अग्रलेख : ही अंत्ययात्रा नाही, सुरुवात आहे!

अटलजींची यात्रा ही एका दिलदार, सत्त्वशील वीरपुरुषाची यात्रा होती. या वीरपुरुषाच्या शेवटच्या प्रवासाकडे पाहताना कार्लाइलच्या एका वचनाची आठवण ठेवली तरी पुरेशी आहे. ‘कालचे जे उद्दिष्ट होते, ती उद्याची सुरुवात आहेअसे एक चिरंतन सत्य कार्लाइलने सांगितले आहे. आजपासून आपण त्या दिशेने वाटचाल सुरू करावयास हवी. अटलजींची अंत्ययात्रा संपेल तेव्हा ही वाटचाल सुरू झालेली असेल. एका प्रदीर्घ, विक्रमशील, सत्त्वशील कालखंडाचा हा प्रवास शेवटचा नाही. जेथे तो संपेल तेथून नवा सुरू होणार आहे. आत्मा अमर असल्याचे तत्त्व मानले तर अटलजी देशाच्या आत्म्यांत विलीन झाले आहेत, देशाचा छिन्न झालेला आत्मा नव्याने एकसंध करण्यासाठी. आज त्याची गरज आहे!

अटलजी अनंतात विलीन झाले. देश शोकमग्न आहे. नेते येतील नेते जातील. सत्तापदाच्या शपथग्रहणाचे सोहळे होतील, पण अटलजी पुन्हा निर्माण होणार नाहीत. अटलजींची भडकलेली चिता पाहिली आणि हा कसला दिवस उजाडला असे वाटले. अटलजी गेल्याने कोणी काय गमावले याचे हिशेब दिले गेले आहेत. कुणाचा आधार तुटलेला आहे. कुणी म्हणतो कोहिनूर हिरा गमावला आहे. कोण म्हणाले युगान्त झाला आहे; पण आम्ही म्हणतो, अटलजींचे स्वर्गारोहण हे शिवसेनाप्रमुखांप्रमाणे आहे. अटलजींच्या हयातीत आम्ही जितके श्रीमंत होतो, तितके आता निर्धन झालेलो आहोत. त्यांच्या वेळी जितके आम्ही सामर्थ्यवान होतो, तितके आज असमर्थ झालेले आहोत. वाजपेयी हे संपूर्ण मनुष्य होते. ते आनंदयात्री होते. ते नवे नेहरू होते. वाजपेयी हे कठीण कोडे नव्हते. मुळात ते कोडे नव्हतेच. मोरारजींच्या मंत्रिमंडळात अटलजी परराष्ट्रमंत्री होते. त्यांच्या परदेश भ्रमणावर टीका होत असे. हे परराष्ट्रमंत्री त्यांची बॅग देशात ठेवतच नाहीत, ही टीका ते दिलदारीने स्वीकारीत. जनता पक्षाच्या काळात दुहेरी निष्ठsचा वाद उफाळून आला. मंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समारंभांना हजर राहू नये असे फर्मान जेव्हा पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी काढले तेव्हा लगेच वाजपेयींनी त्यांना कळवले, ‘मला ज्या समारंभांना हजर राहावेसे वाटेल त्यांना हजर राहावयाचे स्वातंत्र्य असले पाहिजे.’ त्यांनी पुढे साफ सांगितले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझे जे संबंध आहेत ते तोडून टाका असे जर कोणी मला सांगितले तर ते मी मानणार नाही.’ वाजपेयींनी त्यांच्या उदारमतवादाने आधी जनसंघाला, नंतर भारतीय जनता पक्षाला मोठे केले. कम्युनिस्टांनासुद्धा वाजपेयींविषयी ममत्व वाटे. कम्युनिस्टांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपविषयी टोकाचे विरोधी मत आहे, पण वाजपेयींचा विषय निघाला की ही ‘लाल फुले’ जास्त फुलतात. ते सांगू लागतात, ‘‘कोण, वाजपेयी ना? तो अगदी वेगळा माणूस आहे. ते उदारमतवादी आहेत. त्यांच्यात तो माथेफिरूपणा नाही म्हणून तर संघवाल्यांना वाजपेयी आपले वाटत नाहीत.’’ ‘जनसंघातील आपला माणूस’ असे वाजपेयींचे वर्णन करण्यापर्यंत कम्युनिस्टांची मजल गेली नाही तरी ते वाजपेयींविषयी ममत्वाने बोलत असतात. वाजपेयींचा हा उदारमतवाद सर्व पिढय़ांना आपलासा करणारा होता. ते सर्व घटकांत सहज मिसळत. सोशल मीडिया तेव्हा नव्हता. इलेक्ट्रॉनिक बातम्यांची माध्यमे नव्हती, पण वाजपेयी तरुणांचे हीरो होते. किएव्ह येथील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांपुढे पंतप्रधान मोरारजी देसाई भाषण करीत असताना अटलबिहारी वाजपेयी शेजारी बसले होते. मोरारजीभाई विद्यार्थ्यांचे बौद्धिक घेत होते व फक्त छडीच काय ती त्यांच्या हातात नव्हती. ‘‘मद्यपान करू नका, स्वतःचे अन्न स्वतः शिजवा. तुम्हाला मिळणारी शिष्यवृत्ती जर कमी पडत असेल तर तुम्हाला येथे यायला सांगितले कोणी? सामान बांधा आणि घरी जा.’’ मोरारजीभाईंचे हे असले प्रवचन ऐकून वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी वाजपेयींभोवती गर्दी केली. मोरारजींच्या मानाने वाजपेयी समंजस आहेत असे दिसून आल्यावर एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, ‘येथे इतकी थंडी असते की, थोडेसे मद्य घेतले तर काय बिघडले?’ मोरारजीभाई जवळपास नाहीत याची खात्री करून घेतल्यावर डोळे मिचकावीत (हा त्यांचा चिरपरिचित अंदाज) वाजपेयी त्या मुलांना म्हणाले, ‘प्या हो, औषध म्हणून प्या!’ या लहानशा गप्पांतच वाजपेयींनी त्या मुलांना आपलेसे करून घेतले. जवाहरलाल नेहरू हा सध्याच्या राज्यकर्त्यांच्या टीकेचा विषय आहे, पण नेहरूंविषयी वाजपेयींना नेहमीच आदर वाटे. नेहरूंच्या परराष्ट्र धोरणामागची मूलभूत कल्पना आपल्याला मान्य आहे, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. वाजपेयींचे

