विशेष अग्रलेख : जीवनप्रवाह थांबला!

मृत्यू जीवनाचा धर्म आहे. जन्माला येणारा कधी तरी जाणारच, पण अटलबिहारी वाजपेयींशिवाय देशाचा जीवनप्रवाहच जणू थांबला आहे. ईश्वर वाजपेयी यांच्या आत्म्यास सद्गती देईलच! कारण त्यांचे पुण्य मोठे होते. त्या पुण्यानेच भारतीय जनता पक्षाला तारले. हे जे विसरतील ते कृतघ्नच होत.

हिंदुस्थानी जनतेच्या हृदयसिंहासनावर ज्यांनी अधिराज्य गाजवले ते ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी गेले. अटलजी आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. पण एका वज्राघाताप्रमाणे ती भयानक वार्ता आमच्या कानावर आदळली आणि आमचा मेंदू काही काळ बधिर झाला. मध्यान्हीचा सूर्य अचानक मावळला व अंधःकार पसरला असेच वाटले. काही वर्षांपासून अटलजी आजारी होते. काही दिवसांपासून ते अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीच्या चढउताराच्या बातम्या येत होत्या. अटलजी उपचारास प्रतिसाद देत असल्याचे खुलासे डॉक्टर मंडळी करीत होती. पण अखेर अटलजी ग्लानीत असताना हलक्या पावलाने मृत्यू त्यांच्यापर्यंत पोहोचला व त्याने अटलजींना आपल्यापासून कायमचे दूर नेले. अटलबिहारी वाजपेयींचा जीवनान्त हा केवळ एका व्यक्तीचा नाही. तो हिंदुस्थानच्या इतिहासामधील एक सबंध युगाचा अंत होय. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात लोकमान्य टिळक यांच्या युगानंतर गांधीयुग आणि पुढे नेहरूयुग आले. नेहरूयुगातच वाजपेयीयुगाचा प्रारंभ झाला. तो आजपर्यंत टिकला. गांधी, नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस या काँग्रेस पुढाऱयांनंतर विरोधी पक्षात असूनही तितकीच तुफान लोकप्रियता या देशात कुणाला लाभली असेल तर ती फक्त अटलबिहारी वाजपेयींनाच. वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते. 13 दिवस, 13 महिने, पुढे 5 वर्षे असा त्यांचा कालखंड होता. पण त्याआधी व नंतरही विरोधी पक्षाच्या बाकावर बसून त्यांनी पंडित नेहरूंपासून ते सोनिया गांधींपर्यंत सर्वांना कोणत्याही सत्तापदांशिवाय नमवले. अमोघ वाणी, तुफानी वक्तृत्व, त्यावर प्रतिभेचे तेज. लाखांच्या सभेत आणि संसदेच्या सभागृहात त्यांचे अस्तित्व हे चैतन्याचा खळखळणारा प्रवाहच होता. तो खळखळणारा प्रवाह आज थांबला आहे. त्या थांबलेल्या प्रवाहावर अटलजींच्या प्रसन्न, निरागस चेहऱयाचे प्रतिबिंबच जणू पडले आहे व अटलजींच्या कवितांचे सूर त्या प्रवाहात उमटले आहेत.

सपनों से मीत

बिखरा संगीत

ठिठक रहे पांव

और झिझक रही झाँझ

जीवन की ढलने लगी साँझ

अखेर ‘साँझ’ ढळली आहे. श्रेष्ठ दर्जाचा कलावंत आणि सामर्थ्यवान नेता आपल्यातून निघून गेला आहे.

अमोघ वक्ता!

