ऐंशी व नव्वदच्या दशकात पंजाब दहशतवादाने संपूर्ण छिन्नविच्छिन्न झाला होता. पंजाबने रक्ताचे पाट व मृतांचे ढिगारे पाहिले आहेत. पंजाब समस्येने हिंदुस्थानच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी लष्करप्रमुख अरुण कुमार वैद्य, माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्यासह हजारो राजकारणी, पत्रकार, पोलीस, लष्कर व सामान्यांचे बळी घेतले. शेवटी सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून भिंद्रनवाले व त्याच्या अतिरेक्यांचा खात्मा करावा लागला. पंजाबच्या प्रश्नाने देशाला वेठीस धरले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील खलिस्तान कमांडो फोर्सच्या हिटलिस्टवर होते. पंजाब प्रश्नाची किंमत देशाने चुकवली आहे. त्याच पंजाबात पुन्हा

अतिरेक्यांनी कारवाया सुरू करणे

हे आव्हान आहे. देशाचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, पंजाबमध्ये पुन्हा बंडखोरीला हवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंजाब आज शांत असला तरी बाहेरून बंडखोरीस हवा देण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आपल्याला सावध राहिले पाहिजे. लष्करप्रमुखांनी सावधानतेचा इशारा दिला, पण इशारा हवेत विरण्याआधीच अमृतसरला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात वापरलेले ग्रेनेड एचई-36 या सीरिजचे आहेत आणि ते पाकिस्तानी सैन्यदलात वापरले जातात असे तपासात उघड झाले आहे. म्हणजेच या हल्ल्यामागेही पाकिस्तान आहे हे स्पष्ट आहे. पंजाब कुणाला पेटवायचे आहे, या प्रश्नाचे उत्तर ‘पाकिस्तान’ असे आहे. चीन व पाकिस्तानला मिळून हिंदुस्थानला पुन्हा अशांत व अस्थिर करायचे आहे आणि पंजाबात त्याची सुरुवात झाली आहे. पंजाब हल्ल्यामागे पाकिस्तानी ‘आयएसआय’ असल्याचा संशय पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला. त्याने काय होणार? लष्करप्रमुखांनी सावधानतेचा इशारा दिला व मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे पाकवर संशय व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी छत्तीसगडमधून जे या हल्ल्यात मरण पावले त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात सध्या जे घडते आहे त्यास नेहरू-गांधी परिवार जबाबदार असल्याचे मोदी पुनः पुन्हा सांगत आहेत, पण सध्या तुम्हीच सत्तेवर आहात हे तुम्ही कसे विसरता? काँग्रेसला जे जमले नाही ते

तुम्ही करून दाखवा.

कश्मीरचा प्रश्न पेटलेला असताना आता पंजाबात बॉम्ब फुटू लागले हे कसले लक्षण मानायचे? कश्मीरचा राडा तर देशाच्या पाचवीलाच पुजलेला आहे, पण पंजाबची स्थिती बिघडली तर दिल्लीच्या बुडाला व देशाच्या अस्तित्वालाच चटके बसतील. मराठय़ांप्रमाणेच शीख समाज हा शूरवीर, राष्ट्र आणि धर्माभिमानी आहे. देशाच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करण्यास सदैव सज्ज असलेले हे दोन प्रांत आपल्या अस्मितेबाबत तितकेच संवेदनशील असतात. शिवाजी महाराज व गुरू गोविंदसिंगांचे एक भावनिक नाते होते आणि मोगली आक्रमणाची पर्वा न करता ते त्याविरुद्ध लढत राहिले, पण न लढणाऱ्यांनी राज्य केले व लढणाऱ्यांचा अपमान केला. पंजाबातील हल्ल्यांमागे कश्मिरी अतिरेकी असू शकतात असे सांगितले जात आहे. ते कोणतेही अतिरेकी असोत, बळी आमच्या सामान्य जनतेचे जात आहेत. सरकार फक्त निवडणुका जिंकण्यामागे लागले आहे. राज्यकर्ते निवडणूकग्रस्त झाले की प्रशासन, पोलीसही ढिले पडतात व त्यामुळे अतिरेक्यांचे फावते. कश्मीरात अशांतता आहेच, पण शांत झालेले पंजाब पुन्हा पेटू नये. निवडणुका येतील आणि जातील, पंजाबवरचा घाव हा देशावरचा घाव हे राज्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षांत काहीच केले नाही हे मोदींचे म्हणणे मान्य, पण पंजाबातील रक्तपाताकडे गांभीर्याने पहा इतकेच आम्हाला गंभीरतापूर्वक सांगायचे आहे.