आजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर!

2014 साली स्थिर सरकार येऊनही पाकिस्तानचे वाकडे शेपूट आपण कापू शकलो नाही याचा जनतेला पटेल असा खुलासा करावा लागेल. अर्थात सध्या काँगेस वगैरे पक्ष देशभरात एकत्र येऊन जी महाखिचडी शिजवत आहेत त्यातून देशाला ना स्थैर्य लाभेल, ना शांतता. त्यामुळे संघ परिवाराचा आधी कश्मीर; नंतर मंदिर हा नवा नारा आणि नवा पवित्रा देशाच्या सोयीचा आहे. अर्थात राममंदिर आता नको, पण 2019 नंतर तरी ते होईल का? पुलवामासारखे हल्ले पुन्हा होऊ नयेत म्हणून देशात पुन्हा स्थिर सरकार हवेच हेदेखील खरे. मात्र त्यानंतर तरी कश्मीरसाठी असलेले घटनेचे 370 कलम हटून त्या ठिकाणी पाकिस्तानच्या चांदताऱयाऐवजी फक्त तिरंगा फडकेल काय? आदी प्रश्न आहेतच. अर्थात, या प्रश्नांचे उत्तर आज तरी कुणाकडे नाही, पण आम्ही आशावादी आहोत!

संघ परिवाराने असे ठरवले आहे की, तूर्त राममंदिराचा मुद्दा गुंडाळून ठेवावा, म्हणजे बाजूला ठेवावा व पुलवामासारख्या विषयाकडे लक्ष द्यावे. संघ परिवारास आता असेही वाटते की, कश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी देशाला एका मजबूत आणि स्थिर सरकारची गरज आहे. स्थिर सरकार व मजबूत पंतप्रधान असल्याशिवाय दहशतवादाचा बीमोड होणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवता येणार नाही. कश्मीरचा प्रश्न सोडवता येणार नाही. म्हणूनच राममंदिर, समान नागरी कायदा, 370 कलम वगैरे विषय कुलूपबंद करून फक्त कश्मीर, पुलवामा, स्थिर सरकार अशाच विषयांवर जनतेचे लक्ष केंद्रित करावे. संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन आता राममंदिराऐवजी पुलवामाविषयी जागरण करतील, असे संघ परिवाराच्या बैठकीत ठरल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कश्मीरची परिस्थिती घाणेरडय़ा पद्धतीने चिघळली आहे. गेल्या 70 वर्षांत कश्मीरात इतके भयंकर वातावरण, परिस्थिती कधीच आली नव्हती. देशभरातील कश्मिरी तरुणांना ‘लक्ष्य’ केले जात आहे. त्यामुळे वातावरण सुधारण्याऐवजी चिघळत आहे व संघ परिवाराने यावर परखड मत व्यक्त करणे गरजेचे आहे. कश्मिरी तरुण, कश्मीरची उत्पादने, पर्यटन यावर बहिष्कार टाकण्याची भाषा फाजील देशप्रेमाचे प्रदर्शन आहे. चिदंबरम नामक वकिलाने असे सांगितले आहे की, आम्हाला कश्मीर हवे, पण कश्मिरी नकोत. चिदंबरम यांना नेमके काय म्हणायचे आहे ते आता राहुल गांधी यांनीच देशाला समजावून सांगायला हवे. काही काळ असली बाष्कळ विधाने नेत्यांनी बंद केली तरी कश्मीरचे थोडे भले होईल. कश्मिरी तरुणांना देशभरातून हाकलून देणे याचा अर्थ आपण

