आजचा अग्रलेख : विरोधकांना आत्मचिंतनाची गरज

81

मोदी यांना सलग दुसर्‍यांदा जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले म्हणजेच मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारभारावर जनतेने शिक्कामोर्तब केले. देशाच्या जनतेचा हा कौल आहे. तो खुल्या मनाने स्वीकारणे यातच दिलदारी आहे. लोकशाही आणि निवडणुकांत जय-पराजय होतच असतात, पण लागोपाठ दोनदा आपला दारुण पराभव का झाला याचे विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मोदी यांना देशाचे राजशकट चालवायचे आहे. विरोधकांनी त्यात अडथळे आणू नये, यातच त्यांचे हित आहे.  

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत. तेही प्रचंड बहुमताने आणि लोकप्रियतेच्या पर्वतप्राय लाटेवर आरूढ होऊन ते पंतप्रधान होत आहेत. हीच आज राष्ट्राची गरज होती. जनता संकटांशी सामना नेहमीच करीत असते. गेल्या सहा महिन्यांपासून कश्मीरच्या सीमांवर अशांतता आहे हे खरेच, पण बालाकोट येथे मोदींनी हवाई हल्ला घडवून आणला. युनोच्या सुरक्षा परिषदेत सगळी जुळवाजुळव करून मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला लावून दहशतवादावर मोठाच विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानच्या गळ्याभोवती आपोआपच फास आवळला गेला. देशातील अंतर्गत सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था कोसळून पडावी असे वर्तन विरोधकांकडून सुरू होते. निसर्गाचा कोप आणि तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरातील चढउतार यामुळे महागाई वाढत होती. विरोधक त्याचाच फायदा घेत होते. अशा या राष्ट्रीय संकटप्रसंगी मोदी यांना देशातील जनतेने अभूतपूर्व असे यश देऊन पुन्हा सत्तेवर आणले व देशाला अराजकाच्या खाईत जाण्यापासून वाचवले. यात नियतीचा हात आहे हे उघड दिसते. मोदी पुन्हा सत्तेवर आले तर लोकशाही धोक्यात येईल असा प्रचार ज्यांनी केला त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, बाजूच्या देशांत

सत्तेवर येण्यासाठी

जशा लष्करी उलथापालथी होतात, रक्तपात आणि हिंसाचार केला जातो तसे काहीही न घडता लोकशाही मार्गानेच मोदी सत्तेवर आले आहेत. मोदी यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय देशाच्या जनतेला दिले. हा हिंदुस्थानचा विजय असल्याचे सांगितले. झाड फळा-फुलांनी बहरते तेव्हा त्याच्या फांद्या वाकतात. हीच नम्रता विजयानंतर मोदी यांच्यात दिसते, पण पंतप्रधान म्हणून यापुढे मोदी यांनी अधिक कठोर होणे गरजेचे आहे. देशातल्या विरोधी पक्षाला त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. विरोधकांनीही त्यांचे काम चालूच ठेवले पाहिजे. लोकशाही प्रक्रियेत ते गरजेचे आहे. विरोधकांनी किमान सभ्यता व विनम्रतेचे दर्शन घडवले तर देशात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मुळात जे स्वतःला विरोधी पक्ष समजतात त्यांचा आवाज संसदेत व बाहेर इतका क्षीण झाला आहे की, पुढील वर्षभर आत्मचिंतनासाठी त्यांनी चारधाम यात्रेस निघून जायला हवे. गेला बाजार मक्का, मदिना, व्हॅटिकन सिटीचेही दर्शन करून यावे. कारण या धक्क्यातून सावरणे त्यांना कठीण आहे आणि

मनःशांतीसाठी

हिमालयात जाणे हे आरोग्याच्या दृष्टीने बरे आहे. मोदी हे केदारनाथला एक दिवसासाठी गेले व विरोधकांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले; पण मोदींना ईश्वराचे आशीर्वाद लाभले व आता हिमालयात राख फासून जाण्याची वेळ विरोधकांवर आली आहे. आपल्यावर ही स्थिती का आली, जनतेने आपले मुद्दे नाकारत आपल्याला पराभवाचे गुद्दे का लगावले, आपली बोलती बंद का केली अशा अनेक गोष्टींचा विचार आता विरोधकांना करावा लागेल. त्यासाठी भरपूर वेळ जनतेनेच त्यांना दिला आहे. मोदी यांना सलग दुसर्‍यांदा जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिले म्हणजेच मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारभारावर जनतेने शिक्कामोर्तब केले. देशाच्या जनतेचा हा कौल आहे. तो खुल्या मनाने स्वीकारणे यातच दिलदारी आहे. लोकशाही आणि निवडणुकांत जय-पराजय होतच असतात, पण लागोपाठ दोनदा आपला दारुण पराभव का झाला याचे विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मोदी यांना देशाचे राजशकट चालवायचे आहे. विरोधकांनी त्यात अडथळे आणू नये, यातच त्यांचे हित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या