आजचा अग्रलेख : इसिसची बकवास!

1

इसिसचा हिंदुस्थानात नवा प्रांत स्थापन करण्याचा दावा म्हणजे सपशेल बकवासच आहे. तथापि, जगभरात खुनी खेळ खेळणाऱ्या इसिसच्या दाव्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. अखेरच्या घटका मोजत असलेल्या बगदादी आणि त्याच्या संघटनेत धुगधुगी कायम आहे हे श्रीलंकेतील अमानुष हत्याकांडातून दिसले. हिंदुस्थानातही महाराष्ट्र, दक्षिणेतील राज्ये, उत्तर प्रदेशपासून जम्मूकश्मीरपर्यंत हातपाय पसरण्याचा प्रयत्न इसिसने केला होता हे विसरून चालणार नाही. बकवास करणाऱ्या इसिसवर नजर ठेवावीच लागेल!

श्रीलंकेत अलीकडेच भीषण नरसंहार घडवणाऱ्या ‘इसिस’ या कुख्यात इस्लामी अतिरेकी संघटनेने हिंदुस्थानात स्वतःचा स्वतंत्र प्रांत स्थापन केल्याचा दावा केला आहे. ‘विलायाह ऑफ हिंद’ या अरबी नावाने ‘इस्लामिक स्टेट’ची शाखा हिंदुस्थानात उघडण्यात आली आहे, अशी घोषणाच इसिसच्या ‘अमाक’ या अधिकृत वृत्तसंस्थेने केली आहे. इसिसचा हा दावाच इतका अजब आणि हास्यास्पद आहे की, ‘फुशारकी’ या एकाच शब्दात या दाव्याची संभावना करावी लागेल. जम्मू-कश्मीरमध्ये शुक्रवारी झालेल्या एका धुमश्चक्रीत इसिसच्या एका अतिरेक्याला सुरक्षा दलांनी ठार केले. शोपीयानच्या अमशीपुरा भागात झालेल्या या चकमकीत इश्फाक अहमद सोफी हा अतिरेकी मारला गेला. त्यानंतर काही तासांतच इसिसच्या वृत्तसंस्थेने या चकमकीचा हवाला देत आपल्या अतिरेकी संघटनेची नवी शाखा सुरू केल्याचे जाहीर केले. वास्तविक इराक आणि सीरिया या आपल्या बालेकिल्ल्यातूनच इसिसचे अतिरेकी पार्श्वभागाला पाय लावून पळत सुटले आहेत. अमेरिकेने केलेल्या जबरदस्त हवाई हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी इसिसचे अतिरेकी डोंगरदऱ्यांमध्ये मिळेल त्या बिळात लपून बसले हे सत्य आहे. खुद्द इसिसचा म्होरक्या व संस्थापक अबू बकर बगदादी हादेखील गुहा खोदून पाताळात दडून बसल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. इसिस संघटनेचेच असे कंबरडे मोडलेले असताना आणि

अतिरेक्यांची पांगापांग

झाली असताना हिंदुस्थानसारख्या विशाल देशात स्वतंत्र प्रांताची स्थापना केल्याच्या इसिसच्या गमजा म्हणजे केवळ भंपक बढाई आहे. कश्मीरमधील चकमकीचा उल्लेख करताना नवा प्रांत स्थापन केल्याचे इसिसचे ऐलान खरे मानायचे तरी कसे? नव्या प्रांताच्या सीमा कुठल्या, नेमका भौगोलिक प्रदेश कोणता, त्या प्रांताची राजधानी कोणती, त्या प्रांतामध्ये मोडणाऱ्या गावांची संख्या किती, कशाचा कशाला पत्ता नाही तरी म्हणे, ‘विलायाह ऑफ हिंद’ हा नवा प्रांत स्थापन केला! सवाशे कोटी लोकसंख्येच्या या खंडप्राय देशात दोन-चार काळे झेंडे आणि पाच-पंचवीस बंदुका घेऊन नवा प्रांत स्थापन करणे म्हणजे त्या बगदाद्याला पोरखेळ वाटला की काय? हिंदुस्थानचा शेजारी असलेल्या पाकिस्तानला जे जमले नाही ते इसिसला जमेल काय? पाऊणशे अणुबॉम्ब, प्रचंड सैन्य आणि कमी भरतीला दहशतवाद्यांचे शेकडो कारखाने दिमतीला असूनही पाकिस्तानला हिंदुस्थानच्या प्रचंड संरक्षणसिद्धतेपुढे कापरे भरते. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून हवाई हल्ले चढवल्यानंतरही अण्वस्त्र्ासज्ज पाकडे शेपूट घालून बसले तिथे इसिसच्या टोळीची ती काय बिशाद? जम्मू-कश्मीरमध्ये आजघडीला प्रत्येक 50-100 फुटांवर हिंदुस्थानी जवान

डोळ्य़ांत तेल घालून

पहारा देत आहेत. एकेका अतिरेक्याला वेचून मारले जात आहे. सहा महिन्यांपासून ही सफाई मोहीम सुरू आहे. बारामुल्लासारखा सर्वाधिक दहशतवादी असलेला जिल्हा हिंदुस्थानच्या बहाद्दर जवानांनी दहशतवादमुक्त केला आहे. सुरक्षा दलांचा एवढा मोठा फौजफाटा कश्मीर खोऱ्यात तैनात असताना तिथे स्वतंत्र प्रांताची घोषणा करणे हे म्हणूनच मूर्खाने पाहिलेले दिवास्वप्न ठरते. ‘इसिस’च्या प्रांत स्थापनेच्या घोषणेनंतर जम्मू-कश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्यांनी इसिसचा हा दावा केवळ खोडूनच काढला नाही, तर या पोकळ बुडबुडय़ांची खिल्ली उडवली आहे. सुरक्षा दलांनी कश्मीरमधील इसिसचे नामोनिशाण पूर्णपणे मिटवले असून इश्फाक अहमद हा कश्मीरमध्ये मारला गेलेला इसिसचा शेवटचा अतिरेकी होता, असे जम्मू-कश्मीरच्या पोलीस महासंचालकांनीच आता सांगितले आहे. इसिसचा हिंदुस्थानात नवा प्रांत स्थापन करण्याचा दावा म्हणजे सपशेल बकवासच आहे. तथापि, जगभरात खुनी खेळ खेळणाऱ्या इसिसच्या दाव्याकडे पूर्ण दुर्लक्ष करूनही चालणार नाही. अखेरच्या घटका मोजत असलेल्या बगदादी आणि त्याच्या संघटनेत धुगधुगी कायम आहे हे श्रीलंकेतील अमानुष हत्याकांडातून दिसले. हिंदुस्थानातही महाराष्ट्र, दक्षिणेतील राज्ये, उत्तर प्रदेशपासून जम्मू- कश्मीरपर्यंत हातपाय पसरण्याचा प्रयत्न इसिसने केला होता हे विसरून चालणार नाही. बकवास करणाऱ्या इसिसवर नजर ठेवावीच लागेल!