आजचा अग्रलेख : ही तर बेबंद लोकशाही!

1

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूंनी अंदाधुंद ‘शब्दबार’ उडवले जात आहेत. दोन-चार गुद्दे लगावले तर काही फरक पडत नाही, पण शेवटी अंदाधुंद गुद्देबाजीत मुद्देच नष्ट झाले तर तुमच्या लोकशाहीत निवडणुकांना अर्थ तो काय उरला? एकंदरीत काय, तर निवडणूक प्रचाराच्या घसरलेल्या पातळीने तळ गाठला आहे. इतका अंदाधुंद प्रचार कधीच झाला नव्हता. लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे?

निवडणुकांच्या प्रचाराने कोणती पातळी गाठली आहे असे विचारण्याची सोय राहिलेली नाही. पातळी नव्हे तर तळ गाठला आहे. आम्ही काय करणार व आधी आम्ही काय दिवे लावले यापेक्षा समोरचा कसा दळभद्री व आम्ही मात्र कसे संतसज्जन आहोत अशा थाटात प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. रोज नव्या गमतीजमती घडत आहेत व लोकांचे मनोरंजन होत आहे. मध्य प्रदेशातील एका सभेत स्मृती इराणी यांनी जोशात समोरच्या लोकांना प्रश्न केला, ‘‘बोला, काँग्रेस सरकारने कर्जमाफी केली आहे काय?’’ स्मृती इराणी यांना वाटले समोरून नाही! नाही!! च्या गर्जना होतील, पण झाले उलटेच, ‘‘होय, कर्जमाफी झालीय!’’ अशा घोषणा होताच स्मृतींची पंचाईत झाली. अनुपम खेर हे पत्नी किरण खेर यांच्या प्रचारासाठी चंदिगडला गेले. तेथे खेर हे जोशपूर्ण भाषण करू लागताच तेथील एका दुकानदाराने 2014 चा भाजपचा जाहीरनामा काढून खेर यांच्या हातात ठेवला. 2014 साली आपण काही आश्वासने दिली होती, त्यातील किती पूर्ण झाली ते सांगा? असा प्रश्न म्हणे त्या दुकानदाराने खेर यांना विचारला. खरेतर अशा प्रकारांना मतदारांची जागरूकता म्हणावी की राजकीय कार्यकर्त्यांची चमकोगिरी? हे ज्याचे त्याने ठरवायचे. सध्याच्या जमान्यात व खास करून प्रचाराच्या धुरळ्यात कुणी कुणाची नाडी लोंबतेय हे पाहू नये. हमाम में सब नंगे होते है. चंदिगडच्या दुकानदाराने अनुपम खेरना विचारले, ‘मागच्या पाच वर्षांत काय केले?’ हाच प्रश्न देशातील जनता

साठ वर्षे देशावर राज्य करणाऱ्या

काँग्रेसलाही जागोजाग विचारत आहे. राहुल गांधी यांचीही एका सभेत चांगलीच फजिती झाल्याची बातमी वाचली. नेहमीप्रमाणे ‘चौकीदार चोर हैं’चे नारे वदवून घेण्यासाठी राहुलने ‘चौकीदार’ अशा घोषणा लावताच समोरून ‘चोर’च्याऐवजी ‘चौकीदार चौकन्ना है’चे उत्तर मिळाले. राहुल गांधी यांच्या एका रोड शोत घुसून लोकांनी मोदी झिंदाबादचे नारे दिले. या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूंनी अंदाधुंद ‘शब्दबार’ उडवले जात आहेत. मोदी हे सैन्यदलाचा वापर राजकीय स्वार्थासाठी करीत असल्याचा आरोप राहुल गांधी सतत करीत असतात. आता मोदी यांनी राजीव गांधी पंतप्रधान असताना हिंदुस्थानी नौदलाची ‘आय.एन.एस. विराट’ ही युद्धनौका गांधी कुटुंबाची ‘टुरिस्ट टॅक्सी’ म्हणून कशी वापरली जात होती त्याचा पर्दाफाश केला आहे. मी काय केले आणि तुम्ही काय करीत आहात यापलीकडे प्रचार पुढे सरकत नाही. निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढवायच्या, निवडणुकीत काय बोलायचे व बोलू नये यासाठी निवडणूक आयोगाने सर्वच राजकारण्यांसाठी एखादा प्रशिक्षण वर्ग घेणे गरजेचे आहे. दोन-चार गुद्दे लगावले तर काही फरक पडत नाही, पण शेवटी अंदाधुंद गुद्देबाजीत मुद्देच नष्ट झाले तर तुमच्या लोकशाहीत निवडणुकांना अर्थ तो काय उरला? मध्य प्रदेशातील एका प्राध्यापक ज्योतिषाने असे भाकीत केले की, काही झाले तरी यावेळी भाजपला बहुमत मिळेल. मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. हे

भाकीत वर्तमानपत्रांत

प्रसिद्ध होताच मध्य प्रदेश सरकारने त्या ज्योतिष प्राध्यापकाला नोकरीवरून बडतर्फ केले. काँग्रेस राजवटीत भविष्य वर्तवणे हा गुन्हा ठरला आहे काय? समजा त्या प्राध्यापक ज्योतिषाने भविष्य राहुल गांधींच्या बाजूने सांगितले असते तर कमलनाथ सरकारने त्या प्राध्यापकास बढती देऊन एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमले असते काय? हीसुद्धा एक प्रकारची हुकूमशाहीच समजायला हवी. जेवढे तुमच्या सोयीचे आहे तेवढेच लोकांनी बोलायचे का? शिस्तभंगाच्या आरोपाखाली सीमा सुरक्षा दलातून बडतर्फ केलेला जवान तेजबहाद्दूर यास पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात समाजवादी पार्टी व मायावतीतर्फे उमेदवारी दिली जाते. हे महाशय दारूच्या धुंद नशेत पंतप्रधानांच्या विरोधात गरळ ओकतात. लोक तो ‘व्हिडीओ’ पाहतात, पुन्हा ज्या बेशिस्त तेजबहाद्दूरचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोग रद्द करते त्या तेजबहाद्दूरसाठी राजकीय पक्ष गळा काढताना दिसतात तेव्हा चिंता वाटते. एका बाजूला जवानांचे शौर्य आणि बलिदान तर दुसर्‍या बाजूला हा बेशिस्तपणा. शिवाय त्या बेशिस्तीला लोकशाहीच्या मखरात बसविण्यासाठी विरोधकांनी केलेला आटापिटा. हे सगळंच भयंकर आहे. एखाद्या सामान्य नागरिकालाही पंतप्रधानाच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे हे मान्य, पण तेजबहाद्दूरच्या बेबंदपणास इतके समर्थन कशासाठी? एकंदरीत काय, तर निवडणूक प्रचाराच्या घसरलेल्या पातळीने तळ गाठला आहे. इतका अंदाधुंद प्रचार कधीच झाला नव्हता. लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे?