सदानंद जोशी – व्यक्तिदर्शन

2

 

काही कलावंतांच्या जोड्या अशा असतात की, त्यातील एकाचा विषय निघाला की दुसऱ्याचा उल्लेख अपरिहार्यपणे केला जातोच. लता-मदनमोहन, शम्मी-शंकर-जयकिशन किंवा आशा-पंचमदा अशी अनेक उदाहरणे देता येतील. सदानंद जोशी म्हटले की, आचार्य अत्रे आठवतातच. ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री कार्यक्रमाने एक व्यक्तिनाट्य असे राहिले की, ‘गेल्या दहा हजार वर्षांत असे नाट्य झाले नाही अन् पुढे होणार नाही’

१६ जुलै १९२३ मध्ये जोशींचा जन्म झाला. महाविद्यालयीन (१९६२) शिक्षण पूर्ण करून ते फ्रान्सला पॅरिसमध्ये गेले. तिथे मार्शल मार्सो या नाट्यगुरूकडे नाट्याभिनय शिकले. नकलाकार म्हणून त्यांनी उत्तम कीर्ती मिळविली. लंडनमधील एम्प्लीन विल्यम या कलाकाराचा एकपात्री प्रयोग पाहून एखाद्या लोकप्रिय व्यक्तीचे नाट्य उभे करावे म्हणून अत्रेसाहेबांची निवड केली. कार्यक्रम तयार करून १७ जानेवारी १९६५ रोजी गिरगावातील साहित्य संघमंदिरात साहेबांच्या उपस्थितीत ‘मी अत्रे बोलतोय’चा पहिला प्रयोग झाला. साहेबांनी मनापासून स्तुती केली. दाद दिली. या जोश्यांनी मला जिवंतपणीच अमर केलंय…’

पुढे २७५० यापेक्षा अधिक प्रयोग झाले. विशेष म्हणजे वयाच्या ८० वर्षापर्यंत ही सेवा करून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. जोशींच्या अशा कारकीर्दीचा चरित्रात्मक इतिहास मोठा मनोरंजक आणि कलाकारांसाठी उद्बोधक आहे. जोशींचे मनोगत, अत्र्यांचे भाषण, एकपात्री कलाप्रकारांचा मागोवा ही प्रकरणे माहितीपूर्ण आहेत.

मी अत्रे बोलतोय/आठवणी
मूळ संहिता – सदानंद जोशी
संपादिका – शिबानी जोशी
प्रकाशन – व्यास क्रिएशन्स, ठाणे – २
पृष्ठ – ७२/सचित्र, मूल्य – रुपये १२०