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म

ग्वाल्हेरचा. ग्वाल्हेर हे तेव्हा मराठा संस्थान. त्यामुळे मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रभावाखालीच त्यांचे बालपण गेले व बालमनावर रुजलेले मराठी प्रेम त्यांनी शेवटपर्यंत टिकवले. स्वातंत्र्यलढय़ात ते सहभागी झाले. 1951 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनसंघाचे ते संस्थापक सदस्य होते. पक्षात व संसदीय लोकशाहीत त्यांनी अनेक सर्वोच्च पदे भूषविली. पण काँग्रेसविरोधी लोकप्रिय मवाळ चेहरा हीच त्यांची ओळख इतिहासाच्या पानांवर राहील. 1957 मध्ये भारतीय जनसंघाचे चार सदस्य निवडून आले होते. त्यात अटलबिहारी वाजपेयी होते. अटलजींनी वयाच्या अवघ्या तेहतीसाव्या वर्षी लोकसभेत पदार्पण केले. त्या वेळी सत्ताधारी पक्षात आणि विरोधी पक्षात अनेक नामांकित संसदपटू होते. आपल्या पहिल्याच भाषणाने तरुण खासदार अटलजींनी पं. नेहरूंपासून साऱयांचे लक्ष वेधून घेतले. A great parliamentarian is coming अशी ललकारीच जणू त्या भाषणाने दिली. परराष्ट्र धोरणावरील अटलजींचे ते पहिले भाषण होते. त्यांच्या पहिल्याच भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान पंडित नेहरूंनी अटलजींचे नाव घेऊन बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘काल जी भाषणे झाली त्यात एक भाषण वाजपेयी यांचे होते. त्यांनी आपल्या भाषणात एक गोष्ट मला वाटतं अशी सांगितली होती की, आपले जे परराष्ट्र धोरण आहे ते योग्य आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण त्यांनी एक असेही सांगितले की, ‘बोलण्यासाठी वाणी हवी, पण गप्प राहण्यासाठी वाणी आणि विवेक दोन्ही गोष्टी हव्यात. मी त्याबाबतीत त्यांच्याशी पूर्ण सहमत आहे.’ वाणी आणि विवेक याबाबत जागरूक राहून वाजपेयींनी राजकारणात अनके शिखरे पादाक्रांत केली.

नवा अध्याय!

