सनातनविरोधात बोलणारे खलनायकच! साध्वी प्रज्ञासिंह यांचा पलटवार

वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा सनातनबाबतच्या विधानांमुळे चर्चेत आल्या आहेत. सनातनला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. सनातन संपवण्याची कोणाचीही लायकी नाही. सनातनची तुलना डेंग्यु, मलेरीया आणि कोरोनाशी करणाऱ्यांनाच हे आजार व्हावेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सनातनवर टीका करणाऱ्यांवर तोफ डागली. अभिनेते प्रकाश राज यांच्यावर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, सनातनविरोधात बोलणारे खलनायक आहेत. प्रकाश राज हा कोणी अभिनेता नव्हे, खलनायक आहे. जो धर्माच्या विरोधात आणि देशाच्या विरोधात गरळ ओकत असतो. ज्याला आपण कुठे राहतो, काय करतो याची जाणीव नाही, असे फक्त एक खलनायकच ठरु शकतात. तर दुसरी गोष्ट कोणाचीही सतातन संपविण्याची लायकी नाही.

देशात जी 20 च्या परिषदेनंतर सनातनबाबतचा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. सनातन धर्माची तुलना डेंग्यु, मलेरियाशी करणारे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, डी.राजा आणि अभिनेते प्रकाश राज यांनाच हे आजार होऊ देत अशी शापवाणीच त्यांनी केली. ज्यांनी सनातनची तुलना कुष्टरोगाशी केली त्यांनाच हा रोग जडावा, जे सनातन धर्माला एड्स बोलले त्यांनी एड्सचे ‘सुख’ भोगावे आणि जे सनातन धर्माला मलेरिया आणि डेंग्यु बोलले त्यांनी मलेरिया-डेंग्युचा रोग अनुभवावा. हे देवा, त्यांना जे हवे आहे, ते त्यांना भरपूर दे, अशी प्रार्थना करत त्यांनी सनातनविरोधात बोलणाऱ्यांना टोला लगावला आहे.