कश्मीरवरचा भावनिक हक्क

सोडून देण्यासारखे आहे. कश्मीरात रोजगार नाही व त्याचे कारण दहशतवाद हेच आहे. कश्मीरात रोजगार नाही म्हणून कश्मिरी तरुण देशभरात उदरनिर्वाहासाठी जात आहे. त्याला जर कश्मीरमध्येच रोजगार मिळाला तर त्याच्यावर पोटासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ येणार नाही. मात्र जोपर्यंत कश्मीरला पडलेला दहशतवादाचा विळखा सुटत नाही तोपर्यंत तिथे रोजगाराच्या संधी निर्माण होणे महाकठीण आहे. त्यामुळे तेथील दहशतवादाचा बीमोड आधी केला पाहिजे आणि ती जबाबदारी सरकारची आहे. देशात ज्यांचे सरकार आहे त्यांचीच ही जबाबदारी आहे. गेल्या साडेचार वर्षांत कश्मिरी पंडितांची घरवापसी तर झालीच नाही, उलट मुसलमान तरुणही पोटापाण्यासाठी बाहेर पडले. त्यातील काहींनी हातात दगड व बंदुका घेऊन दहशतवाद हाच रोजगाराचा मार्ग स्वीकारला हे देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. हे सर्व रोखण्यासाठीच स्थिर सरकार व मजबूत पंतप्रधानाची गरज देशाला होती व त्यासाठीच जनतेने लोकशाही मार्गाने भाजप व मोदींना सत्तेवर आणले हे संघ परिवारास विसरता येणार नाही. अर्थात भाजपास भारी मतदान करून सत्तेवर आणणाऱया कुणालाच याचे विस्मरण होणार नाही. कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर राजकीय निकाह लावून भाजपने सत्ता स्थापन केली तेव्हा प्रचंड संताप लोकांत होता. त्यावेळीही ‘‘हे सर्व कश्मीरात स्थिरता व शांतता स्थापन करण्याचे प्रयत्न आहेत’’ असेच सांगितले गेले व लोकांनी विश्वास ठेवला, पण हे सर्व प्रयोग फसले व

कश्मीरातील स्थिती

पहिल्यापेक्षा जास्त बिघडली. त्यामुळे आता कश्मीरमध्ये नवा प्रयोग कोणता करणार? असा प्रश्न जनतेला पडला होता. मात्र त्याचे उत्तर मिळाले आहे. पुन्हा एकदा स्थिर सरकार व त्यासाठी भाजपच हवा असे सांगण्यात येत आहे. राममंदिर तूर्त नको, कारण कश्मीर महत्त्वाचे. आधी देश, मग देव हे बरोबर आहे, पण लोक आता विचारतील, 2014 सालातही स्थिर सरकार व मजबूत पंतप्रधानासाठी मते मागितली व ती आम्ही दिली. मग आता पुन्हा तोच नारा कशासाठी? 2014 नंतर पठाणकोट व उरीचे हल्ले झाल्यावरही राममंदिराचा विषय कायम होता व तेव्हा देशात स्थिर सरकारच होते. पठाणकोट, उरीच्या शृंखलेत आता पुलवामाची भर पडली व पाकिस्तानचे वाकडे शेपूट इतके होऊनही वाकडेच राहिले आहे. 2014 साली स्थिर सरकार येऊनही पाकिस्तानचे वाकडे शेपूट आपण कापू शकलो नाही याचा जनतेला पटेल असा खुलासा करावा लागेल. अर्थात सध्या काँगेस वगैरे पक्ष देशभरात एकत्र येऊन जी महाखिचडी शिजवत आहेत त्यातून देशाला ना स्थैर्य लाभेल, ना शांतता. त्यामुळे संघ परिवाराचा आधी कश्मीर; नंतर मंदिर हा नवा नारा आणि नवा पवित्रा देशाच्या सोयीचा आहे. अर्थात राममंदिर आता नको, पण 2019 नंतर तरी ते होईल का? पुलवामासारखे हल्ले पुन्हा होऊ नयेत म्हणून देशात पुन्हा स्थिर सरकार हवेच हेदेखील खरे. मात्र त्यानंतर तरी कश्मीरसाठी असलेले घटनेचे 370 कलम हटून त्या ठिकाणी पाकिस्तानच्या चांदताऱयाऐवजी फक्त तिरंगा फडकेल काय? आदी प्रश्न आहेतच. अर्थात, या प्रश्नांचे उत्तर आज तरी कुणाकडे नाही, पण आम्ही आशावादी आहोत!