अग्रलेख : दादा, जरा जपून!

सरकारविरुद्ध जनतेत इतका रोष, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकला. ही तर २०१९ च्या भाजपच्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत. मग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर मध्यंतरी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत जे घडले त्याला काय म्हणायचे? प. बंगालात ममताही निवडणुकांमागून निवडणुका जिंकत आहेत व ममतांच्या पराभवासाठी स्वतः अमित शहा कोलकाता येथे ठाण मांडणार आहेत. अशी जिद्द इतरांकडेही असू शकते. निवडणुका काय भ्रष्ट ठरलेले लालू यादवही जिंकत आहेत व प्रामाणिकतेचे ‘रोल मॉडेल’ नितीश कुमार रोज झटके खात आहेत. तेव्हा चंद्रकांतदादा, जरा जपून! 

सांगली आणि जळगाव महापालिकांवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. दोन्ही ठिकाणी भाजपास निर्विवाद बहुमत मिळाले. त्यामुळे सत्तांतर, परिवर्तन जे व्हायचे ते झाले. या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन करायला आम्हाला जराही संकोच वाटत नाही. राजकारणात तेवढी दिलदारी असायला हवी. भारतीय जनता पक्ष चारेक वर्षांपासून विजयाचे चौकार – षटकार ठोकीत आहे. असे चौकार – षटकार पन्नास वर्षे काँग्रेसही ठोकीत होतीच. काँग्रेसच्या विजयावरही तेव्हा शंकाकुशंका घेतल्याच जात होत्या. तेव्हा मतपत्रिका होत्या व ‘शाई’चे घोटाळे उघड झाले. पुन्हा मतदान केंद्रांवरही दरोडे पडत होते. पैसे आणि दारूचे वाटप होत असे व त्याबद्दल विरोधी पक्ष आक्षेप घेत होते. आज पैसे वाटप वगैरे कसे होते व सत्तेच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्यासाठी प्रशासन कसे वापरले जाते ते जगजाहीर आहे. शिवाय मतपत्रिका आणि ‘शाई’ची जागा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने घेतली आहे आणि त्याबद्दलही लोकांच्या मनात शंका आहेत. सांगली विजयाचे शिल्पकार आणि राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता खिल्ली उडवत असे सांगितले आहे की, सांगली महापालिकेत दारुण पराभव झाल्यानंतरही विरोधकांनी अद्याप ‘ईव्हीएम’ घोळाचा आरोप कसा केला नाही याचेच आश्चर्य वाटते. चंद्रकांतदादा यांना आश्चर्य वाटणे साहजिक आहे, पण मतदान यंत्र घोळाचे आरोप दहा वर्षांपूर्वी प्रथम भाजपकडूनच झाले होते हे ते विसरलेले दिसतात. सांगलीत काय किंवा जळगावात काय, निवडणुकीपूर्वी

घाऊक पक्षांतरे

भाजपने करून घेतली. जे विजयी झाले ते भाजपचे पूर्वाश्रमीचे विरोधकच आहेत व याच मंडळींनी सांगली किंवा जळगावसारख्या शहरांची वाट लावली अशी बोंब पूर्वी भाजप मारीत होता. मात्र आता हेच ‘वाटमारे’ भाजपचे बहुसंख्य उमेदवार बनले व विजयी झाले. यावर आपल्या चंद्रकांतदादांचे म्हणणे असे की, राजकारणात हे असे पक्षबदल होतच असतात, पण त्यांच्या पक्षबदलास जनता मान्यता देते का हे महत्त्वाचे आहे. उद्या याच विचाराने भाजपने छिंद्रमला पुन्हा कवटाळले व जिंकणारा उमेदवार म्हणून तिकीट दिले तरी आश्चर्य वाटायला नको. ‘जो जीता वहीं सिकंदर’ असे म्हणावेच लागते. तीच जगाची रीत आहे. सांगली, मिरज, कुपवाडा महापालिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्यातलेच ‘सब घोडे बारा टके’ घेऊन भाजपने विजय मिळवला. त्या विजयात संभाजी भिडे यांचीही साथ आहे. जळगाव-सांगलीमध्ये आज जे भाजपबरोबर गेले आहेत ती सत्तेबरोबर आलेली सूज आहे. सत्ता आली की, अशी ‘सूज’ येतच असते. त्यामुळे हे काही चांगल्या राजकीय आरोग्याचे लक्षण नाही. आज सत्तेमुळे भाजपात आलेली मंडळी उद्या सत्ता नसताना दुसरीकडे गेलेली असतील आणि पक्षाला आज जी सूज आलेली दिसत आहे ती उतरलेली असेल. त्या पक्षाच्या दादा-भाऊ यांनी हे लक्षात घेतलेले बरे! जळगावात कालपर्यंत जे महापौर नालायक, अकार्यक्षम, शहराची वाट लावणारे ठरले ते एका रात्रीत भाजपच्या पायरीवर चढतात व पवित्र होतात. पूर्वी धर्मांतरे, पक्षांतरे होत असत, पण आता ‘भ्रष्टांतरे’ होऊ लागली व त्यावर

मांगल्याचे अभिषेकही

होऊ लागले. सांगलीत शिवसेनेस यश मिळाले नाही व भाजप शून्यातून सत्तेवर आला म्हणून आम्हांस वाईट वाटण्याचे कारण नाही. राजकारणात हार-जीत, चढ-उतार होतच असतात. राजकारणात कधी कुणी संपत नाही. जळगावात जुन्या सत्ताधार्‍यांविरुद्ध रोष होताच व पुन्हा ज्यांची सत्ता वर असते ते खाली विरोधकांकडे असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांची गळचेपी करतात. त्यात शहरांचे नुकसान होते. हे सूडाचे राजकारण सर्वच पातळ्यांवर चालते व त्यासाठी ‘आयुक्त’ किंवा ‘सीईओ’ नामक राजकीय एजंट मानगुटीवर बसवला जातो. तरीही महाराष्ट्रात सरकारविरुद्ध जनतेत इतका रोष, संताप, नाराजी असताना भाजप सांगली-जळगावमध्ये जिंकला. ही तर २०१९ च्या भाजपच्या विजयाची नांदी आहे असे शंख फुंकले जातच आहेत. मग ही जर भाजपवाल्यांना त्यांच्या विजयाची नांदी वाटत असेल तर मध्यंतरी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत जे घडले त्याला काय म्हणायचे? अगदी पालघरमधील पोटनिवडणुकीतही विजय मिळवताना भाजपची जी प्रचंड दमछाक झाली ती कशाची नांदी म्हणायची? प. बंगालात ममताही निवडणुकांमागून निवडणुका जिंकत आहेत व ममतांच्या पराभवासाठी स्वतः अमित शहा कोलकाता येथे घर घेऊन ठाण मांडणार आहेत. अशी जिद्द इतरांकडेही असू शकते. निवडणुका काय भ्रष्ट वगैरे ठरलेले लालू यादवही जिंकत आहेत व प्रामाणिकतेचे ‘रोल मॉडेल’ नितीश कुमार रोज झटके खात आहेत. तेव्हा चंद्रकांतदादा, जरा जपून!

2 प्रतिक्रिया

  1. विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर नगर पालिका,जिल्हा परिषदा,पालघर आणि इतरही काही असल्यास त्या निवडणुकात “जरा जपून”हे धोरण अवलंबले म्हणून आपला पक्ष कित्येक ठिकाणी जपून जपून चौथ्या स्थानापर्यंत सरकला.आता जरा धडाडी दाखवा