आजचा अग्रलेख : वाजलेली मुलाखत


पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले. पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले व मुलाखतही नेहमीच्या भाषणासारखीच होती. 2019ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती. हेच सत्य आहे. मुलाखत गाजेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. मुलाखत वाजली इतकेच. पंतप्रधानांची मुलाखत म्हटल्यावर इतकी तर वाजणारच!

पंतप्रधान मोदी यांनी एक जोरकस मुलाखत एकाच वृत्तवाहिनीला दिली आहे. मुलाखत मोजून 95 मिनिटांची असल्याचे बोलले जाते. पंतप्रधानांची मुलाखत मोठय़ा कालखंडाने येत असल्याने ‘चर्चा तर होणारच.’ तशी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी व प्रश्नोत्तरे करावीत अशी मागणी होती. मोदी यांनी एकाच वाहिनीस मुलाखत देऊन ती प्रसारित केली. पंतप्रधानांनी जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. तो चुकीचा आहे. राममंदिर, नोटाबंदी, उद्याच्या सार्वत्रिक निवडणुका वगैरे विषयांवर ते बोलले, पण जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळाली काय? सध्या राममंदिराचा विषय जोरात आहे. मंदिराबाबत मोदी एखादी महत्त्वाची घोषणा करून अयोध्येतील प्रभू श्रीरामाचा वनवास संपवतील अशी अपेक्षा होती. मात्र मोदी यांनी नेमकी विरुद्ध भूमिका घेतली आहे. राममंदिरासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेसह शिवसेनेची होती. मोदी यांनी ती साफ ठोकरून लावली आहे. मोदी म्हणाले, काही झाले तरी अध्यादेश काढणार नाही. राममंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल. मोदी यांनी हे परखडपणे सांगितले ते बरे झाले व गेल्या चार-पाच वर्षांत  ते प्रथमच खरे बोलले. राममंदिर हा त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय नाही. इतर अनेक विषयांना त्यांना पुढे घेऊन जायचे आहे. रामाच्या नावावर सत्ता मिळाली व कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी सांगितले. मोदी यांच्या बहुमताच्या राज्यात राममंदिर होणार नसेल तर कधी होणार, हा प्रश्न आहे.

अयोध्येचा विषय

सर्वोच्च न्यायालयात आहे व काँग्रेस राजवटीपासून तो आहे. जो निकाल लागेल तो काँगेससह सगळय़ांना स्वीकारावा लागेल. त्यामुळे न्यायालयातील निकालाचे श्रेय कोणी घेण्याचे कारण नाही. राममंदिराची सुनावणी याच महिन्यात सुरू होईल, पण विषय 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राममंदिर उभारण्याचा व त्यासाठी अध्यादेश काढण्याचा आहे. मोदी त्यास तयार नाहीत. मोदी यांनी गुजरातेत सरदार पटेलांचा भव्य व जागतिक उंचीचा पुतळा उभा केला, पण मंदिरप्रश्नी त्यांनी सरदारांची हिंमत दाखवली नाही. याची नोंद इतिहासात राहील. राममंदिराचे नंतर पाहू, आधी निवडणुका लढवू असा त्यांचा डाव दिसतो. यावर भाजपमधील रामभक्त तसेच रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे काय सांगणे आहे? 2019 आधी राममंदिर होणार नसेल तर ती देशाची फसवणूक ठरेल व त्याबद्दल भाजपास, संघ परिवारास देशाची माफी मागावी लागेल. 1991-92 साली राममंदिराचा लढा झाला. त्यात शेकडो कारसेवक मारले गेले. मग हा हिंदू नरसंहार कोणी कशासाठी घडवला? राममंदिराच्या आंदोलनात शेकडो हिंदू कारसेवक मरण पावलेच, पण मुंबईसह देशात अनेक ठिकाणी दंगे उसळले व त्यातही दोन्ही बाजूंनी मोठा नरसंहार झाला. याचा बदला म्हणून मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवून शेकडो बळी घेतले गेले ते वेगळेच. न्यायालयांच्या प्रक्रियेतून राममंदिराचा निर्णय घ्यायचा होता मग हा रक्तपात आणि नरसंहार घडवला कशासाठी? त्याची जबाबदारी भाजप किंवा संघ परिवार आता घेणार आहे काय? शीख हत्याकांडाबद्दल ज्याप्रमाणे काँग्रेसला माफी मागावी लागली तसे हिंदू नरसंहाराबद्दल माफी मागा असे कोणी म्हणाले तर त्यांच्याही भावना समजून घ्या. राममंदिर हा फक्त

निवडणूक जुमला

होता व पुढील निवडणुकीतही तो तसाच राहील हे आता नक्की झाले. मोदी यांनी हे सत्य सांगितले. त्यामुळे संभ्रम दूर झाला. नोटाबंदीचा विषय मोदी यांनी घेतला. नोटाबंदी हा झटका नव्हता. एक वर्ष आधीच जनतेला सावध केले होते असे मोदी म्हणाले. आता ही जनता कोण? बँकांच्या रांगेत उभी राहिलेली आणि रोजगार गमावल्यामुळे जे तडफडून मेले ती जनता नव्हती काय? धनदांडग्यांचा काळा पैसा सहज पांढरा झाला व मोदी सरकारच्या हाती काहीच लागले नाही. परदेशातील काळा पैसा देशात आणायचा व त्यातले प्रत्येकी 15 लाख जनतेच्या बँक खात्यावर जमा करण्याचा वायदा होता. साहेब, त्याचे काय झाले? खरे म्हणजे नोटाबंदी हा झटका नव्हता, तर जनतेसाठी फाशीचा खटका होता. पाकिस्तानबाबत पंतप्रधान महोदयांनी गोलमाल उत्तर दिले आहे. एका सर्जिकल स्ट्राईकने सुधारण्यातला पाकिस्तान नाही हे माहीत असल्यामुळेच जनतेने मोदी यांना पंतप्रधान केले. राममंदिर व पाकिस्तान या दोन प्रमुख विषयांमुळे भाजप विजयी झाला व मोदी पंतप्रधान बनले, पण जनतेच्या हाती धुपाटणेच आले. ‘‘पुढील निवडणूक जनता विरुद्ध महाआघाडी’’ असा नारा मोदी यांनी दिला आहे. मग 2014 साली त्यांना पाकिस्तान, इराणच्या जनतेने मतदान केले होते काय व पाच राज्यांत भाजपचा पराभव करणारा मतदार ही या देशाची जनता नव्हती काय? पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले. पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले व मुलाखतही नेहमीच्या भाषणासारखीच होती. 2019ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती. हेच सत्य आहे. मुलाखत गाजेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. मुलाखत वाजली इतकेच. पंतप्रधानांची मुलाखत म्हटल्यावर इतकी तर वाजणारच!