आजचा अग्रलेख :  निकालाआधीचा थयथयाट!

ईव्हीएमवर पुन्हा एकदा खापर फोडण्याचा प्रकार विरोधकांनी केला. निकालाआधीचा त्यांचा हा थयथयाट निरर्थक आहे. विरोधकांना हंगामा करण्याचा अधिकार आहे, पण राष्ट्र घडविणाऱ्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून देशाच्या एकतेलाच सुरूंग लावला जात आहे. निवडणुका येतील आणि जातील, पण देश टिकावा या भूमिकेतून सगळ्यांनीच काम केले पाहिजे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत राजकीय मुद्द्यांना बगल देऊन आम्ही महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी मोदी यांना साकडे घातले ते यासाठीच! बाकी, लोकांनी कौल दिलाच आहे. आज त्यावर फक्त शिक्कामोर्तब होईल इतकेच!

उद्याची पहाट वेगळी असेल. निवडणुकीचा निकाल भविष्यकाळाच्या  उदरात असला तरी मतपेटीत काय दडले आहे याची चाहूल सगळ्यांना लागली आहे. मंगळवारी संध्याकाळी आम्ही दिल्लीत होतो. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले सर्व प्रमुख नेते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास उपस्थित होते. भोजन हे एक निमित्त होते. या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एकदिलाने उभी आहे हेच चित्र महत्त्वाचे आहे. दुसऱ्या बाजूला दिल्लीत विरोधी पक्षांचीही एक येड्यांची जत्रा भरली होती. या जत्रेत राज्या-राज्यातील अनेक ओसाड गावचे पुढारी जमा झाले व त्यांनी उद्या उगवणाऱ्या विजयाच्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. हे सगळे विरोधक पुन्हा एकदा निवडणूक आयोगास भेटले व त्यांनी ईव्हीएमसंदर्भात तक्रारींचा पाढा वाचला. मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी केल्या. स्ट्राँगरूममधील ‘ईव्हीएम’ सुरक्षित नसल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. ‘ईव्हीएम’ हॅक करून विरोधकांना पराभूत केले जाईल, अशी भीती या मंडळींनी व्यक्त केली. ईव्हीएमच्या व्हीपॅट मशीनमधून निघणाऱ्या मतपत्रिकेची शंभर टक्के मोजणी करावी अशीही मागणी या मंडळींनी केली. हे

सगळे आक्षेप

फेटाळण्यात आले, पण विरोधी पक्ष ऐकायला तयार नाही. मतदानोत्तर चाचणीचे विरोधकांनी फारच मनास लावून घेतलेले दिसते. यावरून विरोधकांची मने किती कमकुवत आहेत ते दिसून येते. निकाल अद्यापि यायचे आहेत. निदान तोपर्यंत तरी विरोधकांनी थांबायला हवे होते, पण पराभव नक्कीच होत आहे व त्याचे खापर फोडण्यासाठी त्यांनी ‘ईव्हीएम’ची योजना केलेली दिसते. निवडणूक आयोग एक निःपक्षपाती संस्था आहे व तिच्यावरचा भरवसा तुटू नये असे आम्हालाही वाटते. सध्याचा निवडणूक आयोग मोदी यांचा पक्षपाती आहे असा विरोधकांचा आरोप आहे. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की, मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कितीही नाकारले तरी प्रसिद्धीचा, चर्चेचा झोत त्यांच्यावरच राहणार. प्रचाराचा शेवटचा टप्पा संपताच मोदी हे तडक केदारनाथच्या गुहेत ध्यानधारणेसाठी निघून गेले व शेवटचे दोन दिवस प्रसिद्धीमाध्यमांचा झोत मोदींवर राहिला. हा आचारसंहितेचा भंग आहे व निवडणूक आयोग कारवाई करीत नसल्याची टीका विरोधकांनी केली. येथे महत्त्वाचा मुद्दा असा की, मोदी हे प्रचारसभा घेण्यासाठी केदारनाथला गेले नव्हते व भारतीय जनता पक्षातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन नव्हते. देशभरातील ‘मीडियास’ कुणी निमंत्रण दिले नव्हते. मोदी यांच्या

ध्यानधारणेचे वृत्तांकन

त्यांनी केले. त्यामुळे मोदी यांना जबाबदार कसे धरता येईल? ज्यांनी ध्यानधारणेचे प्रसारण केले किंवा बातम्या छापल्या त्यांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव असणारच. वृत्तपत्रे हा राष्ट्राचा चौथा स्तंभ आहे व याच स्तंभामुळे देशातील लोकशाही आजही जिवंत आहे. दुसरे असे की, केदारनाथच्या गुहेत मोदी हे मौन अवस्थेत ध्यानधारणा करीत होते. त्यांनी तेथे भाजपास मते द्या वगैरे सांगितल्याचे दिसले नाही. मग त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाला असा आरोप विरोधक करीत असतील तर ते चुकीचे आहे. अर्थात अशा आरोपांची देशवासीयांना सवय झाली आहे व 23 तारखेच्या निकालानंतर मतदार राजाच मोदी यांना सर्व आरोपांतून ‘क्लीन चिट’ देईल याविषयी आमच्या मनात शंका नाही. ईव्हीएमवर पुन्हा एकदा खापर फोडण्याचा प्रकार विरोधकांनी केला. निकालाआधीचा त्यांचा हा थयथयाट निरर्थक आहे. विरोधकांना हंगामा करण्याचा अधिकार आहे, पण राष्ट्र घडविणाऱ्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून देशाच्या एकतेलाच सुरूंग लावला जात आहे. निवडणुका येतील आणि जातील, पण देश टिकावा या भूमिकेतून सगळ्यांनीच काम केले पाहिजे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत राजकीय मुद्द्यांना बगल देऊन आम्ही महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी मोदी यांना साकडे घातले ते यासाठीच! बाकी, लोकांनी कौल दिलाच आहे. आज त्यावर फक्त शिक्कामोर्तब होईल इतकेच!

आपली प्रतिक्रिया द्या