आजचा अग्रलेख : शेअर बाजाराची उसळाउसळी

95

तरुणवर्ग आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात मोदी यांच्या बाजूने एका विश्वासाने मतदान केले हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रचंड मतदानामुळेच शेअर बाजारात तेजी उसळली. त्यामुळे जी साडेपाच लाख कोटींची कमाई झाली त्याचे श्रेय गरीब आणि मध्यमवर्गीय मतदारांना द्यावे लागेल व नव्या सरकारलाही त्यांच्या कामात तेजी आणावी लागेल. बेरजेचे राजकारण सध्या सत्ता स्थापनेसाठी चालू आहे. हे बेरजेचे गणित देशाच्या अर्थकारणातही टिकले तर अर्थव्यवस्थेचे आरोग्य धडधाकट राहील!

पल्या देशात रोजच नव्या गमतीजमती घडत असतात. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा खेळही नवा नाही. सत्य आणि वास्तव याच्याशी सुतराम संबंध नसलेले लोक देशाच्या भविष्यावर उसासे सोडत असतात, हे काही नवीन नाही. इतक्या महाकाय देशात अशा गमतीजमती घडायच्याच. आताही गंमत घडली आहे. ती पाहून स्वतः नरेंद्र मोदीही खळखळून हसले असतील. केंद्रात पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’चे सरकार सत्तारूढ होत असल्याचे मतदानानंतरच्या चाचण्यांत दिसून आले. भाजप 300 पार व मोदी आरपार हे स्पष्ट होताच शेअर बाजारात प्रचंड तेजी उसळली. ही तेजीची लाट इतकी महाकाय होती की त्या तेज लाटेत 5.33 लाख कोटींची कमाई झाल्याचे सांगण्यात आले. मोदी येणारच या खात्रीने गुंतवणूकदारांत कमालीचा उत्साह संचारला व अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव वधारला. या सगळय़ांनी म्हणजे मूठभर लोकांनी मिळून 5.33 लाख कोटींची कमाई केली, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. मुंबईचा ‘स्टॉक बाजार’ म्हणजे जादूनगरीच आहे. एखादे सरकार येणार किंवा जाणार या बातमीवर तो वधारतो किंवा कोसळतो. आम्ही म्हणतो, काही झाले तरी मोदी तर येणारच होते. त्यांची लाट जनतेत याआधीच उसळली आहे. उसळलेल्या शेअर बाजारामुळे ज्यांनी साधारण

साडेपाच लाख कोटींची कमाई
एका दिवसात केली, त्यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊन ताठ कण्याने उभी राहणार आहे काय? भांडवली बाजारातील तेजीचे परिणाम सोमवारी चलन बाजारावरही झाले. डॉलरच्या तुलनेत रुपया 49 पैशांनी वधारला. आज डॉलर रुपयाच्या तुलनेत 70 रुपये वरचढ आहे. अर्थात, 70 रुपयांवरून डॉलर किमान 50 वर गडगडला तर रुपया वधारला, देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असे म्हणणाराही एक वर्ग आहेच. पण या गोष्टी अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही अवलंबून असतात. शेअर बाजारात ‘तेजी’ची लाट उसळली असतानाच लोकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव भडकले असून त्यामुळे महागाईची तेजी उसळण्याची भीती निर्माण झाली आहे. अमुलच्या दुधाचे भावही दोन रुपयांनी वाढले आहेत. म्हणजे उसळलेल्या शेअर बाजाराचा फायदा देशाच्या गोरगरीब जनतेस होत नाही. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. गुरांना चारा-पाणी नाही. लोकांना पाच-दहा मैल पायपीट करून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावेच्या गावे स्थलांतरित होत आहेत. दुष्काळ निवारण्यासाठी पैसा कमी पडत आहे व राज्य सरकारने दिल्लीच्या सरकारकडे मागणी केली आहे. केंद्रानेही काही अर्थसहाय्य दुष्काळ निवारणासाठी केले आहे, पण कालच्या

तेजीच्या लाटेत
ज्यांनी 5.33 लाख कोटीची कमाई केली त्यांनी या कमाईतील पाच हजार कोटी रुपये दुष्काळ निवारण्यासाठी दिल्याची बातमी नाही. ‘काहींनी बँका बुडवून पलायन केले तर अनेकांनी ‘कमाई’सह स्वखुशीने देश सोडला. हे चित्र चांगले नाही. देशात बेरोजगारीचा डोंगर वाढतो आहे,’ अशी टीका प्रचार काळात केली गेली, परंतु तरुणवर्ग आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात मोदी यांच्या बाजूने एका विश्वासाने मतदान केले हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रचंड मतदानामुळेच शेअर बाजारात तेजी उसळली. त्यामुळे जी साडेपाच लाख कोटींची कमाई झाली त्याचे श्रेय गरीब आणि मध्यमवर्गीय मतदारांना द्यावे लागेल व नव्या सरकारलाही त्यांच्या कामात तेजी आणावी लागेल. बाजारातील तेजीचे वारे नव्या सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या धोरणांवर अवलंबून असेल. ‘एनडीए’ पुन्हा सत्तेत येतच आहे. तेव्हा सरकारने पाच वर्षांत केलेल्या विविध सुधारणांमध्ये खंड न पडता त्यातील सातत्य टिकून राहील असे पाहायला हवे. अर्थव्यवस्थेत मजबुती हवी, शेअर बाजारातली सूज नको. कृषी, शिक्षण आणि आरोग्य, संरक्षण अशा क्षेत्रांतील तरतुदी त्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. बेरजेचे राजकारण सध्या सत्ता स्थापनेसाठी चालू आहे. हे बेरजेचे गणित देशाच्या अर्थकारणातही टिकले तर अर्थव्यवस्थेचे आरोग्य धडधाकट राहील!

आपली प्रतिक्रिया द्या