आजचा अग्रलेख : लहर आणि कहर

2

हवामान खात्याच्या अंदाजांचा पाऊस दरवर्षी शेतकऱ्यांना हुलकावणी का देतो? सरकार आणि हवामान खात्याकडे याचे काय उत्तर आहे? आणेवारी आणि दुष्काळ जाहीर करणे, त्यानुसार उपाय योजने या तात्पुरत्या मलमपट्टय़ा आता पुरे. हे नेहमी वरातीमागून धावणारे पावसाच्या अंदाजाचे घोडे वरातीपुढे नाही, पण निदान वरातीबरोबर तरी धावणार आहे की नाही? सरकार, हवामान खाते आणि मान्सून यांच्या लहरीचा फटका सहन करायचा? मान्सूनची लहर आणि हवामान खात्याचा कहर या कोंडीत अडकलेली सामान्य शेतकऱ्याची मान कधी मोकळी होणार आहे?

महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट गडद होत चालले आहे. पाणीप्रश्न तर भीषण होणारच आहे, पण हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीकही अनेक ठिकाणी धोक्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आताच उभ्या पिकावर नांगर फिरवल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही म्हणे दुष्काळासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. फक्त चिंता वगैरे व्यक्त करून काय उपयोग? निसर्गावर किंवा मान्सूनवर आपले नियंत्रण नाही, मान्सून लहरी आहे हे मान्य केले तरी सरकार, प्रशासन ‘लहरी’ राहून कसे चालेल? हवामान खात्याचे अंदाजही ‘लहरी’च राहणार असतील तर कसे व्हायचे? दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळून सहा-सात दशके उलटली तरी या परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे आजही बहुतांश शेती पावसावर तर शेतकरी हवामान खात्याच्या ‘अंदाजपंचे’ भरवशावर अवलंबून आहे. पावसाळय़ाच्या सुरुवातीला मान्सूनचे अंदाज जाहीर होतात त्यानुसार बळीराजा खरीप हंगामाचे नियोजन करतो. कोणते पीक घ्यायचे ते ठरवतो. पुन्हा त्यासाठी लागणारे कर्ज हे त्याच्या पाचवीलाच पुजले आहे. सरकारी, सहकारी बँकांकडून काही कारणाने कर्ज शक्य नसेल तर खासगी सावकारांकडून

अवाचेसवा दराने उचल

घेऊन पेरणी करतो. बी-बियाण्यांपासून खतापर्यंत कर्जबाजारी होण्याशिवाय त्याला गत्यंतर नसते. तरीही दरवर्षी नव्या उमेदीने आणि यंदा तरी ‘काळी माय’ त्याच्या लेकराला उदंड पिकाचा आशीर्वाद देईल या आशेने तो पेरणी करतो. मात्र हवामान खात्याच्या अंदाजाची ‘माशी’ न चुकता शिंकतेच आणि त्याची सगळी मेहनत, आशाआकांक्षा, उत्पन्न यावरच नांगर फिरण्याची वेळ येते. पाऊस कधी नको तेव्हा ‘जोर’ लावतो तर कधी हवा तेव्हा ‘रजेवर’ जातो. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. हवामान खात्याचा अंदाज, त्याला मान्सून देत असलेला गुंगारा आणि त्यात होणारी सामान्य शेतकऱ्याची परवड हे दुष्टचक्र वर्षानुवर्षे सुरू आहे. राज्यकर्ते बदलले तरी हे दुष्टचक्र थांबलेले नाही. या वर्षी मान्सूनबाबत हवामान खात्याने केलेले अंदाज पाच-दहा टक्क्यांनी चुकले आहेत. राज्यात यंदा सरासरीच्या 75.8 टक्केच पाऊस झाला. त्याचा फटका शेवटी बळीराजालाच बसला आणि तो सहन करण्याशिवाय त्याला पर्यायही नाही. हवामान खात्याचे ‘अंदाजपंचे’ हा आपल्याकडे खिल्ली उडवण्याचा विषय असला तरी सामान्य शेतकऱ्यासाठी तो गंभीर चिंतेचा आणि जीवनमरणाचा विषय बनला आहे.

पावसाचा अंदाज

तंतोतंत बरोबर येईल अशी कुणाचीही अपेक्षा नाही, पण अंदाज आणि वस्तुस्थिती यात जर दोन ध्रुवांसारखे अंतर पडणार असेल तर कसे व्हायचे? मग एका हतबलतेने संतप्त झालेल्या बळीराजाने हवामान खात्यावर ‘आसुड’ ओढला तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल? तुमचे ते ‘अलनिनो’, ‘ग्लोबल वॉर्मिंग’, तापमान वाढ वगैरे ठीक आहे, पण त्याचा तडाखा सामान्य शेतकऱ्याला कमीत कमी बसावा यासाठीच तर हवामान खात्यापासून इतर सरकारी खात्यांपर्यंत सगळय़ा यंत्रणा आहेत ना? एरवी सरकार त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आणि स्वकौतुकाचे ढोल सतत पिटत असते, पण तरीही हवामान खात्याच्या अंदाजांचा पाऊस दरवर्षी शेतकऱ्यांना हुलकावणी का देतो? सरकार आणि हवामान खात्याकडे याचे काय उत्तर आहे? आणेवारी आणि दुष्काळ जाहीर करणे, त्यानुसार उपाय योजने या तात्पुरत्या मलमपट्टय़ा आता पुरे. हे नेहमी वरातीमागून धावणारे पावसाच्या अंदाजाचे घोडे वरातीपुढे नाही, पण निदान वरातीबरोबर तरी धावणार आहे की नाही? सरकार, हवामान खाते आणि मान्सून यांच्या लहरीचा फटका सहन करायचा? मान्सूनची लहर आणि हवामान खात्याचा कहर या कोंडीत अडकलेली सामान्य शेतकऱ्याची मान कधी मोकळी होणार आहे?