करकरे शहीदच; साध्वी प्रज्ञासिंह यांची माफी

2

सामना ऑनलाईन, भोपाळ

हेमंत करकरे यांचा सर्वनाश होईल, असा मी शाप दिला होता. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरू झाले आणि जेव्हा दहशतवाद्यांनी करकरेंना मारले त्या दिवशी माझे सुतक संपले, असे विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केल्यामुळे देशभर खळबळ उडाली होती. निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. भाजपनेही हे विधान साध्वी यांचे व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपले विधान मागे घेतले असून याबाबत माफी मागितली आहे. करकरे हे शहीदच आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. गुरुवारी रात्री भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी ‘26/11’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले ‘एटीएस’चे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले. यानंतर दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. अखेर साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली आहे.

करकरे शहीदच… मी माफी मागते – साध्वी प्रज्ञासिंह
माझ्या विधानामुळे देशाच्या शत्रूंना बळ मिळत आहे. त्यामुळे माझे विधान मागे घेत असून मी माफी मागते, असे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे. मी व्यक्तिगत यातना भोगल्या आहेत. मी संन्यासी आहे. आम्ही देशाला कधीच कमकुवत होऊ देणार नाही. हेमंत करकरे यांचा मृत्यू शत्रू राष्ट्रातून आलेल्या दहशतवाद्यांच्या गोळीने झाला होता. करकरे हे निश्चित शहीद आहेत, असेही साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, भोपाळपासून 45 कि.मी.वर असणाऱया बेरासिया येथे सभेत साध्वींनी माफी मागितली, अशी माहिती त्यांच्या सहकारी उपमासिंह यांनी ‘पीटीआयला’ दिली आहे.

‘आयपीएस’ असोसिएशनने केला निषेध
‘आयपीएस’ असोसिएशनने साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हेमंत करकरे हे शहीद झाले होते. बलिदानाबद्दल करकरे यांना ‘अशोकचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, मात्र साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीदांचा अवमान केला आहे, असे ट्विट असोसिएशनने केले होते.

साध्वी प्रज्ञासिंह यांचे व्यक्तिगत मत – भाजप
दहशतवाद्यांशी लढताना हेमंत करकरे शहीद झाले. भाजपने नेहमीच करकरेंना शहीदच मानले, अशी भूमिका भाजपने प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे वक्तव्य त्यांचे व्यक्तिगत मत आहे. अनेक वर्षे तुरुंगात जो मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे साध्वींनीं हे विधान केले असावे, असेही या पत्रकात म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी काय म्हटले होते?
साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, ‘‘हेमंत करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले होते. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. करकरे हे कुटिलतेने वागत होते. ते देशद्रोही, धर्मद्रोही होते. करकरे मला विचारायचे, खरं जाणून घेण्यासाठी देवाकडे जावे लागेल का? यावर मी म्हटले होते, तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. करकरेंनी मला शिवीगाळ केली होती. सुरक्षा आयोगाचा सदस्य असलेल्या एका चौकशी अधिकाऱयाने मला सोडण्याचे आदेश दिले होते, मात्र करकरे मला विनाकारण गुन्हय़ात अडकवण्यावर ठाम होते. काहीही करून पुरावे गोळा करेन, असे ते म्हणत होते. निरापराध संन्याशांना तुरुंगात डांबण्यात आले. तुमचा सर्वनाश होईल, असा शाप मी करकरेंना दिला होता. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरू झाले आणि जेव्हा दहशतवाद्यांनी करकरेंना मारले त्या दिवशी माझे सुतक संपले.’’