आजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच!


ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद देणारी घटना गुरुवारी जेट एअरवेजच्या मुंबईजयपूर विमानात घडली. आपल्या देशात रेल्वेचे जाळे वाढले, दुचाकीचारचाकी वाहने बेसुमार वाढली. आता विमानांचीही गर्दी वाढली आहे आणि विमान प्रवाशांची संख्यादेखील. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच आहे. जमिनीपासून आकाशापर्यंत हेच घडणार असेल तर राज्यकर्ते ज्या विकासाचे श्रेय घेत आहेत ते नेमके कोणत्या प्रकारचे म्हणायचे?

हिंदुस्थानात काहीच सुरक्षित राहिलेले नाही. रस्ते, पाणी, हवेत कधी काय घडेल व त्यात किती निरपराध लोकांचे प्राण जातील ते सांगता येत नाही. मुंबईच्या आकाशात घडलेल्या दोन घटनांनी सध्या खळबळ उडाली आहे. मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमान उड्डाणानंतर जे घडले ते धक्कादायक आहे. विमानाने आकाशात झेप घेताच प्रवाशांचा जीव मेटाकुटीस आला. प्रवासी गरगरले. त्यांच्या नाकातून, कानातून रक्त वाहू लागले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रवाशांत गोंधळ उडाला व आता कसे होणार? या भीतीने अनेकांना मूर्च्छा आली. जेटच्या कर्मचाऱ्यांना हवेचा दाब नियंत्रित करणारी यंत्रणा सुरू करण्याचा विसर पडल्याने हे संकट ओढवले. विमानात 166 प्रवासी होते हे लक्षात घेतले तर किती भयंकर दुर्घटनेतून ते बचावले याची खात्री पटेल. जयपूरला निघालेले विमान अर्ध्या वाटेवरून परत फिरवून मुंबईत उतरवले गेले. अनेक प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे किमान दहाजणांना कायमचे बहिरेपण आले आहे. जयपूर विमानात हा आक्रोश सुरू असताना तिकडे मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानाचे टायर फुटले. सुदैवाने या विमानातीलही 185 प्रवाशांचे प्राण बचावले ही परमेश्वराचीच कृपा म्हणावी लागेल. देशातील नागरी हवाई वाहतुकीची काय अवस्था आहे ते गुरुवारच्या दोन घटनांवरून समजते.

कधी विमानांची टक्कर

टळते, तर कधी इंजिनात बिघाड होतो. कधी कर्मचाऱ्यांच्या गफलती होतात व त्यातून अपघात होत असतात. देशातील नागरी वाहतुकीची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. एअर इंडिया डबघाईस आली आहे. सरकारने 50 हजार कोटींचे अनुदान देऊन देशाच्या राष्ट्रीय विमान कंपनीस तात्पुरता प्राणवायू पुरवला आहे. किंग फिशर बंद पडली. जेट एअरवेजच्या पंखांची पिसेही झडू लागली आहेत. तेथील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे मध्यंतरी ‘जेट’च्या पायलटस्नी आंदोलनाचा इशाराही दिला होता. एकीकडे देशातील विमान वाहतुकीला ‘अच्छे दिन’ आल्याचे ढोल पिटले जात आहेत, मात्र नागरी विमान वाहतूक सेवेची कार्यक्षमता आणि गुणवत्ता वाढली आहे असे दिसत नाही. हवाई वाहतूक क्षेत्र आणि विमान प्रवासी याबाबत आपला देश जगातील मोठ्या बाजारपेठांपैकी एक होत आहे. तरीही देशातील विमान कंपन्यांची आर्थिक घसरण होत आहे. त्याची काय कारणे आहेत याचा विचार विमान कंपन्या आणि सरकारने करायला हवा. इंधनाचे आकाशाला भिडलेले दर आणि परकीय चलनाच्या दरातील चढउतार ही त्याची कारणे असू शकतात. त्यात रुपयाचे विक्रमी अवमूल्यन हीदेखील विमान वाहतूक क्षेत्रासाठी डोकेदुखी ठरली आहे.

व्यावसायिक स्पर्धादेखील

आहेच. त्यामुळे गुरुवारी जेटच्या प्रवाशांवर जशी ऑक्सिजन मास्क लावण्याची वेळ आली तशी भविष्यात नागरी विमान कंपन्यांवर येऊ शकते. सरकार एकीकडे नागरी विमान वाहतूक क्षेत्र झपाटय़ाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असल्याचे सांगते आणि दुसरीकडे आपले ‘बुरे दिन’ कधी संपणार हा प्रश्न प्रवासी विमान कंपन्यांना भेडसावत आहे. त्यात कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा प्रवाशांचा जीव टांगणीला लावणार असेल तर कसे व्हायचे? कंपन्यांचा आर्थिक श्वास कोंडला म्हणून प्रवाशांच्या जिवाशी कोणी खेळावे असा त्याचा अर्थ नाही. तांत्रिक बिघाडामुळे काही घडले तर ते एकवेळ समजून घेता येईल, पण येथे तर हवेचा दाब नियंत्रण करणारी यंत्रणा सुरू करण्याचाच कर्मचाऱ्यांना विसर पडला. ज्या उच्च दर्जाची भाषा आणि अपेक्षा नागरी विमान वाहतुकीकडून केली जाते त्या अपेक्षेला छेद देणारी घटना गुरुवारी जेट एअरवेजच्या मुंबई-जयपूर विमानात घडली. आपल्या देशात रेल्वेचे जाळे वाढले, गाड्यांची संख्या वाढली. रस्ते आणि दुचाकी-चारचाकी वाहनेही बेसुमार वाढली. आता विमानांचीही गर्दी वाढली आहे आणि विमान प्रवाशांची संख्यादेखील. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? त्याबाबत सगळी बोंबच आहे. जमिनीपासून आकाशापर्यंत हेच घडणार असेल तर राज्यकर्ते ज्या विकासाचे श्रेय घेत आहेत ते नेमके कोणत्या प्रकारचे म्हणायचे?एक प्रतिक्रिया

  1. ya sagalya madhe sarkarcha kay dosh ahe ? payalat ne apale kam neet kele nahi tyat sarkar kay karnar ? jar changale sushikshit trained lok ase kam karynar asatil tar ithe parmeshwar yeun basala tari sudharana hone kathin ahe ? ani tumhi nuste ka oradata sarkarchya navane ? tumhi dekhil samil ahat na tya sarkarmadhe vata mhanun ? ani apan sarva deshache nagrik ahot na ? mag saryanchi jababdari ahe hi !