आजचा अग्रलेख : कोलकात्यातील दंगल!

शारदा चिट फंड घोटाळय़ातील आरोपीना सोडता कामा नये, पण गेल्या चार वर्षांत देशात घडलेल्या चिट इंडियाप्रकरणाकडे सी. बी. आय.चा अर्धमेला पोपट कोणत्या नजरेने पाहत आहे? श्री. मोदी यांनी कोलकात्यातील दंगल आणि सर्व घटनाक्रमाकडे पंतप्रधान म्हणून पाहावे. ते आधी पंतप्रधान, नंतर भाजपचे नेते आहेत. . बंगालातील ठिणगी वाढू नये. देशात अशांतता व भयाचे वातावरण निर्माण होणे लोकशाहीला मारक आहे.

पश्चिम बंगालच्या भूमीवर जे राजकीय युद्ध पेटले आहे ती नव्या अराजकतेची ठिणगी आहे. केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा हा सामना नसून ममता विरुद्ध मोदी, भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेसची ही लढाई आहे. प. बंगालातले नाटय़ धक्कादायक आहे. कोलकाता पोलीस आयुक्तांच्या घरी सी.बी.आय.चे पथक पोहोचले. शारदा चिट फंड घोटाळय़ात सी.बी.आय.ला आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करायची होती. पण देशातील प्रमुख, सर्वोच्च तपास यंत्रणेचे अधिकारी कोलकाता आयुक्ताच्या घरी पोहोचले ते इतक्या गडबडीत की त्यांच्याकडे तपासासंदर्भात कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. त्यांच्याकडे समन्स नसल्याने सी.बी.आय. पथक बेकायदेशीर घुसले असा ठपका ठेवून कोलकाता पोलिसांनी सी.बी.आय.च्या पथकालाच अटक केली. मुख्यमंत्री ममता यांनी संपूर्ण प. बंगालात व नंतर देशभरात जो हंगामा केला त्यातून देशातील सद्यस्थितीचे दर्शन घडत आहे. न्यायालये, रिझर्व्ह बँक, नीती आयोग व सी.बी.आय.सारख्या संस्थांनी गेल्या काही वर्षांत आपली प्रतिष्ठा गमावली आहे. दिल्लीत ज्यांची सत्ता त्यांच्या मनगटावर बसलेले पोपट अशी या संस्थांची अवस्था झाली. अशा पोपटांवर भरवसा कसा ठेवायचा? गेल्या अनेक वर्षांपासून ‘सी.बी.आय.’ नावाचा पोपट अर्धमेल्या अवस्थेत पडला आहे. सरकारला किंवा सत्ताधारी पक्षाला जेव्हा हवे तेव्हा त्या पक्ष्याला ‘गरुडा’ची झालर लावून विरोधकांवर सोडले जाते. गेल्या सहा महिन्यांत सी. बी. आय.च्या दोन गटांत एकप्रकारे टोळीयुद्धच झाले. सी. बी. आय. आपल्या हातात राहावी म्हणून तेथे आपली माणसे चिकटवणे सुरू झाले व ही संस्था मोडीत निघाली. नव्या सी. बी. आय. संचालकांनी सूत्रे हाती घेताच कोलकात्यात