लोकसभेतील पहिले भाषण

अनेकांच्या आजही स्मरणात आहे. त्यात त्यांनी एक मार्मिक वाक्य उच्चारले होते, ‘भाषण करण्यासाठी वक्तृत्व लागते, परंतु मौन पाळताना वक्तृत्वाबरोबरच संयमाचीही गरज लागते.’ ज्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये हिंदुस्थानचा संबंध येत नाही त्यात नाक खुपसण्याचे अजिबात कारण नाही असेच त्यांना म्हणायचे होते व हे तत्त्व त्यांनी शेवटपर्यंत पाळले. ‘सूर्य मावळला’ अशा अत्यंत प्रभावी शब्दांत वाजपेयींनी नेहरूंच्या निधनाचे वर्णन केले होते. नेहरूंना आदरांजली वाहताना वाजपेयी म्हणाले, ‘नेहरू अतिशय प्रामाणिक होते. त्यांचा ध्येयवाद उत्तुंग होता. चर्चेला ते कधी घाबरले नाहीत आणि त्यांनी कधी घाबरून चर्चा केली नाही.’ वाजपेयी त्या वेळी इतके गहिवरले की, ते रडू लागले. बांगलादेश युद्धानंतर वाजपेयींनी इंदिरा गांधींची दुर्गावतार म्हणून प्रशंसा केली. तेव्हाही त्यांच्यावर संघ परिवार नाराज झाला होता, पण ते मागे हटले नाहीत. ते हिंदुत्ववादी होते, पण मुसलमानांच्या विरोधात नव्हते. पाकिस्तानविषयी त्यांच्या मनात चीड होती. पण चिडून, चरफडून उपयोग काय? शेवटी ते शेजारी राष्ट्र आहे. ‘हम इतिहास बदल सकते है. भूगोल कसा बदलणार? पडोसी कसे बदलणार? त्यांना नांदवून घ्यायला हवे’ हे त्यांचे धोरण होते. परराष्ट्रमंत्री म्हणून ते पाकिस्तानला भेट द्यायला गेले असताना पाकिस्तानचे त्यावेळचे अध्यक्ष झिया-उल-हक यांनी त्यांना त्यांच्या अनेक जुन्या विधानांबद्दल छेडले, तेव्हा वाजपेयींनी हक यांना सांगितले, ‘मी माझा भूतकाळ विसरून गेलेलो आहे. तुम्ही तुमचा भूतकाळ विसरून गेला असाल असे मी धरून चालतो.’ यानंतर त्या दोघांत मनमोकळी चर्चा झाली. अटलजी

अजातशत्रू

होते. डोक्यावर ओझे घेऊन ते वावरले नाहीत. ते जगले व इतरांनाही जगू दिले. दुसऱयांच्या कर्तृत्वाची त्यांनी असूया बाळगली नाही. देशातील सर्वसमावेशक संस्कृतीची कास त्यांनी धरली. साश्रुनयनांनी, गलबललेल्या अंतःकरणांनी तमाम देशवासीयांनी अटलजींना शुक्रवारी निरोप दिला. एक आनंदयात्री, ज्याने देशाला आनंद देण्याचा प्रयत्न केला तो अखेरच्या यात्रेला निघाला व त्या यात्रेत देशाचे पंतप्रधान मोदी व अनेक मनसबदार पायी चालत होते. हे त्या चालणाऱयांचे भाग्य होते. गीतेत सांगितले ते खरे मानले तर ‘शस्त्रास्त्रांनी अशी माणसे कधीच मरत नाहीत. अग्नीने ती कधीच जळत नाहीत. पाण्याने ती कधीच भिजत नाहीत. वाऱयाने ती कधीच सुकत नाहीत’ असे हिंदुस्थानी तत्त्वज्ञान सांगते. अटलजींची यात्रा ही एका दिलदार, सत्त्वशील वीरपुरुषाची यात्रा होती. या वीरपुरुषाने जेवढे प्रेम गांधी, नेहरूंवर केले तितकेच प्रेम वीर सावरकरांवर केले. या वीरपुरुषाच्या शेवटच्या प्रवासाकडे पाहताना कार्लाइलच्या एका वचनाची आठवण ठेवली तरी पुरेशी आहे. ‘कालचे जे उद्दिष्ट होते, ती उद्याची सुरुवात आहे’ असे एक चिरंतन सत्य कार्लाइलने सांगितले आहे. आजपासून आपण त्या दिशेने वाटचाल सुरू करावयास हवी. अटलजींची अंत्ययात्रा संपेल तेव्हा ही वाटचाल सुरू झालेली असेल. एका प्रदीर्घ, विक्रमशील, सत्त्वशील कालखंडाचा हा प्रवास शेवटचा नाही. जेथे तो संपेल तेथून नवा सुरू होणार आहे. आत्मा अमर असल्याचे तत्त्व मानले तर अटलजी देशाच्या आत्म्यांत विलीन झाले आहेत, देशाचा छिन्न झालेला आत्मा नव्याने एकसंध करण्यासाठी. आज त्याची गरज आहे!