आजचा अग्रलेख : फक्त मोदीच!

35

लोकांनी ठरवले व मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान केले. हे यश मोदी यांच्या लोकप्रियतेचे व अमित शहा यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे. प. बंगालात ममता बॅनर्जी यांच्यासमोर त्यांनी सरळ ‘जय श्रीरामा’स म्हणजे हिंदुत्व उभे केले. त्या राज्यात हिंदुत्व तुफान विजयी झाले. विरोधकांनी बेरोजगारीपासून शेतकऱ्यांपर्यंत अनेक प्रश्न प्रचारात उभे केले. हे सर्व सोडविण्यासाठी पुन्हा मोदीच योग्य हे शेवटी जनतेने मान्य केले. काँग्रेसने साठ वर्षे देश रगडला, मग मोदींना आणखी पाच वर्षे का देऊ नये? लोकांनी मोदी यांच्यावर जबरदस्त विश्वास दाखवला. नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन!

हिंदुस्थानच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा आशीर्वाद दिले आहेत. उज्ज्वल भूतकाळापेक्षाही उज्ज्वलतर भविष्यकाळ प्राप्त होईल हाच तो आशीर्वाद आहे. मोदी हेच देशाचे भाग्यविधाते आहेत व मोदींसमोर संपूर्ण विरोधक पाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. ‘‘मोदी हरत आहेत,’’ असे राहुल गांधी शेवटच्या दिवसापर्यंत सांगत होते. स्वतः राहुल गांधी अमेठीत पराभूत झाले आहेत. मोदी यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी विद्वेषी प्रचार केला. मतदारांनी तो मान्य केला नाही. मोदी यांच्या तुलनेत विरोधी पक्षात प्रभावी नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व नाही. त्यामुळे काँग्रेससह सगळ्याच राजकीय विरोधकांची शोचनीय अवस्था होऊन गेली आहे. एकमेकांच्या तंगड्यांत तंगडी अडकवून विरोधक एकजुटीचे प्रदर्शन करीत होते, पण झाले काय? राष्ट्रीय लोकशाही आघाडीस आव्हान देणारे भले भले दिग्गज पडले आहेत. 2014 साली मोदी यांच्या नेतृत्वाने एकतर्फी विजय प्राप्त केला होता. 2019 साली विरोधकांनी मोठे वादळ उठवल्याचा भास निर्माण केला. प्रत्यक्षात तो हवेचा झोकाही निघाला नाही. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोदीप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निर्विवाद मुसंडी मारली व लालकिल्ल्यावर पुन्हा एकदा भगवा फडकला. याचे विश्लेषण कसे करणार? राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 350चा टप्पा पार केला आहे. भाजपने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह सगळे भुईसपाट झाले. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड पुन्हा राखला हाच काय तो राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा म्हणता येईल. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप

युतीची सरशी

झाली आहे. शिवसेनेच्या काही हक्काच्या जागा पडल्या, पण नवे वाघ निवडून आले. विरोधकांनी जे प्रश्न देशात उपस्थित केले त्यात प्रामुख्याने संरक्षण खरेदीतील राफेल लढाऊ विमानांचा विषय होता. राफेल विमान सौद्यात मोदी सरकारने भ्रष्टाचार केला व अनिल अंबानी यांना फायदा व्हावा यासाठी सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला… ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा राहुल गांधी जाहीर सभेतून देत राहिले, पण देशाच्या जनतेने चौकीदारावर प्रचंड विश्वास व्यक्त केला. मोदी यांनाच पुन्हा देशाचे चौकीदार म्हणून नेमले. देशातील असे एकही राज्य नाही की जेथे मोदी विजयाची पताका फडकली नाही. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, ईशान्येकडील सर्व राज्ये मोदीमय झाली. बिहारात फक्त मोदीच आहेत. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव यांचे महागठबंधन मोदी यांना आव्हान देईल व भाजपास पंधरा जागाही मिळणार नाहीत, असे ठामपणे बोलणारे तोंडावर आपटले. उत्तर प्रदेशबाबतीत सर्व ‘एक्झिट पोल’ खोटे ठरले व महागठबंधनवर भाजप भारी पडला. जात, धर्म यांच्या भिंती पाडून लोकांनी मतदान केले. मोदी यांची लोकप्रियता 2014च्या तुलनेत वाढत गेली व त्याचा अंदाज विरोधकांना आला नाही. चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडून दारुण पराभव पदरी पाडून घेतला. आंध्रात त्यांनी सत्ता गमावली व लोकसभेत दोन जागांवरही विजय मिळवता आला नाही. मतमोजणीच्या एक दिवस आधी नायडू हे विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत होते. जणू मोदी हे आता कायमचेच केदारनाथला जात असून दिल्लीत विरोधकांचे राज्य आलेच आहे, या थाटात ते

पंतप्रधान निवडीच्या कामास

लागले होते. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील पंतप्रधानपदाचे सर्व संभाव्य उमेदवार कोसळले आहेत. हे कसले लक्षण समजायचे? शिवसेना कायम राष्ट्रीय लोकशाही आघाडीची घटक राहिली. राष्ट्राच्या व जनतेच्या प्रश्नांवर शिवसेना आपली परखड मते मांडत राहिली, पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीस तडे जातील असे कृत्य शिवसेनेने केले नाही. आमची भूमिका काल व आजही ठाम आहे. काँग्रेससह सर्वच ढोंगी निधर्मीवाद्यांना फक्त एकच पर्याय असू शकतो तो म्हणजे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी. देशाच्या जनतेने त्यावर पुन्हा एकदा मोहोर उठवली. काँग्रेस पक्षाचा उरलासुरला जीवही कालच्या निकालाने संपला. शेवटचा उपाय म्हणून काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी यांना राजकारणात आणले व उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. मात्र प्रियंकामुळे काँगेसला उत्तरेत पाच जागाही जिंकता आल्या नाहीत. लोकांनी ठरवले व मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान केले. हे यश मोदी यांच्या लोकप्रियतेचे व अमित शहा यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे. प. बंगालात ममता बॅनर्जी यांच्यासमोर त्यांनी सरळ ‘जय श्रीरामा’स म्हणजे हिंदुत्व उभे केले. त्या राज्यात हिंदुत्व तुफान विजयी झाले. विरोधकांनी बेरोजगारीपासून शेतकऱ्यांपर्यंत अनेक प्रश्न प्रचारात उभे केले. हे सर्व सोडविण्यासाठी पुन्हा मोदीच योग्य हे शेवटी जनतेने मान्य केले. लोकांनी मोदी यांच्यावर जबरदस्त विश्वास दाखवला. नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन!

आपली प्रतिक्रिया द्या