कबरीतून सद्दाम हुसैनचे शव गायब?

सामना ऑनलाईन। अल-अवजा

फासावर लटकवण्यात आलेल्या हुकूमशहा सद्दाम हुसैनचे शव कबरीतून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर सद्दामला त्याच्या गावी अल अवजा येथे दफन करण्यात आले होते. पण आता या कबरीत त्याचे शवच नसल्याचे समोर आले आहे.

इराकवर २० वर्ष सत्ता गाजवणाऱ्या सद्दामला ३० डिसेंबर २००६ साली फासावर लटकवण्यात आले होते. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी सद्दामचा मृतदेह हेलिकॉप्टरने बगदादला रवाना केला होता. तेथील अल-अवजा या सद्दामच्या गावात तो दफन करण्यात आला होता. पण आता ही कबर उद्ध्वस्त झाली असून त्यात सद्दामचे शव नसल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

६९ वर्षीय सद्दामला रात्री फाशी दिल्यानंतर पहाटेच्या आतच दफन करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणाला तीर्थस्थळाचे स्वरुप आले होते. दरवर्षी २८ एप्रिलला सद्दामच्या जन्मदिनी येथे त्याचे समर्थक गर्दी करतात. पण आता कबरीत त्याचे शवच नसल्याने कबर खोदून ते कोणी नेले असावे असे बोलले जात आहे.

सद्दामचे वंशच शेख मनफ अली अल निदा यांनी सद्दामची कबर खोदून त्याचे शव जाळण्यात आल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे इसिसच्या हवाई हल्ल्यात सद्दामची कबर उद्धवस्त झाल्याचे स्थानिक सांगत आहेत. तर काही जणांच्या म्हणण्यानुसार सद्दामचे शव त्याची मुलगी हाला एका खासगी विमानातून जॉर्डन येथे घेऊन गेली. दरम्यान, एका इतिहासतज्ञांच्या मते सद्दाम अजून जिवंत असून त्याच्या सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका व्यक्तीला ठार करण्यात आले होते.