सचिन-अभिनयची स्वारी स्वित्झर्लंडला रवाना

सामना ऑनलाईन । मुंबई

साठाव्या वाढदिवशी आपल्या चाहत्यांना नवा सिनेमा भेट देण्याचे आश्वासन देणाऱ्या सचिन पिळगावकर यांच्या ‘अशी ही आशिकी’चे शूटिंग शेवटच्या टप्प्यात आहे. चित्रपटाची दोन गाणी आणि काही भाग शूट करण्यासाठी या सिनेमातील मंडळी थेट स्वित्झर्लंडला रवाना झाली आहेत. स्वित्झर्लंडच्या नयनरम्य वातावरणात मराठी सिनेमाचे शूटिंग करणारे सचिन पिळगावकर हे पहिले दिग्दर्शक आहेत. ‘अशी ही आशिकी’ चित्रपटात युवा अभिनेता अभिनय बेर्डे आपल्या आशिकीचे रंग प्रेक्षकांसमोर सादर करेल. सचिन यांनी सोशल मीडियावर अभिनयसोबतचा सेल्फी शेअर करत ‘अशी ही आशिकी’च्या शूटिंगदरम्यान अभिनयचा एकंदर वावर लक्ष्याबरोबर घालवलेले ते ‘अशी ही बनवाबनवी’चे दिवस ताजे करून गेल्याचे म्हटले आहे. हा चित्रपट १४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गायक, निर्माता अशा विविध भूमिकांमध्ये दिसलेले सचिन पिळगावकर आता आपल्याला संगीत दिग्दर्शकाच्या ही भूमिकेत दिसणार आहेत. ते तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येत आहेत, तर या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनाबरोबरच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजींचेच आहेत.