आजचा अग्रलेख : पुन्हा दंतेवाडा!

2

हिंदुस्थानसारख्या बलाढय़ आणि खंडप्राय देशाला मूठभर नक्षलवादी आव्हान देतात आणि हवा तेव्हा हिंसाचार घडवून दहशत निर्माण करतात ही लाजिरवाणी बाब आहे. मुळात नक्षलवाद्यांपर्यंत इतक्या मोठय़ा प्रमाणात  स्फोटके, शस्त्रास्त्र आणि दारूगोळा पोहचतोच कसा? दंतेवाड्यात नक्षलींनी पुन्हा एकदा घडवलेल्या रक्तपाताने हा जुनाच प्रश्न नव्याने विचारावा लागत आहे!

निरपराधांच्या रक्ताला चटावलेली नक्षलवादी चळवळ दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे. त्यावर लवकर इलाज शोधला नाही तर हिंदुस्थानसाठी ती मोठी डोकेदुखी ठरेल. छत्तीसगडमधील सुकमा, बस्तर आणि दंतेवाडा हा परिसर तर नक्षलवाद्यांचे ‘नंदनवन’च बनले आहे. निवडणुका आणि लोकशाही व्यवस्थेकडे नक्षलवादी संघटना आणि त्यांचे म्होरके शत्रू म्हणूनच बघतात. त्यामुळे निवडणुका तोंडावर आल्या रे आल्या की नक्षलवाद्यांच्या हिंसाचारास जोर चढतो असा आजवरचा अनुभव आहे. आताही तेच घडले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 91 मतदारसंघांत आज मतदान होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी या सर्व मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच नक्षलवाद्यांनी हिंसाचाराच्या तोफा बाहेर काढल्या. प्रचार संपण्यास अवघे दोन तास शिल्लक असताना छत्तीसगडच्या दंतेवाडा भागात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचार ताफ्यावर भयंकर हल्ला चढवला. यात भाजपचे आमदार भीमा मंडावी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले चार जवान मृत्युमुखी पडले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलींकडून हिंसक हल्ले होण्याची शक्यता असल्याचे एक-दोन नव्हे तर दिवसभरात तब्बल

सत्तावीस वेळा ऍलर्ट

दिले गेले होते. दंतेवाडाचे आमदार भीमा मंडावी यांनाही सुरक्षा यंत्रणांनी या भागात प्रचाराला न जाण्याची विनंती केली होती, मात्र धोक्याची सूचना मिळूनही ते प्रचाराला गेले अशी माहिती आता पुढे येत आहे. नक्षलवाद्यांनी निवडणुकांवर टाकलेला बहिष्कार आणि त्यांची दहशत मोडून काढायला हवी हे खरेच, पण त्यासाठी आपले आणि सुरक्षा व्यवस्थेतीतील जवानांचे प्राण धोक्यात घालण्यात काय हशील? हा धोका पत्करून आमदार मंडावी शेवटच्या प्रचारसभेत गेले आणि नको ते घडले. शामगिरी परिसरातील जंगलातून ज्या मार्गाने प्रचाराचा ताफा जाणार होता त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी आधीच शक्तिशाली विस्फोटक पेरून ठेवले होते. आमदार मंडावी यांची बुलेटफ्रूफ गाडी त्यावरून जाताच भयंकर धमाका झाला आणि एका क्षणात गाडीचे तीन तुकडे झाले. 200 मीटर अंतरावर लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी ट्रीगरद्वारे स्फोट घडविल्यानंतर मंडावी यांच्या गाडीमागे असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनांवरही अंदाधुंद गोळीबार केला आणि जवानांच्या बंदुका घेऊन ते पळून गेले. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला तिथे पाच मीटर रुंद आणि सहा मीटर खोल खड्डा झाला आहे. त्यावरून नक्षलवाद्यांनी या भूसुरुंगासाठी 45किलो विस्फोटक वापरले असावे असा अंदाज आता पोलीस व्यक्त करत आहेत. नेहमीप्रमाणे आता या नक्षली हल्ल्याचीही

चौकशी वगैरेचा सोपस्कार

पार पडेल, पण एक लोकप्रतिनिधी आणि शहीद झालेल्या चार जवानांचे प्राण त्याने परत येणार आहेत काय? सहा वर्षांपूर्वी सुकमाच्या जंगलात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी असाच हल्ला चढवला होता. नक्षलवादी तब्बल दोन तास बेछुट गोळीबार करत होते. माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल, काँग्रेसचे छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, महेंद्र कर्मा यांच्यासह 30जण त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्या आधी दंतेवाडाच्याच जंगलात नक्षलींनी 75 जवानांची निर्घृण हत्या केली होती. नक्षलवाद्यांनी हिंसाचार केला नाही असा एकही महिना जात नाही. हिंदुस्थानसारख्या बलाढय़ आणि खंडप्राय देशाला मूठभर नक्षलवादी आव्हान देतात आणि हवा तेव्हा हिंसाचार घडवून दहशत निर्माण करतात हे चित्र कधी बदलणार आहे? वीरप्पनसारखा एक कुख्यात चंदन तस्कर जंगलात राहून आपल्या देशाला कित्येक वर्षे खेळवतो आणि जंगलातूनच हिंसक कारवाया घडवणारे नक्षलवादी वर्षानुवर्षे सुरक्षा दलांची हत्याकांडे घडवतात हे वेदनादायी आहे. मुळात नक्षलवाद्यांपर्यंत इतक्या मोठय़ा प्रमाणात  स्फोटके, शस्त्रात्रे आणि दारूगोळा पोहोचतोच कसा? दंतेवाड्यात नक्षलींनी पुन्हा एकदा घडवलेल्या रक्तपाताने हा जुनाच प्रश्न नव्याने विचारावा लागत आहे!