आजचा अग्रलेख : हे संकट भयंकर आहे; मान्सूनची नांदी; तरी पाणी‘बंदी’

83

गेल्या वर्षी पाऊस कमी झाला तरी राज्याची शेती उत्पादकता वाढली असे आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे खरे असले तरी पाऊस कमी तर पाणीसाठा कमी आणि पाणीटंचाई तीव्र हे समीकरणदेखील आपल्याकडे आहेच. शेवटी पाऊस आवश्यक प्रमाणात झाला तरच राज्यातील जलाशयाचे साठे पुरेसे होतील. तेव्हा तळ गाठलेले, कोरडेठाक पडलेले जलाशय भरण्यासाठी या वर्षी मान्सूनची कृपा‘वृष्टी’ होणे आवश्यक आहे. आताच मान्सूनने ‘नांदी’ दिली असली तरी सर्वच धरणांमधील पाणीसाठा शून्याच्या जवळपास पोहोचल्याने पाणी‘बंदी’ करण्याची वेळ आली आहे. हे संकट भयंकर आहे.

मान्सूनने केरळच्या उंबरठ्यावर आल्याची नांदी दिली असली तरी यंदा त्याचे आगमन जवळपास एक आठवडा उशिरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आधीच बिकट असलेली पाण्याची स्थिती आणखी गंभीर झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण जलाशयांमध्ये जेमतेम 7.37 टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा आता उरला आहे. राज्यात एकूण 141 मोठे, 258 मध्यम, दोन हजार 868 लघुप्रकल्प आहेत. म्हणजे ही एकंदर संख्या तीन हजार 267 एवढी होते. या सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्याने आताच साडेसात टक्क्यांच्या खाली तळ गाठला आहे. गेल्या वर्षीचा विचार केला तर यावेळी हा पाणीसाठा सुमारे दहा टक्क्यांनी कमी आहे. मुंबईसारख्या पाऊस आणि पाणीसाठा याबाबत सुदैवी असलेल्या महानगरासाठीही यंदा धोक्याची घंटा वाजली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम 10 टक्के पाणी शिल्लक आहे. एकूण सात धरणांमधून मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या त्यात दहा टक्के कपात करण्यात आली आहे. तरीही गेल्या वर्षी पाऊसच अपुरा झाल्याने या तलावांमधील पाणीसाठा ‘चिंताजनक’ एवढ्या खालच्या स्तरावर आला आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्राची पाण्याची स्थिती मात्र दयनीय आहे. त्यातही मराठवाड्यावर कोसळलेले पाणीसंकट भयंकर आहे. या विभागातील

पाणीसाठा अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी

आहे. मागील पाच-दहा दशकांत राज्याच्या सिंचन क्षमतेकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्षच झाले. जलसिंचन होण्याऐवजी भ्रष्टाचाराचेच ‘सिंचन’ झाले. त्यामुळे अनेक प्रकल्प अर्धवट राहिले. जे थोडे पूर्ण झाले त्यातील पाणी वितरणाची व्यवस्थाच झाली नाही. पुन्हा या प्रकल्पांतील गाळ उपसण्याचाही विचार झाला नाही. दरवर्षी पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असल्याने राज्यातील बऱ्याच भागांत भूजलाचा अनिर्बंध उपसा झाला. साहजिकच भूगर्भातील जलस्तरदेखील 300-400 फुटांवर पोहोचला आहे. त्या पाण्यावरही ‘हक्क’ सांगण्याचा प्रयत्न होतोच आहे. म्हणजे जमिनीवरील आणि जमिनीखालील अशा दोन्ही ठिकाणच्या पाणीपातळीने महाराष्ट्रात तळ गाठला आहे. त्यात गेल्या वर्षी पावसाने चकवा दिला. राज्यात सरासरीच्या 73 टक्केच पाऊस झाला. मराठवाड्यात तर हे प्रमाण 50 टक्केदेखील नव्हते. इतर भागांतही पावसाने दगाच दिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वच भागांमध्ये गंभीर दुष्काळाचे संकट उद्भवले. कडाक्याच्या उन्हाचाही परिणाम धरणे, तलाव, विहिरी यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होण्यात झाला. पुन्हा यंदा मान्सूनने आगमनापासूनच लहरीपणा दाखवायला सुरुवात केली आहे. मान्सूनने आपले आगमन लांबवले आहे. सर्वसाधारणपणे

दरवर्षी यावेळी

मान्सून देशाच्या दक्षिण भागात पसरतो, महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येण्याचे संकेत देतो. यंदा मात्र मान्सूनने अद्याप केरळमध्ये प्रवेशही केलेला नाही. महाराष्ट्रासह देशासाठी हा भविष्यातील भयंकर पाणीसंकटाचा इशारा आहे. हा इशारा लक्षात घेऊन राज्य सरकारला यंदा शेतीधोरण आखावे लागेल. बळीराजालाही खरीपाचे नियोजन करताना मान्सूनचा अंदाज ध्यानात घ्यावा लागेल. गेल्या वर्षी पाऊस कमी झाला तरी राज्याची शेती उत्पादकता वाढली असे आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. पावसावर अवलंबून राहण्याचे प्रमाण यावेळी कमी झाले असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे खरे असले तरी पाऊस कमी तर पाणीसाठा कमी आणि पाणीटंचाई तीव्र हे समीकरणदेखील आपल्याकडे आहेच. शेवटी पाऊस आवश्यक प्रमाणात झाला तरच  राज्यातील जलाशयाचे साठे पुरेसे होतील. कृत्रिम पावसाचा प्रयोग या वर्षी करण्याचे सरकारने ठरवले असले तरी त्याचे यश मान्सूनपेक्षाही जास्त बेभरवशाचे आहे. पुन्हा हा पाऊस धो धो पडेल आणि धरणे ओसंडून वाहतील असेही नाही. तेव्हा तळ गाठलेले, कोरडेठाक पडलेले राज्यातील जलाशय भरण्यासाठी या वर्षी मान्सूनची कृपा‘वृष्टी’ होणे आवश्यक आहे. आताच मान्सूनने ‘नांदी’ दिली असली तरी राज्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा शून्याच्या जवळपास पोहोचल्याने पाणी‘बंदी’ करण्याची वेळ आली आहे. हे संकट भयंकर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या