सी. बी. आय. विरुद्ध प. बंगाल सरकार

हा बखेडा का सुरू झाला? 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे गणित नव्या झगडय़ामागे आहे. 2014 प्रमाणे भाजपला यश मिळत नाही. किमान शंभर जागा उत्तरेपासून महाराष्ट्रापर्यंत कमी पडतील. त्या शंभर नव्या जागांची भरपाई करण्यासाठी भाजप सरकार प. बंगालसारख्या राज्यांकडे आशेने पाहत आहे. प. बंगालसारख्या राज्यातून दहा-पंधरा जागा पदरात पाडून घ्याव्यात व इतर राज्यांतून घट भरून काढावी व शंभरची ‘घट’ कमी करावी, यासाठी कोणत्याही थराला जावे असा हा सगळा डाव आहे. प. बंगालात ‘रथयात्रे’चे राजकारण झाले. तेथे संघर्षाची ठिणगी पडली. ममता बॅनर्जी दुर्गामातेच्या विरोधात आहेत, त्यामुळे बंगालातील हिंदूंनी भाजपास मतदान करावे ही भाजपची भूमिका ठीक आहे, पण अयोध्या रथयात्रा काढून शेकडो करसेवकांचे बळी घेऊनही अयोध्येत राममंदिर का उभे राहिले नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम बंगालला एक अस्मिता आहे. साहित्य, संस्कृती, संगीत, कला आणि अपमानाविरुद्ध झगडण्याची परंपरा आहे. क्रांती आणि लढय़ाचा वारसा आहे. ममतांशी आमचे राजकीय मतभेद आहेत व राहतील, पण शेवटी या बंगालच्या वाघिणीने सगळय़ांनाच दे माय धरणी ठाय करून सोडले आहे. सी. बी. आय.च्या अधिकाऱ्यांना ममता यांनी रोखले व देशात गरम हवा निर्माण केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आता प. बंगालमधील सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. ‘‘सीबीआय अधिकाऱ्यांविरोधात राज्य पोलिसांनी अशी कारवाई करण्याचा प्रकार देशात प्रथमच घडला असून तो ‘दुर्दैवी’ आणि ‘अभूतपूर्व’ आहे’’ असे तर ते म्हणालेच, पण केंद्राला

कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार

आहेत याचीही जाणीव राजनाथ यांनी करून दिली आहे. देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी व्यक्त केलेले मत केंद्र सरकार आणि ममता सरकार यांच्यातील राजकीय संबंध किती टोकाचे ताणले गेले आहेत याचेच द्योतक म्हणावे लागेल. केंद्राच्या ‘अरे’ला ममता ‘का रे’ने प्रत्युत्तर देत आहेत. पुन्हा सी. बी. आय.ला चौकशीसाठी जायचेच होते तर मग सोबत ‘समन्स’ का नेले नाही? कोलकाता येथे अमित शहा यांनी ममतांना आव्हान देणारी सभा घेतली. पाठोपाठ पंतप्रधान मोदी यांनी चेंगराचेंगरीत माणसे मरतील इतकी प्रचंड सभा घेऊन ममतांवर तोफा डागल्या. लगेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ममता यांना आव्हान द्यायला कोलकात्यात गेले, पण त्यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले गेले नाही. उत्तर प्रदेशातील सर्व प्रश्न संपले व आता योगींना प. बंगाल सांभाळायचे आहे काय? योगींनी म्हणे नंतर फोनवरूनच सभेला संबोधित केले आणि पुढच्या चोवीस तासांतच सी. बी. आय.चे पथक कोलकाता पोलीस कमिशनरच्या घरी पोहोचले. शारदा चिट फंड घोटाळय़ाची कागदपत्रे नष्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सी. बी. आय.ला हे सर्व दोनेक महिन्यांपूर्वी करता आले असते. शारदा चिट फंड घोटाळय़ातील आरोपीना सोडता कामा नये, पण गेल्या चार वर्षांत देशात घडलेल्या ‘चीट इंडिया’ प्रकरणाकडे सी. बी. आय.चा अर्धमेला पोपट कोणत्या नजरेने पाहत आहे? श्री. मोदी यांनी कोलकात्यातील दंगल आणि सर्व घटनाक्रमाकडे पंतप्रधान म्हणून पाहावे. ते आधी पंतप्रधान, नंतर भाजपचे नेते आहेत. प. बंगालातील ठिणगी वाढू नये. देशात अशांतता व भयाचे वातावरण निर्माण होणे लोकशाहीला मारक आहे.

  • Dipak

    I think Sena will open an account with one seat in general elections. Hope next time CBI should not come to Mumbai.

  • D.P.Godbole,

    खुद्द श्रीमती ह्यांचे आजवरचे राजकारण सनदशीर आहे असे आपण छातीठोकपणे म्हणू शकता काय ? न खाणे दुंगा ह्या उक्तीला अनुसरून पंतप्रधान ह्यांचे कामकाज चालू असल्यामुळे एकजात सारे विरोधी चावातालाल्यासारखे झाले आहेत दुर्दैवाने आपण देखील कोल्ह्यांचे टोळीत अडकत आहात.