1971 च्या हिंदुस्थान-पाक युद्धात ज्या अटलजींनी इंदिराजींना ‘दुर्गे’ची उपमा दिली

त्याच इंदिराजींनी 1975 साली देशावर आणीबाणी लादली व वाजपेयींसह सर्वच विरोधी नेत्यांना 19 महिने तुरुंगात टाकले. तुरुंगातील गोकुळातच ‘जनता पक्ष’ जन्माला आला. त्या जनता पक्षात जनसंघ विलीन झाला व सत्तेत आला. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळाचे एक कडबोळे झाले. त्यात अटलबिहारी वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री होते. जगभरात ते फिरले. देशात कमी व परदेशात जास्त अशी टीका त्यांच्यावर तेव्हा झाली. पण परराष्ट्र धोरणाचा त्यांचा व्यासंग दांडगा. तो व्यासंग परराष्ट्रमंत्रीपदाच्या काळात अनुभवात बदलला व त्यांनी हिंदुस्थानचे नाते जगाशी निर्माण केले. जनता पक्षाचा प्रयोग मोरारजी, मधु लिमये व इतर घटक पक्षांच्या आडमुठेपणामुळे फसला व काँग्रेसविरोधी राजकरणाचा बोजवारा उडाला. जनसंघवाल्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना करून नवा अध्याय सुरू केला. 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत वाजपेयींसह भाजप जमीनदोस्त झाला! अवघे दोन सदस्य निवडून आले. तेव्हा ‘भाजपचे कुटुंब नियोजन झाले’ अशी टर देशभरात उडवली गेली. त्याही परिस्थितीत हार न मानता त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. देशभरात दौरे केले. त्याच वाजपेयींनी पुढे तीन वेळा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून ते राष्ट्रीय क्षितिजावर सूर्याच्या तेजाने तळपले. वाजपेयी होते म्हणून भिन्न डोक्यांची, भिन्न विचारांची माणसे एकत्र आली व राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाची खिचडी शिजली. या आघाडीच्या यशाचे श्रेय फक्त वाजपेयींनाच जाते. पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी देशाला गती दिली. जनतेला विश्वास दिला. हिंदुस्थानसारख्या शेतीप्रधान देशात शेतकऱयांना दिलासा देणारे, शेतकऱयांची उत्पादन क्षमता वाढविणारे कार्यक्रम त्यांनी राबविले. एकूण भूभागापैकी 75 टक्के शेतजमीन असणाऱया हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशात त्यांनी शेतकऱयांसाठी ‘किसान क्रेडिट कार्ड’ ही योजना राबविली. वाजपेयी पंतप्रधान असतानाच शेतकऱयांचे सर्वाधिक भले झाले. 1998 मध्ये वाजपेयींनी कृषी खात्यासाठी 6,500 कोटी रुपये व ग्रामीण विकास मंडळासाठी 6000 कोटी रुपये मंजूर केले होते. शेती व शेतकऱयांसाठी दिलासा देणाऱया योजना त्यांनीच निर्माण केल्या व अमलात आणल्या. आज शेतकऱयांची ज्याप्रकारे दैना उडालेली दिसते, आत्महत्यांची लाट उसळलेली दिसते ते पाहता वाजपेयींचे शेतीविषयक धोरण प्रकर्षाने आठवते. ‘सुवर्ण चतुष्कोण महामार्ग प्रकल्प’ व ‘पंतप्रधान सडक योजना’ त्यांनी धडाक्यात राबविल्या. ‘स्वजलधारा’ योजनेमार्फत शेतीला पाणीपुरवठा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वीज, पक्के रस्ते बांधून दिले. दूरसंचार क्षेत्राच्या विकासावर भर दिला. पैसे कमवू नका, तर पैसे वाचवा हा विचार त्यांनी दिला. विकास आणि देशाची संस्कृती याची सांगड त्यांनी घातली. शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा त्यांच्या कारकीर्दीतच संसदेच्या प्रांगणात उभारला गेला. सावरकरांच्या तैलचित्रास त्यांच्याच काळात मंजुरी लाभली. पण सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावण्याचा दिवस आला तेव्हा वाजपेयी पंतप्रधान नव्हते व काँग्रेसने त्या सोहळय़ावरच बहिष्कार टाकला. वाजपेयी म्हणजे प्रखर राष्ट्रनिष्ठा, ज्वलंत हिंदुत्व, कविमनाचा हळुवार नेता, पण देशावर संकट येताच तेवढाच पोलादी होणारा नेता.

‘‘हार नही मानुंगा,

रार नही ठानूंगा,

काल के कपाल पर,

लिखता मिटाता हूं,

गीत नया गाता हूं।

गीत नया गाता हूं।।’’

असे वाजपेयींनी त्यांच्या कवितेत म्हटले ते त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंबच होते.

