आजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आफ्रिदीने त्याच्या देशाला कश्मीरप्रश्नी दोन शब्द सुनावले म्हणून उडय़ा मारायच्या की कश्मिरी स्वातंत्र्याचा ‘चांदतारा’ पुन्हा फडकविला म्हणून त्याचेच कान उपटायचे, असा प्रश्न आहे. अर्थात पाकिस्तानात गदारोळ होताच आफ्रिदीने यू टर्न घेतला. ‘कश्मिरींच्या लढय़ाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे’ असे गरळ ओकून आपले खरे दातही दाखवले. आफ्रिदीचे आधी कौतुक करणाऱ्यांनी आणि त्याने यू टर्न घेतल्यानंतर त्याला शिव्या घालणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने

कश्मीरवरून त्याच्याच देशाला दोन शब्द सुनावले. पाकिस्तान आपलेच चार प्रांत नीट सांभाळू शकत नाही तेव्हा कश्मीर काय सांभाळणार, असा सवाल म्हणे आफ्रिदीने केला. आफ्रिदी बोलला त्यात चुकीचे काहीच नाही. पाकिस्तानला स्वतःलाच सांभाळताना नाकीनऊ आले आहेत. दहशतवाद आणि भ्रष्टाचार पोसता पोसता तो देश एवढा कंगाल झाला आहे की, सरकारी खर्चासाठी पंतप्रधान निवासस्थानातील म्हशी, गाडय़ा विकण्याची आफत विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आली. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर पाकिस्तान सध्या उभा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे त्यांना ‘बेल आऊट पॅकेज’ची विनंती करावी लागली यावरून त्या देशाच्या आर्थिक अरिष्टाची कल्पना येते. पुन्हा नाणेनिधीने ही विनंती फेटाळल्याने इम्रान खान यांना चीनच्या दारात कटोरा घेऊन जाण्याची वेळ आली. चीनने म्हणे त्यांना सहा अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य देण्याचे कबूल केले आहे. म्हणजे तो पैसा आला तर पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला तात्पुरता ‘ऑक्सिजन’ मिळू शकेल. ज्या पाकिस्तानला स्वतःची अर्थव्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी

चीनच्या आर्थिक ऑक्सिजनची

गरज भासत आहे तो पाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार असे आफ्रिदीला म्हणायचे असावे. खरं तर आफ्रिदीच कशाला, पाकिस्तानच्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे हेच मत असणार. मात्र पाकिस्तानात सामान्य माणसाला विचारतंय कोण? त्याच्यापेक्षा पाकडे राज्यकर्ते आणि लष्करशहांनी दहशतवादाचा जास्त विचार केला, पाकिस्तान आणि पाकिस्तानी जनतेच्या भल्यापेक्षा हिंदुस्थानच्या वाईटाचा विचार नेहमी केला. त्यामुळेच आज 70 वर्षांनंतर त्या देशावर कटोरा घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. तेव्हा आफ्रिदीसारख्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने स्वदेशी राज्यकर्ते आणि लष्करशहांच्या ‘कश्मीरप्रेमा’चे वस्त्रहरण केले असेल तर त्यात वावगे काही नाही. अर्थात आफ्रिदीने त्याच्या देशाच्या कश्मीर धोरणावर टीका केली म्हणजे पाकडय़ांचे वळवळणारे शेपूट शांत होईल असे नाही. त्यामुळे त्याने कश्मीरवरून त्याच्या देशाला घरचा आहेर दिला म्हणून आपण फार हुरळून जायचे कारण नाही. कारण आफ्रिदी हादेखील हिंदुस्थानद्वेष्टाच आहे. हिंदुस्थानद्वेषाचे गरळ त्याने यापूर्वी अनेकदा ओकले आहे. काही महिन्यांपूर्वी जम्मू-कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कराने 13 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर याच आफ्रिदीला त्या दहशतवाद्यांबद्दल पान्हा फुटला होता. ठार मारलेले

दहशतवादी ‘निर्दोष’असल्याचे

प्रमाणपत्र देत त्याने कश्मीरमधील या ‘खुनी खेळा’बाबत संयुक्त राष्ट्रांचा धावा केला होता. शिवाय कश्मीर स्वतंत्र व्हावा असेच त्यालाही वाटते. आतादेखील त्याने ‘कश्मीर हिंदुस्थानलाही देऊ नका, तो स्वतंत्रच व्हायला हवा’ हा नेहमीचा पाकिस्तानी राग आळवलाच होता. कश्मीरमधील ‘जीवितहानी’बद्दलही पुन्हा नक्राश्रू ढाळले. तेव्हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आफ्रिदीने त्याच्या देशाला कश्मीरप्रश्नी दोन शब्द सुनावले म्हणून उडय़ा मारायच्या की कश्मिरी स्वातंत्र्याचा ‘चांदतारा’ पुन्हा फडकविला म्हणून त्याचेच कान उपटायचे, असा प्रश्न आहे. अर्थात त्याचे उत्तर खुद्द आफ्रिदीने 24 तासांतच देऊन टाकले. पाकिस्तानात गदारोळ होताच आफ्रिदीने यू टर्न घेतला. अपेक्षेप्रमाणे आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे नेहमीचे तुणतुणे वाजवीत त्याने त्याचे खापर हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांवर फोडले. मुख्य म्हणजे, ‘कश्मिरींच्या लढय़ाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे’ असे गरळ ओकून आपले खरे दातही दाखवले. कश्मीरप्रश्नी पाकडय़ांची, मग ते कोणीही असोत, नियत कधीच साफ नव्हती आणि नाही. आफ्रिदी प्रकरणात ते पुन्हा दिसले इतकेच! आफ्रिदीचे आधी कौतुक करणाऱ्यांनी आणि त्याने यू टर्न घेतल्यानंतर त्याला शिव्या घालणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे.