आजचा अग्रलेख : लढाऊ विमानांना शाप!

कश्मीरच्या सीमेवर पाकडय़ांच्या गोळीबारात किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आमचे जवान प्राण गमावतात तर अवकाशात लढाऊ विमानांमधील तांत्रिक दोषत्यांच्यासाठी जीवघेणे ठरतात. ‘शहीदस्क्वाड्रन लिडर समीर अब्रोल यांच्या वीरपत्नी गरिमा यांनी हाच प्रश्न विचारला आहे. आजवर अनेक वीरपत्नी आणि वीरमातांनी हेच प्रश्न उपस्थित केले आहेत. लढाऊ विमानांचे न थांबलेले अपघात हे या प्रश्नांचे दुर्दैवी उत्तरसमजायचे का? निदान यापुढे तरी हवाई दल आणि सरकारने लढाऊ विमानांना जो दुर्घटनांचा शाप मिळाला आहे त्यापासून मुक्ती कशी मिळेल याचा विचार करायला हवा.

हिंदुस्थानी वायूदलाच्या लढाऊ विमानांचे अपघात, त्यात आमच्या जाँबाज वैमानिकांना मिळणारे ‘हौतात्म्य’, दुर्घटनाग्रस्त विमानांच्या गुणवत्तेविषयीचे वाद आणि त्यावरून हुतात्मा वैमानिकांच्या वीरपत्नी तसेच वीरमातांनी उपस्थित केलेले भावनिक, पण बिनतोड सवाल, हे चित्र कधी बदलणार आहे? लढाऊ विमानाचा अपघात झाला की त्यावर चर्चेच्या फैरी झडतात, पण त्यापलीकडे काहीच होत नाही. हुतात्मा वैमानिकांच्या कुटुंबीयांचे अश्रू सुकतात आणि नवीन दुर्घटना होईपर्यंत आधीच्या चौकशी अहवालावरची धूळही झटकली जात नाही. बंगळुरू येथे          1 फेब्रुवारी रोजी ‘मिराज 2000’ हे लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाले. स्क्वाड्रन लिडर समीर अब्रोल आणि सिद्धार्थ नेगी हे दोन्ही वैमानिक चाचणी उड्डाण करीत होते. मात्र विमानाने हवेतच पेट घेतला. समीर व सिद्धार्थ यांनी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारूनही उपयोग झाला नाही. दुर्दैवाने दोघांनाही जीव गमवावा लागला. हे विमान अद्ययावत केले गेले असूनही अचानक दुर्घटनाग्रस्त कसे झाले याची आता चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी वगैरे नेहमीचे सोपस्कार ठीक असले तरी आणखी एक चौकशी अहवाल यापलीकडे काय साध्य होणार आहे? ‘शहीद’ समीर अब्रोल यांच्या पत्नी गरिमा यांनी ‘इन्स्टाग्राम’वर

एक पोस्ट

टाकल्यामुळे नेमका हाच प्रश्न पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. गरिमा यांनी म्हटले आहे की, ‘तो थेट आकाशातून जमिनीवर कोसळला. कुटुंबासह त्याची स्वप्नं, इच्छा सर्वांचा चक्काचूर झाला.’ समीर यांच्या भावानेदेखील ‘दुसऱ्यांना प्रकाशाची वाट दाखविण्यासाठी कोणाला तरी धोका पत्करावा लागतो’, अशा शब्दांत ‘लष्करी बाणा’ दाखवला आहे. शिवाय ‘आम्ही आपल्या वीरांना लढण्यासाठी कालबाहय़ मशीन्स देतो. तरीही ते शौर्य गाजवतात’, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. आपली ही टिप्पणी ‘इन जनरल’ आहे, असे सुशांत याने स्पष्ट केले असले तरी याच मुद्दय़ाभोवती लढाऊ विमानांच्या प्रत्येक दुर्घटनेची चर्चा फिरत असते हे कसे विसरता येईल? शहीद समीर यांची पत्नी आणि भावाचे दुःख, संताप, भावना समजून घेतल्या पाहिजेत. मुळात या भावना प्रातिनिधिक आहेत हे लक्षात घ्यायला हवे. कधी काळी ‘मिग’ विमान आपल्या हवाई दलातील ‘उडती शवपेटी’ म्हणून बदनाम झाले होते. गेल्या             50 वर्षांत जवळजवळ 500 मिग लढाऊ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. त्यावरून शहीद वैमानिकांच्या कुटुंबीयांच्या संतापाचा अंदाज येऊ शकतो. पुन्हा गेल्या आठ-दहा वर्षांत सुखोई, जग्वार, मिराज यांसारख्या

अत्याधुनिक लढाऊ विमानांनाही

दुर्घटनांचा ‘शाप’ मिळाला आहे. चार वर्षांपूर्वी तर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे दोन इंजिन असलेल्या 200 ‘सुखोई-30’ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घालण्याची वेळ हवाई दलावर आली होती. इतरही अनेक उपाययोजना केल्या गेल्या, पण 2013-14 या एकाच वर्षांत तब्बल 23 लढाऊ विमाने अपघातग्रस्त झाली होती. नंतरही हा सिलसिला थांबलेला नाही. कधी मिग कोसळते, कधी सुखोई, कधी जग्वार तर कधी मिराज. आमच्या बहादूर वैमानिकांना त्यात हकनाक जीव गमवावे लागतात. म्हणजे कश्मीरच्या सीमेवर पाकडय़ांच्या गोळीबारात किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आमचे जवान प्राण गमावतात तर अवकाशात लढाऊ विमानांमधील ‘तांत्रिक दोष’ त्यांच्यासाठी जीवघेणे ठरतात. ‘शहीद’ स्क्वाड्रन लिडर समीर अब्रोल यांच्या वीरपत्नी गरिमा यांनी हाच प्रश्न विचारला आहे. आजवर अनेक वीरपत्नी आणि वीरमातांनी हेच प्रश्न उपस्थित केले आहेत. लढाऊ विमानांचे न थांबलेले अपघात हे या प्रश्नांचे ‘दुर्दैवी उत्तर’ समजायचे का? निदान यापुढे तरी हवाई दल आणि सरकारने लढाऊ विमानांना जो दुर्घटनांचा शाप मिळाला आहे त्यापासून मुक्ती कशी मिळेल याचा विचार करायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या