‘सामना’चा दणका : किल्ले सिंधुदुर्गसह धोकादायक कोळंब पुलाचे ‘ड्रोन चित्रीकरण’

फोटो - कोळंब पुलाचे ड्रोन कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यात आले. (अमित खोत)

सामना प्रतिनिधी, मालवण

मंगळवारी दै. ‘सामना’ आणि ‘ऑनलाईन’च्या आवृत्तीमध्ये ‘मालवण शहराचे दोन्ही प्रवेशद्वार ‘धोकादायक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द होताच आज खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. वर्षभर दुरुस्ती रखडलेल्या धोकादायक कोळंब पुलाचे चित्रीकरण बुधवारी ड्रोन कॅमेरा द्वारे करण्यात आले. सकाळच्या सत्रात हे चित्रीकरण पुलााच्या दोन्ही बाजूने करण्यात आले. याच वेळी किल्ले सिंधुदुर्गचेही ड्रोन चित्रीकरण करण्यात आले.

दरम्यान राज्याचे महसुल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने करण्यात आलेला ड्रोन चित्रीकरण अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. अशी माहिती उप विभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली.

कोळंब पुल वर्षभरापुर्वी वाहतुकीस धोकादायक असल्याचा अहवाल आल्यानंतर अवजड वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यानंतर वर्षभर दुरुस्ती रखडलेल्या या पुलावरुन केवळ छोटी वाहने धोका पत्करुन ये जा करत आहेत. पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र पुलाच्या दुरुस्तीचे घोंगडे भिजतच पडले आहे.

पुलाच्या दुरुस्तीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असुन दुरुस्तीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. सोमवारी थेट बांधकाम मंत्र्यांच्या आदेशाने पुलाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. आता बांधकाम मंत्री पुलाच्या दुरुस्तीला गती मिळवुन देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

किल्ले सिंधुदुर्गाचेही ड्रोन चित्रीकरण
किल्ले सिंधुदुर्गला ३५० वर्ष पुर्ण झाली. त्या निमित्ताने किल्याच्या विकासाचा कोट्यवधींचा आराखडा बनवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने किल्ले सिंधुदुर्गचेही ड्रोन चित्रीकरण करण्यात आले.

अनेक ठिकाणी चित्रीकरण
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिंधुदुर्गातील अनेक सार्वजनिक उपक्रमांचे (बांधकामे) चित्रीकरण बुधवारी करण्यात आले. यात किनारपट्टी तालुक्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ला व अन्य ठिकाणची झालेली कामे व प्रस्तावित कामे यांचा समावेश आहे. राज्यातही असे चित्रकरण विविध भागात सुरु असल्याची माहिती मालवण बांधकाम विभागाकडून देण्यात आली.