अग्रलेख : द्रविड योद्धा!

प्रवाहाविरुद्ध पोहून यशस्वी राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा नेता म्हणून एम. करुणानिधी सदैव स्मरणात राहतील. पांढरी लुंगी, तसाच शुभ्र सदरा, त्यावर पिवळ्या रंगाचे उपरणे आणि डोळ्यावर सदैव काळा चष्मा हे त्यांनीच कोरून ठेवलेले रूप कोणाला कसे मिटवता येईल! नावाप्रमाणेच करुणानिधींच्या मनात समाजातील शोषित आणि वंचितांविषयी अपार करुणाहोती. म्हणूनच तमिळ जनतेच्या हृदयसिंहासनावर ते इतकी वर्षे अधिराज्य गाजवू शकलेप्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या या द्रविड योद्धय़ाला आम्ही लाखो शिवसैनिकांतर्फे श्रद्धांजली वाहत आहोत!

द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष आणि तामीळनाडूचे शक्तिशाली नेते एम. करुणानिधी यांच्या निधनाने हिंदुस्थानच्या राजकारणातील एक लढवय्या नेता राजकीय पटलावरून अस्तंगत झाला आहे. तामीळनाडूतील शोषित, वंचित, पीडितांना सदैव आपला वाटणारा नेता म्हणजे मुथ्थुवेल ऊर्फ एम. करुणानिधी. शेवटच्या श्वासापर्यंत तमिळ भाषेचा आणि राज्याचा प्रचंड अभिमान बाळगणाऱ्या करुणानिधींनी आपली प्रादेशिक अस्मिता एका कट्टरतेनेच जपली आणि जोपासली. प्रसंगी राष्ट्रीय पक्षांशी दोन हात केले, पण तामीळनाडूच्या जनतेशी, तमिळ जनतेच्या हिताशी आणि तमिळी अस्मितेशी त्यांनी कधीही प्रतारणा होऊ दिली नाही. तमिळी जनतेच्या भावनांशी कुठल्याही सरकारला खेळू दिले नाही. अवघा तामीळनाडू आज शोकसागरात बुडाला आहे तो यामुळेच! द्रविडी चळवळीचे अध्वर्यू पेरियार, अण्णादुराई, एम.जी. रामचंद्रन यांच्या पंक्तीतील महत्त्वाचे शिलेदार राहिलेल्या करुणानिधींना सुदैवाने तामीळनाडूच्या जनतेची सर्वाधिक सेवा करण्याची संधी मिळाली. तब्बल पाचवेळा मुख्यमंत्रीपद देऊन तमिळी जनतेनेही करुणानिधींना डोक्यावर घेतले. तब्बल १२ वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. करुणानिधी कोण होते हे नव्याने सांगण्याची तशी गरज नाही. राजकारणाची एबीसीडीही ज्याला माहिती नाही अशी व्यक्तीही एम. करुणानिधी यांना दक्षिणेतील एक मातब्बर नेता म्हणून ओळखते. इतकेच नाही तर उत्तर हिंदुस्थानातील जनताही करुणानिधींना द्रविडीयन चळवळीचा आणि तमिळ अस्मितेचा सच्चा पाईक म्हणून ओळखते. एका राज्यापुरते राजकारण करूनही तामीळनाडूच्या बाहेर थेट

