अग्रलेख : वाढता वाढता वाढे…!

कुटुंबहा मुळातच इतका व्यक्तिगत आणि खासगी विषय आहे की, त्यावर संयुक्त राष्ट्रसंघ वा कुठलाही देश थेट लुडबूड करू शकत नाही. शिवाय लोकसंख्यावाढीला आळा घालण्याच्या प्रयत्नात कोणाचा धर्म आडवा येतो, तर कोणाच्या रूढी, परंपरा आणि चालीरीती. भीक मागू पण लोकसंख्या वाढवू, या धोरणामुळेच वाढता वाढता वाढेया पद्धतीने जागतिक लोकसंख्या दर दहा वर्षांनी नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. कोणाचेच कोणावर नियंत्रण नाही. आपण फक्त दिनसाजरे करायचे.

वाढती लोकसंख्या हा आता जगभरासाठी चिंतेचा विषय झाला आहे. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने बुधवारी तमाम लोकसंख्यापीडित देशांमध्ये लोकसंख्येच्या विस्फोटावर चिंता वाहण्याचे औपचारिक कार्यक्रम सालाबादप्रमाणे पार पडले. पर्यावरण दिन, जागतिक मातृदिन, प्रेमदिन वगैरे जसे जगभर साजरे केले जातात त्याच पद्धतीने जागतिक लोकसंख्या दिनाची औपचारिकता दरवर्षी ११ जुलैला पार पाडली जाते. पुन्हा हा दिवस साजरा कसा करायचा हेही एक कोडेच! त्यामुळे शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमधून लोकसंख्येच्या भस्मासुराविषयी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि एखाद्या विचारवंताचे व्याख्यान वगैरे आयोजित केले की जबाबदारी संपली असा सगळा प्रकार. दरवर्षी हे सोपस्कार नेटाने पार पाडले जातात. मात्र लोकसंख्यावाढीची स्पर्धा काही केल्या कमी होत नाही. संयुक्त राष्ट्रसंघ अर्थात युनोने १९८९ मध्ये ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून पाळण्याची घोषणा केली. त्याला आता ३० वर्षे होत आहेत. मात्र वर्षानुवर्षे अशाप्रकारचा दिन साजरा करून जगाची लोकसंख्या काही प्रमाणात तरी आटोक्यात आली काय? यंदाच्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने ‘कुटुंब नियोजन- प्रत्येक मनुष्याचा अधिकार’ अशी थीम स्वीकारली होती. ही थीम किंवा टॅगलाइन विचार म्हणून चांगलीच आहे. तथापि, पृथ्वीतलावरील समस्त मनुष्यप्राण्याने मात्र ‘लोकसंख्यावाढ – आमचा अधिकारच’ अशी अघोषित टॅगलाइन स्वीकारली असल्यामुळे

जगाच्या लोकसंख्येचा आलेख

झपाटय़ाने वाढतो आहे. इ.सन १८०० मध्ये संपूर्ण जगाची लोकसंख्या १०० कोटी इतकी होती. त्यानंतरच्या सव्वाशे वर्षांत हा आकडा दुपटीने वाढला. विसावे शतक सुरू झाल्यापासून तर उद्रेकच म्हणावा अशा अनियंत्रित पद्धतीने लोकसंख्या वाढत गेली. सध्या जागतिक लोकसंख्या ७६३ कोटींवर जाऊन पोहोचली आहे. संपूर्ण जगाची लोकसंख्या १०० कोटींवर पोहोचण्यासाठी जिथे २ लाख वर्षे लागली तिथे नंतरच्या अवघ्या २१४ वर्षांत ६५० कोटींची भर पडली.  दोन-एकशे वर्षांत जुने विक्रम दुपटी आणि चौपटीने मोडून काढत लोकसंख्येचा राक्षस किती वेगाने पुढे निघाला आहे याची कल्पना या आकडय़ांवरून यावी. आजघडीला जगाच्या ७६३ कोटी लोकसंख्येपैकी ५८ टक्के लोकसंख्या केवळ १० देशांतच आहे. त्यात चीन (१४१ कोटी) पहिल्या तर हिंदुस्थान (१३५ कोटी) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही हिंदुस्थानचा लोकसंख्यावाढीचा वेग जगात सर्वाधिक आहे आणि यापुढेही तो असाच राहिला तर येत्या सात वर्षांतच म्हणजे २०२५ मध्ये चीनला मागे टाकून हिंदुस्थान हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. याला लोकसंख्येची महासत्ता म्हणायचे की कॉलर टाइट करून मिरवण्याचा पराक्रम, याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा. त्यातही चीनने मधल्या काळात ‘एक दांपत्य एक मूल’ हे धोरण सक्तीने राबवून ३६ वर्षांत सुमारे ४० कोटींची लोकसंख्यावाढ रोखली. तथापि यामुळे देशातील

वृद्धांची संख्या वाढली

आणि तरुणांची संख्या कमी झाली. कारखानदारीसाठी लागणारे मनुष्यबळ आणि विकासदर यावर परिणाम होत असल्याने चीन सरकारने आता कुटुंबनियोजनाच्या सक्तीला काही प्रमाणात ‘सैल’ करावे अशी सूचना चिनी तज्ञच करू लागले आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पहिल्या दहा देशांपैकी अमेरिका आणि रशिया या दोन देशांचे भौगोलिक क्षेत्र अफाट असल्यामुळे या दोन्ही देशांना लोकसंख्यावाढीचे चटके अजून तरी बसलेले नाहीत. चीन, हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया यांसारख्या देशांना मात्र याचा मोठा फटका बसला. गरिबी, दारिद्रय़, बेरोजगारी आणि एकूणच भुकेकंगाल आयुष्य जगण्याची वेळ या देशांतील एका मोठय़ा समूहावर आली. शिक्षण नाही, त्यामुळे उत्पन्नाची साधने नाहीत आणि याच गरीब वर्गातील जन्मदराचे प्रमाण मात्र प्रचंड. जिथे एका मुलाची गुजराण करणे कठीण तेथेच खाणारी तेंडे अधिक. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले. त्यात ‘कुटुंब’ हा मुळातच इतका व्यक्तिगत आणि खासगी विषय आहे की, त्यावर संयुक्त राष्ट्रसंघ वा कुठलाही देश थेट लुडबूड करू शकत नाही. पुन्हा लोकसंख्यावाढीला आळा घालण्याच्या प्रयत्नात कोणाचा धर्म आडवा येतो, तर कोणाच्या रूढी, परंपरा आणि चालीरीती. भीक मागू, पण लोकसंख्या वाढवू, या धोरणामुळेच ‘वाढता वाढता वाढे’ या पद्धतीने जागतिक लोकसंख्या दर दहा वर्षांनी नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. कोणाचेच कोणावर नियंत्रण नाही. आपण फक्त ‘दिन’ साजरे करायचे. जागतिक लोकसंख्या दिनाचा विजय असो!