हे असलं ‘दलिंदर’ गाणं का केलंत?, पिळगावकरांना नेटिजन्सनी ‘पिळून’ काढलं

सामना ऑनलाईन, मुंबई

मराठी इंडस्ट्रीत महागुरू म्हणून मिरवणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांना ‘आमची मुंबई-द मुंबई अँथम’ या नव्या म्युझिक व्हिडीओवरून चांगलाच धडा मिळाला आहे.  व्हिडीओत ‘माझी मुंबई, चांगली मुंबई, सब की मुंबई’ असं म्हणत थिरकणाऱ्या तसेच तोकडय़ा कपडय़ातील महिलेसोबत ‘नशा हैं रातों का, शबाब है रातों का’ म्हणणाऱ्या सचिनला नेटिजन्सनी चांगलेच ‘पिळून’ काढले आहे. असलं दलिंदर गाणं का केलंत, असा सवाल करीत  महागुरूंनी आतापर्यंत कमावलेली सगळी इज्जत घालवली, अशा थेट शब्दांत नेटिजन्सनी सचिनला चांगलेच  सुनावले आहे.

मुंबईच्या जीवनशैलीवरील ‘मुंबई अँथम’ हे सचिन यांनी गायलेले आणि त्यांच्यावरच चित्रित झाले गाणे नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. हे गाणे बघून सचिन यांच्यावर नेटिजन्स भडकले आहेत. गाण्याची शब्दरचना, त्याचे संगीत आणि विनोदी पद्धतीने करण्यात आलेले चित्रण यामुळे यू-टय़ूबवरील व्हिडीओ चांगलाच ट्रोल झाला. त्यानंतर स्वत: महागुरूंनी हा वादग्रस्त व्हिडीओ काढून टाकला. तसेच फेसबुकवर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण देण्याची वेळ त्यांच्यावर आली. व्हिडीओ काढून टाकल्यानंतरही नेटिजन्सनी त्यांना मोठय़ा प्रमाणात ट्रोल केले.

मुंबईतील ‘रातें का नशाच’ दिसतो का?

‘नशा हैं रातों का, शबाब है रातों का, जलवा हे रातों का’ असे म्हणत सचिन अश्लील हावभाव करणाऱ्या महिलेसोबत व्हिडीओमध्ये नाचताना दिसत आहेत. सचिन यांना मुंबईतील दुसरे चांगले काही दिसले नाही का, फक्त रात्रीचा नशा आणि जलवाच दिसला का, असे सवाल ट्रोल करणाऱ्यांनी केला आहे.

व्हिडीओ काढून टाकल्यावरही झाले ट्रोल

सचिन यांनी सोशल साइट्सवरून हा व्हिडीओ काढल्यानंतरही त्यांना ट्रोल करायचे नेटिजन्सनी सोडले नाही. महागुरूंचा नुकताच प्रदर्शित झालेला मुंबईवरचा व्हिडीओ यूटय़ुबवरच्या रसिकांच्या अफाट कौतुकामुळे काढून टाकण्यात आला आहे. कमेंट वाचून येडा झाला महाग्रु… अशा कमेंट्स नेटिजन्सकडून येत आहेत.

युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

  • इतकं दलिंदर गाणं यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं. आयुष्यभर कमावलेली सगळी इज्जत, अब्रू घालवली. अरे भोजपुरी गाणे पण याच्यापेक्षा भारी असतं.
  • एका नेटिजन्सने लिहिलंय, सचिन साहेब पैशांची टंचाई असेल तर सांगा. आम्ही निधी गोळा करतो. पण प्लीज परत असा अत्याचार करू नका.
  • पिळगावकरांच्या असल्या वागण्याने मराठी चित्रपटसृष्टीला  आलेला सुवर्णकाळ जाऊन परत तांब्यापितळय़ाचे दिवस येतील.
  • जेवायला बसलो होतो, भूक लागली होती खूप… हा व्हिडीओ बघून जेवण्याची आणि जगण्याची इच्छाच मेली.
  • पिळगावकरांना या वयात म्हातारचळ लागलं.
  • ले ले ले ले मुंबई का… नंतर इतका पॉज. मला तर घाम फुटला.

अशा परिस्थितीत मी पुन्हा पडू नये म्हणून देवाजवळ प्रार्थना – सचिन

गाण्यावरून मोठय़ा प्रमाणात ट्रोल झाल्यावर सचिन यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून नेटिजन्सना स्पष्टीकरण दिलं आहे. हा व्हिडीओ खूप वर्षांपूर्वी चित्रित करण्यात आला होता.  आणि पुन्हा मी अशा परिस्थितीत सापडणार नाही यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, असे त्यांनी लिहिलं आहे.  रिलीज झालेला माझा व्हिडाओ बराच चर्चेचा विषय झाला आहे. काहींना हसू आलं, काहींना मात्र रडू आलं. ज्यांना माझ्याविषयीच्या प्रेमापोटी रडू आलं त्यांना मी नक्कीच उत्तर देणं लागतो. एवढंच सांगेन की, तुम्हाला जसं वाईट वाटलं तसं मलाही वाटलं. मात्र हा व्हिडीओ आपण कोणत्याही लालसेपोटी केला नाही. आम्ही कलाकार मंडळी बऱ्याचदा फार त्रास न घेता, जाता जाता कुणा मित्राची मदत होत असेल तर काम करत असतो, असे सचिन यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.

‘माझी मुंबई, चांगली मुंबई, सब की मुंबई’ असं म्हणून त्याला मुंबईचे अँथम ठरवण्याचा अधिकार सचिन यांना कुणी दिला, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.  मुंबई कुणा ऐऱ्यागैऱ्यांची आहे का, इथे कुणीही यावे आणि राहावे, असे सचिन कसे काय म्हणू शकतात? गाण्यात त्यांना फक्त स्टार मंडळी आठवली. मुंबईसाठी रक्त सांडणारे 107 हुतात्मे आठवले नाहीत का, असे प्रश्न विचारून नेटिजन्सनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.