संयमही तुटला

पाकिस्तानशी सुसंवाद साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न वाजपेयींनी केला. इतिहास बदलू     शकतो, पण आपण भूगोल कसा बदलणार? शेजारी कसा बदलणार? हा विचार त्यांनी दिला. शेजाऱयाशी संबंध सुधारावेत हा त्यांचा विचार चांगला होता. पण शेजारी जर पाकिस्तानसारखा असेल तर तो वाजपेयींसारख्या सज्जन माणसालाही दगा आणि दगाच देणार. लाहोर बस घेऊन वाजपेयी पाकिस्तानात गेले तेव्हा मुशर्रफ यांनी दुश्मन देशाचे पंतप्रधान म्हणून वाजपेयींना ‘सॅल्युट’ मारण्यास नकार दिला. त्याच मुशर्रफ यांनी पुढे ‘कारगील’ घडवून हिंदुस्थानशी युद्ध पुकारले. त्याच मुशर्रफ यांच्यासाठी वाजपेयींनी आग्रा येथे पायघडय़ा घालूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहिले. कश्मीर प्रश्न आपल्या हयातीत सुटावा व इतिहास घडावा ही वाजपेयींची इच्छा शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. ती इच्छा हृदयात ठेवूनच वाजपेयींनी आता जगाचा निरोप घेतला. अटलबिहारी पंतप्रधान असतानाच संसदेवर हल्ला झाला. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांनी शर्थ केली. पण संयमाचा बांध तुटला तेव्हा त्यांनी मन मोकळे केले व ठणकावून सांगितले की, ‘जगात जिथे जिथे मुस्लिम आहेत, तेथे तेथे दहशतवाद वाढीस लागला असून हा समाज इतरांशी मिळून मिसळून राहायला तयार नाही. दहशतवाद, भीती व धमक्यांच्या आधारे आपला मतप्रवाह गळी उतरविण्याचा त्यांचा उद्देश असून संपूर्ण जग त्यांच्या कारस्थानाविरुद्ध जागरूक झाले आहे,’ असा आरोप वाजपेयींनी पणजीतील एका सभेत केला तेव्हा देशात खळबळ उडाली. पण वाजपेयी मागे हटले नाहीत. आजकाल मुस्लिम समाजात सहिष्णुतेला स्थान राहिले नसून हा धर्म जिहादच्या घोषणेवर चालतो, असे ते म्हणाले व ते बरोबर होते. वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘स्वयंसेवक’ होते. दुधात साखर मिसळावी तसे ते संघ विचारात मिसळले. पण स्वतःचे वेगळे अस्तित्व त्यांनी कायम ठेवले. यांच्या स्वयंसेवक असण्यावर टीका झाली तेव्हा अमेरिकेत विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावर त्यांनी साऱया जगाला ठणकावून सांगितले, ‘होय, मी स्वयंसेवक आहे. पंतप्रधानपदावर मी आज आहे, उद्या नसेन. पण स्वयंसेवक असण्याचा माझा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.’ पंतप्रधानपदी ते बसले, पण भाजपचे पूर्ण बहुमत नव्हते. शिवसेना, अकाली दलासारखे पक्ष सोडले तर हिंदुत्ववादी विचारांसाठी पाठराखण करणारे कोणी नव्हते. त्यामुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कसरत सांभाळण्यासाठी वाजपेयींना राममंदिरापासून, समान नागरी कायद्यापर्यंतचे सर्व विषय गुंडाळून ठेवावे लागले. ‘अब हिंदू मार नहीं खाएगा।’ असे भिवंडीच्या दंगलीनंतर ठणकावून सांगणाऱया वाजपेयींच्या मनातला हिंदुत्ववाद कधी लपून राहिला नाही. वाजपेयींचा विचार व कृती ही राष्ट्रहिताची राहिली. ते संयमी होते, पण डरपोक नव्हते. अमोघ वक्तृत्व हे त्यांचे हत्यार होते. जीवनमूल्यांची जपणूक हे त्यांचे अधिष्ठान होते. वारा येईल तशी पाठ फिरवून त्यांनी सत्तेचे राजकारण केले नाही. म्हणूनच देशाच्या राजकारणात अटलबिहारी वाजपेयी असण्याचे महत्त्व होते. आज ते नाहीत. त्यांच्या नसण्याने निर्माण होणारी पोकळीही भविष्यात जाणवेल. मृत्यू जीवनाचा धर्म आहे. जन्माला येणारा कधी तरी जाणारच, पण अटलबिहारी वाजपेयींशिवाय देशाचा जीवनप्रवाहच जणू थांबला आहे. ईश्वर वाजपेयी यांच्या आत्म्यास सद्गती देईलच! कारण त्यांचे पुण्य मोठे होते. त्या पुण्यानेच भारतीय जनता पक्षाला तारले. हे जे विसरतील ते कृतघ्नच होत.