सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटील, राजू शेट्टी हे धंदेवाईक नेते – संजय कोले

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

शेतकरी नेते म्हणवणारे सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटील आणि राजू शेट्टी हे धंदेवाईक आणि तथाकथित नेते आहेत. त्यांच्यामुळेच येथील शेतकऱ्यांचे टनाला बाराशे ते तेराशेचे नुकसान होत आहे. या तिघांच्याही मालमत्तेची ईडी व आयकरमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य प्रचारप्रमुख व ऊसदर नियंत्रण समितीचे सदस्य संजय कोले यांनी केली.

गेली अनेक वर्षे राज्यात उसाच्या पहिल्या उचलीसाठी आंदोलने केली जातात. मात्र, मोठय़ा मागण्या करून उसाची अंतिम किंमत अत्यंत कमी करून शेतकऱयांची लुटच सुरू आहे. गुजरातमधील साखर कारखाने सहकारी तत्त्वावर चालतात. तेथील गणदेवी कारखान्याने गेल्या हंगामात प्रतिटन ४ हजार ४४१ रुपये दर दिला होता, तर जानेवारी २०१७ मध्ये ४ हजार ५४१, फेब्रुवारीमध्ये ४ हजार ६४१ आणि मार्चमध्ये ४ हजार ७४१ रुपये प्रतिटन भाव दिला आहे. शिवाय जादा उतारा असलेल्या उसाला ५० रुपये अधिक भाववाढही त्यांनी दिली होती. या कारखान्याची रिकव्हरी १२.१८ टक्के असून, ते एवढा दर देत आहेत. मग महाराष्ट्रात त्यापेक्षाही अधिक रिकव्हरी असताना एवढा कमी दर का? याला केवळ स्वत:ला शेतकरी नेते म्हणवणारे हे तिन्ही नेते जबाबदार असल्याचा आरोप संजय कोले यांनी केला.

गुजरातमधील सहकारी कारखान्यांचे चालक राजकीय व्यक्ती नसून, व्यावसायिक व जागरूक कारखानदार आहेत. महाराष्ट्रातील राजकारणी बोलघेवडे, लुटारू, भ्रष्टाचारी कारखानदारांसारखे नाहीत. पहिली उचल अव्वाच्या सव्वा मागत आणि शिवराळ भाषा वापरून आंदोलन पुकारणारे तसेच तडजोडी शेतकरी नेतेही गुजरातमध्ये नसल्याचही टीकाही कोले यांनी केली. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीमध्येही तफावत असल्याने, राजू शेट्टी यांनी याप्रश्नी ललीत बहाले यांच्याशी थेट चर्चा करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हानही कोले यांनी यावेळी दिले. यावेळी अध्यक्ष अनिल घनवट, सीमा नरोडे, अभिमन्यू शेलार, मुसा देसाई आदी उपस्थित होते.

बुधवारी सांगलीत ऊस परिषद

या नेत्यांनी ऊसदराची केलेली तडजोड मान्य नसून, गुजरातच्या ‘गणदेवी’ कारखान्याप्रमाणेच अंतिम दर मिळाला पाहिजे, यासाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी सांगली येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही कोले यांनी सांगितले.