आजचा अग्रलेख : ‘ऑनर किलिंग’चा विळखा

2

काळ बदलला, प्रगती झाली, जग ‘ग्लोबल’ झाले असे फक्त म्हणायचे. कधी ‘वंशाच्या दिव्या’च्या अट्टहासापायी तर कधी खोट्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी ‘पणती’ विझवायची. महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्यदेखील या दुर्दैवी फेर्‍यापासून मुक्त नाही. ऑनर किलिंगचा विळखा महाराष्ट्राभोवतीही घट्ट होत आहे का? या विळख्यात महाराष्ट्राचा समाज सुधारणेचा श्वास गुदमरतो आहे का? महाराष्ट्राचे पुढारपण ऑनर किलिंगच्या वाढत्या धब्ब्यांनी काळवंडले जात आहे का? नगर जिल्ह्यातील निघोज येथील दुर्दैवी घटनेने असे अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले आहेत. 

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेणारे राज्य असे म्हटले जाते. मात्र खोट्या जातीय अभिमानाचे भूत महाराष्ट्राच्याही मानगुटीवरून उतरायला तयार नाही. नगर जिल्ह्यातील ‘ऑनर किलिंगने हेच पुन्हा सिद्ध केले आहे. गुन्हा नेहमीचाच, आंतरजातीय विवाह केल्याचा. मुलीच्या घरच्यांचा त्याला विरोध होता आणि तरीही मुलीने त्याच मुलाशी विवाह केला. त्यामुळे बिथरलेले मुलीचे वडील, मामा आणि काका यांनी मुलीसह जावयाला जिवंत पेटवून दिले. त्यात मुलगी रुक्मिणी रणसिंग मरण पावली तर जावई मंगेश मृत्यूशी झुंज देत आहे. मुलीचे काका आणि मामा यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि फरार वडिलांचा शोध सुरू आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर बसलेला आणखी एक धब्बाच आहे. नगर जिल्ह्यात याआधीही आंतरजातीय विवाहाचा शेवट रक्तरंजित झाला आहे. अत्यंत निर्घृणपणे आणि थंड डोक्याने आपल्याच पोटच्या गोळ्याच्या हत्या करण्यात आल्या आहेत. नगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अशाच प्रकारची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. नेवासा तालुक्यातदेखील ऑनर किलिंगचा प्रकार घडला होता. फक्त नगरच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, प. महाराष्ट्र, मराठवाडा, रायगड, मुंबई-पुणे, खान्देश अशा सर्वच ठिकाणी ऑनर किलिंगच्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. दोन वर्षांपूर्वी तर बुलढाण्यात आंतरजातीय विवाह करता येत नाही म्हणून विषप्राशन करून

आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या

मुलीला तिच्या वडिलांनी वाचवले. तिला पसंत असलेल्या युवकासोबत तिचा विवाहदेखील लावून दिला. मात्र त्याबद्दलचा संतापाचा लाव्हा मुलगी घरी येताच उफाळून आला आणि मुलीचा जीव घेऊनच पित्याच्या मनातील ही खदखद शांत झाली. धुळे जिल्ह्यात कासारे गावात खोट्या प्रतिष्ठेपायी एका शिक्षकाने प्रेमविवाह केलेल्या आपल्या जिवंत मुलीचा अंत्यविधी करण्याचे जाहीर केले. संपूर्ण गावाला त्याचे आमंत्रण दिले, त्याचे मोठे फलकही लावले. त्यांनी मुलीचा प्रत्यक्ष जीव घेतला नाही, तर तिला ‘जिवंतपणी मारले’च. गेल्या वर्षी शेतात काम करणार्‍या सालगड्यासोबत प्रेमविवाह केला म्हणून सोलापुरातील बी.ए.एम.एस. होणारी एक मुलगी ‘ऑनर किलिंग’ची बळी ठरली होती. तिचा जीवही तिच्या आईवडिलांनीच घेतला होता. जातीय अभिनिवेश आणि ‘समाज काय म्हणेल?’ या भीतीपोटी म्हणा अथवा दहशतीपायी म्हणा, जन्मदातेच अनेकदा मुलींचा ‘काळ’ बनतात. पुन्हा सामाजिक चालीरीतींचा मुलामा देऊन हे सर्व प्रकार समर्थनीय ठरवले जातात. पोटच्या मुलीचा जीव खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपुढे गौण ठरतो. कुठून येतो एवढा अमानुषपणा? जीवघेणी संवेदनहीनता? जगात सर्वत्रच ऑनर किलिंग होत असते. हिंदुस्थान आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. प्रश्न इतकाच की माणसाची आर्थिक, शैक्षणिक, तांत्रिक अशी

प्रगती होत असली तरी

अनिष्ट रूढी-परंपरा, खोटी सामाजिक प्रतिष्ठा, उच्च-नीच भेदभाव, जातीय श्रेष्ठत्व हे कलंक कायम का राहिले आहेत? एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या करून पोटच्या गोळ्याला पोटातच मारायचे आणि दुसरीकडे मनाविरुद्ध, जातीबाहेर लग्न केले म्हणून तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या, वाढवलेल्या मुलीचाही तेवढ्याच निर्घृणपणे बळी घ्यायचा! कधी आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलगी आणि मुलगा या दोघांनाही ठार करायचे. कधी आई-बाप मुलीच्या जिवावर उठतात तर कधी ‘रक्षाबंधना’चे वचन दिलेला भाऊच यमदूत बनतो. सरकार एकीकडे ‘बेटी बचाओ’चा नारा देते, महिला सक्षमीकरणाच्या योजना राबविते. समाजदेखील त्यात सहभागी होतो. मात्र वेळ आली की, तोच समाज कधी स्त्रीभ्रूणहत्या करतो तर कधी ऑनर किलिंग. कधी एकतर्फी प्रेमातून स्त्रीचा बळी घेतो तर कधी ऑसिड हल्ला करून जिवंतपणी तिला मरणयातना भोगायला भाग पाडतो. काळ बदलला, प्रगती झाली, जग ‘ग्लोबल’ झाले असे फक्त म्हणायचे. कधी ‘वंशाच्या दिव्या’च्या अट्टहासापायी तर कधी खोट्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी ‘पणती’ विझवायची. महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्यदेखील या दुर्दैवी फेर्‍यापासून मुक्त नाही. ऑनर किलिंगचा विळखा महाराष्ट्राभोवतीही घट्ट होत आहे का? या विळख्यात महाराष्ट्राचा समाज सुधारणेचा श्वास गुदमरतो आहे का? महाराष्ट्राचे पुढारपण ऑनर किलिंगच्या वाढत्या धब्ब्यांनी काळवंडले जात आहे का? नगर जिल्ह्यातील निघोज येथील दुर्दैवी घटनेने असे अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले आहेत.