आजचा अग्रलेख : धार्मिक अधिष्ठान आहेच… पण मेहनतीला पर्याय नाही

3

महाराष्ट्रातील शेकडो गावांतील दुष्काळग्रस्त पोटापाण्यासाठी स्थलांतर करीत आहेत. त्यांना कसे रोखायचे, हा कळीचा प्रश्न आहे. कारण दुष्काळाचे संकटच भयंकर आहे. सरकार, प्रशासन यांची एकजूट व भावनेचा ओलावाच दुष्काळाशी सामना करू शकेल. पांडुरंगाचे आशीर्वाद आहेतच. त्यात मुख्यमंत्र्यांनी उज्जैनला जाऊन महांकालेश्वरासही अभिषेक घालून साकडे घातले आहे. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यालाही धार्मिक अधिष्ठान होतेच. तेव्हा महाराष्ट्राला धार्मिक अधिष्ठान आहेच, पण शेवटी दुष्काळाला तोंड देण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही.

हिंदुस्थानच्या राजकारण्यांना लोकांच्या जीवनमरणाची खरोखरच चिंता आहे काय? ते नक्की कोणत्या जगात वावरत आहेत? देशातील लोकसभा निवडणुकीतील लढाई जवळजवळ अंतिम टप्प्यात आली आहे आणि प्रचाराच्या पातळीचा प्रश्न नेहमीप्रमाणे उपस्थित केला जात आहे. पस्तीस वर्षांपूर्वी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘आयएनएस विराट’ युद्धनौकेची खासगी पर्यटन टॅक्सी केल्याचे प्रकरण गाजते आहे. यावर काँग्रेसच्या मंडळींनी अक्षयकुमारलाही पंतप्रधान मोदी यांनी एका युद्धनौकेवर नेल्याचे पोरकट प्रकरण काढले. मात्र या दोन्ही प्रकरणांत जमीन-अस्मानचे अंतर आहे. अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय ही एक तांत्रिक बाब आहे. मात्र गेल्या काही वर्षांत अक्षयकुमारने शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आपल्या कमाईतील मोठा वाटा दिला आहे. तरुणवर्गात देशभक्तीचा जोश निर्माण करण्यासाठी अक्षय गेली अनेक वर्षे अनेक उपक्रम राबवीत आहे. त्यामुळे हे वाद निरर्थक आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्रासह देशभरात सध्या जे तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळाचे संकट घोंगावते आहे त्याचा विचार सर्वांनीच करायला हवा. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उज्जैनला महांकालेश्वर मंदिरात जाऊन महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा, दुष्काळ संपावा यासाठी अभिषेक केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्राची ‘माऊली’ विठुरायासही शासकीय पूजा घालून असे साकडे नेहमीच घातले जाते. याप्रकारचे धार्मिक अधिष्ठान राज्यकर्ते आणि प्रशासनाचे आत्मबल वाढवत असते. अर्थात देवाला साकडे घातले की कर्तव्य संपले असे होत नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दुष्काळ निवारणासाठी सगळ्यांनी झटणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागरपूरच्याच बाजूला असलेल्या वर्धा जिल्ह्यात चारापाण्याअभावी पाऊण लाख जनावरे मरणपंथास लागली आहेत व त्यात ‘गोमाता’ मोठ्या संख्येने आहेत. गाईंना कसायांच्या दारात ढकलू नये यासाठी सध्या रक्तपात होतो, पण कसायांच्या दारात न ढकलता हे