दिल्लीतही आपला दबदबा

निर्माण करणाऱ्या या दिग्गज नेत्याचा देशभर जो लौकिक झाला त्याचे गमक त्यांच्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत दडले आहे. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेने जेव्हा मुंबईतील दाक्षिणात्यांविरुद्ध आंदोलन उभे केले तेव्हा मुंबईत येऊन त्यांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली होती. मराठी माणसाविषयी जी कळकळ शिवसेनाप्रमुखांना होती तशीच ती करुणानिधींना तमिळींविषयी होती. असे म्हणतात की, मृत्यूनंतर निरोप देण्यासाठी, अंत्ययात्रेसाठी जी गर्दी घराबाहेर जमा होते त्यावरून त्या माणसाचे मोठेपण ओळखावे. करुणानिधींना अखेरचा निरोप देण्यासाठी चेन्नईमध्ये जो जनसागर उसळला त्यावरून करुणानिधींची थोरवी सहज लक्षात यावी. आपल्या देशात राजकारण्यांची, राजकीय नेत्यांची ददात मुळीच नाही. मात्र अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा शोकाकुल जनसागर उसळावा, हे भाग्य फार थोडय़ा राजकारण्यांच्या नशिबी येते. करुणानिधी त्यापैकीच एक होते. करुणानिधींचे वय ९४ वर्षे होते. शरीर अर्थातच थकले होते. अलीकडची काही वर्षे ते व्हीलचेअरवरच दिसायचे. मात्र मंगळवारी सायंकाळी कावेरी रुग्णालयातून त्यांच्या निधनाची घोषणा झाल्यानंतर तामीळनाडूच्या जनतेचा शोक अनावर झाला. लाखो लोकांचा आक्रोश आणि आकांत दुसऱ्या दिवशीही करुणानिधींना अखेरचा निरोप देईपर्यंत सुरूच होता. करुणानिधींच्या राजकीय विरोधक कु. जयललिता यांच्या निधनानंतरही तामीळनाडूत असेच हेलावून टाकणारे दृश्य दिसले होते. जनतेबद्दल सच्ची आणि आंतरिक तळमळ असणाऱ्या व रक्त आटवणाऱ्या लोकनेत्यासाठीच लोक अश्रू ढाळतात,

हा इतिहास

तामीळनाडूत पुन्हा एकदा जिवंत झाला. करुणानिधींवर तमिळ जनतेची अशीच अपार श्रद्धा होती. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा वयाच्या चौदाव्या वर्षी ‘हिंदी हटाओ’ आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणात उतरतो, अवघ्या विसाव्या वर्षी तमिळ चित्रपटासाठी पटकथा लिहून लोकप्रिय होतो, पंचविशीआधीच द्रविड चळवळीच्या मुखपत्राचा संपादक बनतो आणि एकेक शिखरे पादाक्रांत करत ४५व्या वर्षी तामीळनाडूचा मुख्यमंत्री बनतो… करुणानिधींचा हा साराच प्रवास विलक्षण आहे. करुणानिधी काय होते हे सांगण्यापेक्षा काय नव्हते हेच खरेतर सांगायला हवे. यशस्वी राजकारणी, ७५ हून अधिक चित्रपटांच्या पटकथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्र, निबंध, गीतलेखन यांची १०० हून अधिक पुस्तके लिहिणारा महान साहित्यिक, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. हिंदू धर्मातील कुप्रथांवर, कर्मठतेवर कुठाराघात करणारे लिखाण करतानाच नास्तिकतेचा झेंडा हाती घेऊन करुणानिधींनी आपले राजकारण यशस्वी करण्याचा चमत्कार घडवला. प्रवाहाविरुद्ध पोहून यशस्वी राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा नेता म्हणून एम. करुणानिधी सदैव स्मरणात राहतील. पांढरी लुंगी, तसाच शुभ्र सदरा, त्यावर पिवळ्या रंगाचे उपरणे आणि डोळ्यावर सदैव काळा चष्मा हे त्यांनीच कोरून ठेवलेले रूप कोणाला कसे मिटवता येईल! नावाप्रमाणेच करुणानिधींच्या मनात समाजातील शोषित आणि वंचितांविषयी अपार ‘करुणा’ होती. म्हणूनच तमिळ जनतेच्या हृदयसिंहासनावर ते इतकी वर्षे अधिराज्य गाजवू शकले. प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या या द्रविड योद्धय़ाला आम्ही लाखो शिवसैनिकांतर्फे श्रद्धांजली वाहत आहोत!