विक्रमवीर सचिनचा ‘डबल धमाका’ आठवतोय का?

47

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रिकेटचा देव… मास्टर ब्लास्टर… विक्रमवीर… भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम नावावर केले आहेत. कसोटी, एक दिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर भल्याभल्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणाऱ्या सचिनने आजच्याच दिवशी एक दिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली होती.

वाचा – ‘वन डे’मध्ये द्विशतक ठोकणारे ५ दिग्गज

२४ फेब्रुवारी २०१० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिनने केलेली अविस्मरणीय खेळी आठवत नाही असा एकही पाठिराखा सापडणार नाही. ग्वालियरमध्ये झालेल्या या सामन्यात सचिनने नाबाद २०० धावा तडकावत एक दिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला होता. सचिनने या सामन्यात १४७ चेंडूचा सामना करताना २५ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी केली होती. या कामगिरीची आठवण करत आयसीसीने सचिनचा गौरव केला आहे.

‘आजच्याच दिवशी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने ग्लालियरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना २०० धावा ठोकल्या होत्या आणि अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला होता’, अशा शब्दात आयसीसीने सचिनचा गौरव केला आहे. सचिन तेंडुरलकरनंतर हिंदुस्थानचा विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मासह आणखी दोन फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक दिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याची कामगिरी केली. मात्र सचिनने केलेल्या विक्रमी खेळीची तोड कोणत्याही फलंदाजाला येणार नाही हे त्रिवार सत्य आहे.

ग्वालियरच्या कॅप्टन रुप सिंह मैदानावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगला होता. या सामन्यात सचिनने सलामीला येत नाबाद २०० धावा केल्या होत्या. सचिनच्या या खेळीच्या बळावर हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेसमोर ३ बाद ४०१ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर आफ्रिकेचा डाव ४३ षटकात २४८ धावांत गुंडाळत १५२ धावांनी मोठा विजय मिळवला होता.

आपली प्रतिक्रिया द्या