आजचा अग्रलेख : आडवाणी आहेतच!

3

आडवाणी यांनी राजकारणात मोठी उंची गाठली. आडवाणी यांनी जे पेरले त्याचीच फळे आजचा भाजप खात आहे. 1991 मध्ये आडवाणी यांनी प्रथम गांधीनगरातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा आडवाणींच्या उजव्या बाजूला विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान होते व पाठीमागच्या गर्दीत अमित शहा उभे होते. सध्या सरकत्या रंगमंचाचे दिवस आहेत. नेपथ्य बदलले आहे. आडवाणींच्या जागी अमित शहा बसले आहेत व बाजूला मोदी आहेत. आडवाणी गर्दीत हरवले हे खरे, पण त्यांच्या चमकदार राजकीय खेळीचे स्मरण भाजपच्या सध्याच्या तरुण तुर्कांनी ठेवायला हवे. आडवाणींचे मार्गदर्शन आम्हीही घेत राहू. 91 वर्षांच्या या भीष्मपितामहास आमचा साष्टांग नमस्कार!  

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. देशाच्या राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या लालकृष्ण आडवाणी यांचे नाव या यादीत नाही. त्यात आश्चर्य वाटावे असे काय आहे! भारतीय जनता पक्षातील आडवाणी युग संपले आहे. गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आडवाणी सहा वेळा विजयी झाले. आता गांधीनगर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे निवडणूक लढवतील. याचा सरळ अर्थ असा की, भीष्माचार्यांना पक्षाने सक्तीच्या विश्रांतीवर पाठवले आहे. भाजपची स्थापना करणार्‍या मोजक्या नेत्यांत आडवाणी होते. वाजपेयी-आडवाणी या ‘राम-लखन’ जोडगोळीने पक्षाचा रथ पुढे नेला. वाजपेयी पक्षाचा चेहरा, तर आडवाणी हे सूत्रधार होते. वाजपेयींचे निधन झाले आहे व आडवाणी हे पडद्याआड गेल्याने मोदी व शहा यांनी वाजपेयी-आडवाणींची जागा घेतली हे मान्य करावे लागेल. आज मोदी हे पक्षाचा चेहरा आहेत व शहा हे सूत्रधाराच्या भूमिकेत गेले आहेत. भारतीय जनता पक्षातील बुजुर्गांना या वेळी उमेदवार्‍या मिळणार नाहीत असे वातावरण आधीच तयार केले गेले होते. विशेषतः ज्यांनी वयाची पंचाहत्तरी गाठली आहे त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे कळविण्यात आल्यावर आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कलराज मिश्र अशा ‘बुजुर्ग’ नेत्यांना

घरी बसवले जाईल

हे पक्के. यापैकी श्री. आडवाणी हे 91 वर्षांचे आहेत. 91 व्या वर्षीदेखील ते ‘ताठ’ व कडक दिसत असले तरी हे वय निवडणूक लढण्याचे नाही. जमाना बदलला आहे व पिढीही बदलत आहे. तरुणांना संधी मिळायला हवी, असे जुनेजाणते नेते सांगतात. तेव्हा ही सुरुवात त्यांनी स्वतःपासून करायला हवी. भारतीय जनता पक्षात 2014 सालीच खांदेपालट झाला व आडवाणी हे पक्षात अडगळीत गेले. पक्षात काय झाले हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येकाला कधी न कधी निवृत्त व्हावेच लागते, पण लोकांनी सक्तीने निवृत्त करण्यापेक्षा स्वतःच काळाची पावले ओळखून बाजूला होणे शहाणपणाचे ठरते. निवृत्त कधी होणार, असे विचारण्यापेक्षा निवृत्त का झालात असे लोकांनी विचारावे व त्याच वातावरणात निवृत्त व्हावे.
91 वर्षांच्या आडवाणींसाठी जे लोक आता नक्राश्रू ढाळीत आहेत त्यांनी हे समजून घेतले पाहिजे. आडवाणी यांनी देशाच्या राजकारणात प्रदीर्घ ‘बारी’ खेळली आहे. ते भाजपचे शिखरपुरुष आहेत व राहतील. निवडणुकीच्या राजकारणात राहिल्यानेच नेता शिखरावर असतो हा समज खोटा असल्याचे आमचे मत आहे. वयाच्या 91 व्या वर्षी आडवाणी यांनी थांबायलाच हवे होते. पक्षाने त्यांना थांबवले यात बुजुर्ग आडवाणी यांचा अपमान झाल्याची छाती पिटण्याची निदान काँग्रेसला गरज नाही. ज्यांनी अवघड काळात काँग्रेसचे सरकार सांभाळले त्या नरसिंह रावांना तर

काँग्रेसने मृत्यूनंतरही अपमानित

केले व मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चिरंजीव राहुल गांधी हे जाहीर सभांतून मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाचे आदेश फाडून त्यांना अपमानित करीत होते. सीताराम केसरींचे शेवटी काय हाल झाले? तेव्हा बुजुर्गांच्या मान-सन्मानाच्या गोष्टी काँग्रेसच्या तोंडी शोभत नाहीत. तेजाने तळपणार्‍या प्रत्येक सूर्याला कधीतरी मावळावे लागते. आडवाणी यांनी राजकारणात मोठी उंची गाठली. अयोध्या रथयात्रेसारख्या उपक्रमांतून भाजपास शिखरावर नेले. आडवाणी यांनी जे पेरले त्याचीच फळे आजचा भाजप खात आहे. त्या झाडासाठी अनेकांनी घाम व रक्त दिले आहे. 1991 मध्ये आडवाणी यांनी प्रथम गांधीनगरातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा आडवाणींच्या उजव्या बाजूला विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी विराजमान होते व पाठीमागच्या गर्दीत अमित शहा उभे होते. सध्या सरकत्या रंगमंचाचे दिवस आहेत. नेपथ्य बदलले आहे. आडवाणींच्या जागी अमित शहा बसले आहेत व बाजूला मोदी आहेत. आडवाणी गर्दीत हरवले हे खरे, पण त्यांच्या चमकदार राजकीय खेळीचे स्मरण भाजपच्या सध्याच्या तरुण तुर्कांनी ठेवायला हवे. आडवाणींचे मार्गदर्शन आम्हीही घेत राहू. 91 वर्षांच्या या भीष्मपितामहास आमचा साष्टांग नमस्कार!