गोधन कसे वाचवायचे

यावर कुणीही बोलायला तयार नाही. जनतेला प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही. महाराष्ट्रातला पाणीसाठा जवळजवळ संपला आहे व मुंबईसारख्या शहरालाही पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता वाढली आहे. मुंबईच्या शेजारी असलेल्या पालघर जिह्यातील जव्हार आणि मोखाडा हे दोन तालुकेही पाणीटंचाईच्या तडाख्यात सापडले आहेत. तेथील काही गावे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेली आहेत. सध्या तिथे टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी राज्याच्या ग्रामीण भागाची दुष्काळी दशा किती भयंकर आहे याचा अंदाज त्यावरून येतो. एकट्या सातारा जिल्ह्याचेच उदाहरण घ्या. सातारा जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या 747 तलावांपैकी 713 तलाव संपूर्ण कोरडे पडले आहेत. माण-खटाव तर अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. कोयनेचे पाणी कर्नाटकला देण्यास शिवसेना आमदार शंभुराजे देसाई यांनी कडाडून विरोध केला. त्यामागील वेदना समजून घेतली पाहिजे. मराठवाड्यात तर दुष्काळाची तीव्रता सगळ्यात जास्त जाणवत आहे. संभाजीनगर व आसपास 90 गावे पाण्याअभावी स्थलांतर करीत असल्याचे चित्र विदारक आहे. गावेच्या गावे स्थलांतरित झाली तर त्यांची पावले शेवटी शहरांकडेच वळतात. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर पहिला हक्क महाराष्ट्रातील मराठी कष्टकर्‍यांचाच आहे. या कष्टकर्‍यांनीच मुंबई घडवली, पण मुंबईचे रक्त कुणी दुसरेच शोषत आहेत. मुंबई देशाचे पोट भरत असते. मुंबई देशाला सगळ्यात जास्त पैसा कररूपाने देते. आता दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्र केंद्राकडे हक्काने व अधिकाराने मागणी करीत आहे. कश्मीरातील अतिरेक्यांच्या मृत कुटुंबीयांना मदत आणि नुकसानभरपाई देणारा हा देश आहे. शेतकर्‍यांसही त्यांना जगवावेच लागेल. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात असल्याची माहिती सरकारच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यानेच दिली. कृषी क्षेत्राची दैन्यावस्था हेसुद्धा त्यामागील एक कारण आहे. चीनमधील कारभार बंद करून 200 अमेरिकन कंपन्या म्हणे हिंदुस्थानात येणार आहेत, पण 60 टक्के उपजीविकेचे मुख्य साधन असलेला शेती हा आपल्या देशातील महत्त्वाचा उद्योग उद्ध्वस्त होत आहे. अर्थात

शेती क्षेत्राची ही दैन्यावस्था

गेल्या चार वर्षांत झालेली नाही. दशकानुदशके चुकलेल्या कृषी धोरणांचा हा परिणाम आहे आणि त्यासाठी आजवरची सगळीच सरकारे जबाबदार आहेत. त्यामुळेच दुष्काळ आणि रोजगाराचा अभाव अशा दुहेरी संकटात राज्यातील ग्रामीण जनता सापडली आहे. थेंब थेंब पाणी आणि पै पै पैशासाठी लोकांना झुंजावे लागत आहे. नगर जिह्यातील चिंचोडी पाटील येथील संगीता फसले यांना मुलाची बेरोजगारी आणि दुष्काळामुळे मजुरीची कामे मिळत नसल्याने होत असलेली आर्थिक ओढाताण असह्य झाली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी गळफास लावून घेत स्वतःचे जीवन संपवले. महाराष्ट्रात अशा अनेक दुर्दैवी ‘संगीता’ आज आत्महत्येच्या कड्यावर उभ्या आहेत. त्यांना त्यापासून परावृत्त करणे आणि किमान सुसह्य जीवन कसे जगता येईल हे पाहणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी सरकारने बीड, धाराशीव, माण, खटाव येथे ठाण मांडून बसले पाहिजे. चंद्रकांत पाटील बारामतीत चार दिवस ठाण मांडून बसले होते. त्यामुळे तिथे पवारांचा पराभव होण्यापासून किंवा राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्री होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाहीत, पण महाराष्ट्रातील शेकडो गावांतील दुष्काळग्रस्त पोटापाण्यासाठी स्थलांतर करीत आहेत. त्यांना कसे रोखायचे, हा कळीचा प्रश्न आहे. कारण दुष्काळाचे संकटच भयंकर आहे. राज्यात टँकरद्वारा पाणीपुरवठा अनेक ठिकाणी होत असला तरी तो अपुरा पडत आहे. तो वाढवण्याची आणि जनावरांच्या छावण्यांचे नियोजन अधिक काटेकोर करण्याची गरज आहे. सरकार, प्रशासन यांची एकजूट व भावनेचा ओलावाच दुष्काळाशी सामना करू शकेल. पांडुरंगाचे आशीर्वाद आहेतच. त्यात मुख्यमंत्र्यांनी उज्जैनला जाऊन महांकालेश्वरासही अभिषेक करून साकडे घातले आहे. विठूराया आणि महांकालेश्वराचा आशीर्वाद दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी नक्कीच लाभदायक ठरेल. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यालाही धार्मिक अधिष्ठान होतेच. तेव्हा महाराष्ट्राला धार्मिक अधिष्ठान आहेच, पण शेवटी दुष्काळाला तोंड देण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. ही मेहनत आपल्यालाच करायची आहे. राज्यात चांगलेच होईल याविषयी आम्हाला खात्री आहे.