आजचा अग्रलेख : कटोरा आणि खंजीर

111

विरोधकांना शिवसेनाभाजप युतीशी सामना करायचा नाही. त्यांना आपापसात लढायचे आहे. कौरवांतच युद्ध माजले आहे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकशाहीचा ते गळा घोटतील, असे सांगणारे विरोधकच एकमेकांचे गळे घोटताना दिसत आहेत. वंचित समाजातील जनतेला प्रकाशकिरणे दाखविण्यासाठी ज्यांनी आघाडय़ा उभ्या केल्या ते विरोधकच वंचित व शोषितांच्या रांगेत कटोरे घेऊन उभे आहेत. एका हातात कटोरा, दुसऱ्या हातात खंजीर. खंजीर पाठीत खुपसण्याची स्पर्धा विरोधकांत सुरू असताना जनतेने त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची?

बहुसंख्य काँग्रेसवाल्यांचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा व प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करावी. यावर आंबेडकरांनी लगेच जाहीर करून टाकले की, काँग्रेसबरोबर आघाडी करायची की नाही हे आताच सांगता येत नाही. काँग्रेसला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यातला प्रमुख प्रश्न म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने केलेला आरोप. ‘आंबेडकर-ओवेसी यांची वंचित आघाडी ही भारतीय जनता पक्षाची ‘बी’ टीम म्हणजे अंगवस्त्र्ा आहे. काँग्रेसची मते खाण्यासाठीच ओवेसी-आंबेडकर यांनी उमेदवार उभे केले आहेत,’ असा आरोप काँग्रेसवाल्यांनी केला होता. आता आंबेडकर म्हणतात, ‘आम्ही भाजपची ‘बी टीम’ आहोत की नाही याचा स्पष्ट खुलासा काँग्रेसने करावा. त्यानंतर आम्ही काय ते ठरवू.’ वंचित आघाडीने आठ-दहा मतदारसंघांत बऱ्यापैकी मते घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार पडले तर काही ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपवाल्यांना मदत केली, असे रडगाणे काँग्रेसवाले गात आहेत. स्वतः अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. पुण्यातील ‘मावळा’त अजित पवारांच्या पार्थचे चाक पराभवाच्या चिखलात रुतले. एकंदरीत काँग्रेस पक्षाने पराभवाचे खापर फोडण्यासाठी आंबेडकर-ओवेसींचे डोके निवडलेले दिसते. संपूर्ण महाराष्ट्रात वंचितवाल्यांना 41 लाख मते पडली. संभाजीनगरात वंचितचा उमेदवार कसाबसा जिंकला. ते काही त्यांचे यश नाही. तेथे एक सूर्याजी पिसाळ निपजला व त्याने

हिंदुत्वाशी गद्दारी

केली म्हणून संभाजीनगरवर पापी औरंग्याचे हिरवे फडके फडकले. तरीही प्रकाश आंबेडकर म्हणतात, वंचितला मुसलमानांची मते पडलीच नाहीत, ती काँगेसला मिळाली. त्यामुळे वंचितमध्ये यापुढे मुसलमान राहातील काय हा प्रश्न आहे. मुसलमान समाज ही काही आता ‘एमआयएम’ किंवा समाजवादी पार्टीची मक्तेदारी राहिलेली नाही. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला 61 जागी विजय मिळाला. त्यात मुसलमान मतदारांचा वाटा आहे. महाराष्ट्रातही शिवसेना उमेदवारांना मुसलमानांची भरघोस मते पडली आहेत. उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांत मुसलमान ‘यादव’ नेत्यांच्या मागे गेला नाही व त्यांनी राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही प्रकाश आंबेडकर यांच्या हेकेखोर स्वभावास कंटाळून वंचितला तडे जात असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे ‘वंचित’ हेसुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे गळके भांडे झाले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांतील मतांची आकडेवारी विरोधी पक्षांना तिरडीवरून स्मशानघाटात नेणारी आहे. विरोधकांत धड एकमत नाही. विश्वासाचे वातावरण नाही. त्यांना कोणी नेता नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतः परंपरागत अमेठी मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. महाराष्ट्रातून प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून पराभूत झाले. गांधी व चव्हाण यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला, पण त्या पदांवर नव्या नेमणुका करण्यासाठी नगास नग मिळू नये, यातच त्यांच्या पक्षाचे दारिद्रय़ दिसून येते. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही वेगळे चित्र नाही. राज्याच्या जनतेने त्यांनाही

पुन्हा चार जागांवरच

रोखले आहे. पक्ष वाचविण्यासाठी शरद पवार आजही वणवण फिरतात. कारण बाकीच्यांना जनमानसात स्थान उरलेले नाही. या परिस्थितीत काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन वंचित आघाडीशी ‘निकाह’ लावला काय किंवा राष्ट्रवादीने काँग्रेसला टांग मारून ‘मनसे’वाल्यांना मंचकावर बसवले काय, त्यामुळे असा काय फरक पडणार आहे? स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर अशा दोन मतदारसंघांत पराभूत झाले. खरे तर आंबेडकरांना अकोल्यात लढत असताना पुन्हा सोलापुरात येऊन सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान देण्याची गरज नव्हती व तिकडे संभाजीनगरातही उत्पात आणि उन्माद ‘माजवायची’ आवश्यकता नव्हती. यातून एक दिसते, ते म्हणजे विरोधकांना शिवसेना-भाजप युतीशी सामना करायचा नाही. त्यांना आपापसात लढायचे आहे. कौरवांतच युद्ध माजले आहे. विरोधकांच्या घराघरांत माजलेले हे अराजक पाहता देशातील लोकशाहीची चिंता वाटणे साहजिकच आहे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकशाहीचा ते गळा घोटतील, असे सांगणारे विरोधकच एकमेकांचे गळे घोटताना दिसत आहेत. त्याचे प्रदर्शन उत्तर प्रदेश व आता महाराष्ट्रात घडत आहे. वंचित समाजातील जनतेला प्रकाशकिरणे दाखविण्यासाठी ज्यांनी आघाडय़ा उभ्या केल्या ते विरोधकच वंचित व शोषितांच्या रांगेत कटोरे घेऊन उभे आहेत. एका हातात कटोरा, दुसऱ्या हातात खंजीर. खंजीर पाठीत खुपसण्याची स्पर्धा विरोधकांत सुरू असताना जनतेने त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची?

आपली प्रतिक्रिया द्या