अग्रलेख : ‘तो’ स्वातंत्र्य दिन कधी?

देशाच्या सीमा असुरक्षित तर देशांतर्गत सामाजिक वातावरण तणावपूर्ण अशी सध्या स्थिती आहे. शेतकऱ्याची दैन्यावस्था संपलेली नाही. देश पारतंत्र्यात होता तेव्हाही देशासमोर हेच सारे प्रश्न होते. या समस्यांच्या पारतंत्र्यातून देशाची सुटका व्हावी म्हणूनच सात दशकांपूर्वी लाखो स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांनी सर्वस्वाचा होम केला. बलिदाने दिली. मात्र ती खऱ्या अर्थाने सार्थकी लागली का? मागील ७० वर्षांत देशाने नक्कीच प्रगतीची झेप घेतली, पण स्वातंत्र्याला आव्हान देणारे प्रश्न तसेच आहेत. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी ते सोडविण्याच्या आणाभाका घेतल्या जातात, मात्र प्रश्न आणि आव्हाने तशीच राहतात. ती मोडून काढत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र कधी होणार? ‘तोस्वातंत्र्य दिन कधी साजरा होणार?

स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक देशासाठी आणि देशवासीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस. तसा तो आपल्या सर्वांसाठीही आहेच. त्याच उल्हासात आणि उत्साहात आजचा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा होईल. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून भाषण करतील. या भाषणासाठी पंतप्रधान मोदी यांनी जनतेकडूनच सूचना मागविल्या होत्या. त्याला प्रतिसाद म्हणून तीस हजारांहून अधिक लोकांनी त्यांची मते कळवली आहेत. लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे जे भाषण होईल त्यात यापैकी महत्त्वाच्या सूचनांचा निश्चितपणे समावेश असेल. पंतप्रधान त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार त्यांचा उल्लेख कदाचित सूचनाकर्त्यांच्या नावानिशीही करतील. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर असल्याने आपल्या सरकारचा लेखाजोखा लाल किल्ल्यावरून मांडण्याची संधी पंतप्रधान साधतीलच. त्यात काही अस्वाभाविकही नाही. मात्र त्याच वेळी देशाचे स्वातंत्र्य ७२ व्या वर्षांत पोहोचूनही अनेक प्रश्न, आव्हाने, संकटे तशीच का कायम राहिली आहेत याचाही विचार करावा लागेल. मधल्या काळात काही प्रश्न नव्याने निर्माण झाले का? आधीच्याच काही समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनल्या का? देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा

सुरक्षित आणि सुव्यवस्थित

का नाही? ‘अच्छे दिन’ किंवा प्रत्येक देशवासीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन बाजूला ठेवले तरी देशाची अर्थव्यवस्था आणि येथील सामान्य माणसाचे, शेतकरी-कष्टकरी-कामकरी वर्गाचे राहणीमान मागील चार वर्षांत किती उंचावले? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची भेंडोळी आजही तशीच आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीचे श्रेय विद्यमान राज्यकर्ते घेत असतात. मग तरीही आर्थिक प्रगतीचा दर अद्याप अपेक्षित उंची का गाठू शकलेला नाही? स्वातंत्र्य दिनाच्याच पूर्वसंध्येला रुपयाने मागील सात दशकांचा नीचांकी तळ का गाठला? कारणे काहीही असली तरी रुपयाचा हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात खालचा स्तर आहे ही वस्तुस्थिती आहे. रुपयाचे ‘स्वातंत्र्य’ आणखी धोक्यात येणार नाही याची काय खबरदारी सरकार घेत आहे हेदेखील लोकांना जाणून घ्यायचे आहे. गेल्या वर्षी डोकलामप्रश्नी हिंदुस्थान सरकारने मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवीत चीनला दोन पावले मागे घेणे भाग पाडले असे सांगितले गेले. मग आता स्वातंत्र्य दिनाच्या दोनच दिवस आधी चिनी माकडांनी लडाखमध्ये परत ‘उडय़ा’ का मारल्या? घुसखोरी करीत तंबू कसे उभारले? या प्रश्नांचे काय उत्तर सरकारकडे आहे? पाकिस्तानकडूनही शस्त्र्ासंधी उल्लंघन, सीमेपलीकडून गोळीबार, जम्मू-कश्मीरातील

दहशतवादी हल्ले

सुरूच आहेत. भले आमचे जवान त्याला मूंहतोड जवाब देत आहेत, पाकिस्तानचे बंकर उद्ध्वस्त करीत आहेत, त्यांचे सैनिक मारत आहेत, पण पाकडय़ांच्या कुरापती ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतरही थांबलेल्या नाहीत. पुन्हा याही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘दहशतवादी हल्ल्याचा धोका, हाय ऍलर्ट’, ‘जम्मू-कश्मीरमधील लष्करी तळांवर हल्ले होणार’, ‘दहशतवादी हिंदुस्थानात घुसले आहेत’, ‘हिंदुस्थानी हवाई दलाच्या गणवेशात फिरणाऱ्या संशयित दहशतवाद्याला अटक’ अशा नेहमीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याच. देशाच्या सीमा असुरक्षित तर देशांतर्गत सामाजिक वातावरण तणावपूर्ण अशी सध्या स्थिती आहे. शेतकऱ्याची दैन्यावस्था संपलेली नाही. देश पारतंत्र्यात होता तेव्हाही देशासमोर हेच सारे प्रश्न होते. या समस्यांच्या ‘पारतंत्र्या’तून देशाची सुटका व्हावी म्हणूनच सात दशकांपूर्वी लाखो स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांनी सर्वस्वाचा होम केला. बलिदाने दिली. मात्र ती खऱ्या अर्थाने सार्थकी लागली का? मागील ७० वर्षांत देशाने नक्कीच प्रगतीची झेप घेतली, पण स्वातंत्र्याला आव्हान देणारे प्रश्न तसेच आहेत. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी ते सोडविण्याच्या आणाभाका घेतल्या जातात, मात्र प्रश्न आणि आव्हाने तशीच राहतात. ती मोडून काढत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र कधी होणार? ‘तो’ स्वातंत्र्य दिन कधी साजरा होणार?