आजचा अग्रलेख : 23 लाच पाहू!

281

एकूणच राष्ट्रीय पातळीवरील एक्झिट पोलमधून देशाचा कौल स्पष्ट होत आहे. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने हा कौलनाकारला आहे. 23 लाच काय ते बघू असे सांगितले. त्यांचे म्हणणेदेखील खरे आहे. 23 तारखेस ईव्हीएमची कुलपे उघडली जातील व दुपारपर्यंत कोण उसळले, कोण आपटले याचा फैसला होईल. तोपर्यंत जो तो आम्हीच येणार, आमच्याशिवाय आहेच कोण?’ असा दावा करायला मोकळा आहे. आम्ही स्वतः खात्रीने सांगतो की, नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत व काँग्रेस पक्षासह त्यांची आघाडी कुचकामी ठरणार आहे.

मतदानाच्या सर्व फेऱया संपल्यानंतर जे कल आले आहेत ते पुन्हा एकदा मोदी सरकारच्या बाजूने आहेत. मतदानाआधी आणि मतदानानंतर चाचण्या घेण्याची एक पद्धत जगभरात विकसित झाली आहे. त्यानुसार हे कल प्रसिद्ध केले जातात. मोदी सरकार पुन्हा येत आहे याचा अंदाज येताच शेअर बाजारही उसळला आहे. सट्टाबाजारही म्हणे तेजीत आला आहे. अर्थात शेअर बाजार उसळावा, सट्टाबाजाराची चांदी व्हावी म्हणून जनतेने नरेंद्र मोदी यांना मतदान केलेले नाही. देशाचे भविष्य आणि वर्तमान सुरक्षित राखण्यासाठीच देशाने मोदी यांना मतदान केले आहे. एक्झिट पोलवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एक्झिट पोलचे अंदाज साफ फेटाळून लावले. या मतदानोत्तर चाचण्या वगैरे बकवास आहे. या आकडय़ांवर विश्वास ठेवता येत नाही. जगभरात अशा चाचण्या फेल गेल्याचे उपराष्ट्रपती नायडू यांनी सांगितले. 1999 पासून हिंदुस्थानात जाहीर झालेले एक्झिट पोल चुकीचे ठरत गेले आहेत. 23 मे रोजी जाहीर होणारे निकाल वेगळे असू शकतात. प्रत्येकच पक्षाला आपणच जिंकू अशी आशा असते, पण या

विश्वासाला काही आधार

नसतो, असेही व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. प. बंगालातून ममता बॅनर्जी यांनीही नेहमीप्रमाणे डरकाळी फोडली आहे. लोकांनी एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नये. ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार करण्याचा हा डाव असल्याचे श्रीमती ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे. या चाचण्यांमध्ये बंगालात तृणमूल काँग्रेसची घसरण स्पष्ट दिसत असून भाजप मुसंडी मारत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची आगपाखड समजण्यासारखी आहे. ज्या विविध चाचण्यांचे आकडे आले त्या सर्वांचा ‘सूर’ आणि ‘कल’ एकच आहे. तो म्हणजे केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येत आहे. एनडीएला किमान 350 जागा मिळत आहेत व काँग्रेस शंभरचा टप्पा पार करताना दिसत नाही. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व मध्य प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यांत भाजपप्रणीत एनडीएची घोडदौड स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपास ऐतिहासिक विजय मिळेल. आम्ही मतदानानंतरच्या चाचण्यांवर जाऊ इच्छित नाही, तर लोकांचा जो उत्साह आम्ही पाहिला त्यानंतर महाराष्ट्राचा कल आणि कौल स्पष्टच झाला होता. 2019 साली पुन्हा एकदा

मोदींचेच सरकार

येईल हे सांगण्यासाठी कुणा पंडिताची गरज नव्हतीच. यंदाची निवडणूक लोकांनीच जणू हातात घेतली व मोदी यांना भरभरून मतदान केले. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढसारख्या राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत. त्या राज्यांतील चाचण्यांतही मोदी यांनाच आघाडी मिळत आहे.  एकूणच राष्ट्रीय पातळीवरील ‘एक्झिट पोल’मधून देशाचा कौल स्पष्ट होत आहे. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने हा ‘कौल’ नाकारला आहे. 23 लाच काय ते बघू असे सांगितले. त्यांचे म्हणणेदेखील खरे आहे. 23 तारखेस ‘ईव्हीएम’ची कुलपे उघडली जातील व दुपारपर्यंत कोण उसळले, कोण आपटले याचा फैसला होईल. तोपर्यंत जो तो ‘आम्हीच येणार, आमच्याशिवाय आहेच कोण?’ असा दावा करायला मोकळा आहे. आम्ही स्वतः खात्रीने सांगतो की, नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत व काँग्रेस पक्षासह त्यांची आघाडी कुचकामी ठरणार आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल हेसुद्धा राहुल गांधी यांचे यशच मानावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या